स्वप्न साकार, निर्णय प्रक्रियेत स्थान 

भास्कर लांडे
मंगळवार, 9 जानेवारी 2018

बेताची आर्थिक स्थिती असताना धाडसाने पाऊल टाकले. शिवणकाम सुरू केले. यशाने हात दिला आणि हुरूप वाढला. किराणा दुकान सुरू केले, त्याची वेगाने कर्जफेडही केली. 

बेताची आर्थिक स्थिती असताना धाडसाने पाऊल टाकले. शिवणकाम सुरू केले. यशाने हात दिला आणि हुरूप वाढला. किराणा दुकान सुरू केले, त्याची वेगाने कर्जफेडही केली. 

कौटुंबिक पार्श्‍वभूमी बेताची. बिकट आर्थिक परिस्थिती वाट्याला आली तरी प्रयत्नाद्वारे त्यातूनही मार्ग काढता येतो, हे करडगाव (ता. परभणी) येथील महिलेने दाखवून दिले. शेतीतील श्रमाच्या कामातून वेळ काढून शिलाई मशिन आणि नंतर किराणा दुकान उभारून कुटुंबाला आर्थिक भरारी मिळवून देण्यात कुंताबाई सुधाकर झाडे यशस्वी ठरल्या आहेत. कोरडवाहू आणि अल्प शेतीमुळे घरी नेहमीच पैशांसाठी चणचण असायची. उसनवारी आणि कर्जात दिवस काढायचे. त्यातून मार्ग काढण्यासाठी व्यवसाय करण्याचा त्यांचा मानस होता. शिलाई मशिन घेण्याचा विचार पुढे आला; पण त्यासाठी पुरेसे पैसे नव्हते. अखेरीस बचत गटात सदस्या होऊन कर्ज घेण्याचा मार्ग सापडला. 2014 मध्ये डुब्बेश्‍वर महिला स्वयंसहायता गटाशी जोडल्यानंतर 20 हजारांचे कर्ज घेतले. त्यातून शिलाई मशिन घेतली. शेतकामातून वेळ मिळेल तेव्हा त्या मशिनवर काम करत. कालांतराने त्यातून 50 हजारांहून अधिक उत्पन्न मिळाले. आत्मविश्‍वास दुणावला. घरातीलच छोट्याशा जागेत किराणा दुकान सुरू केले. तशात गटाला दोन लाखांचे कर्ज मिळाले होते. त्यातील सव्वा लाखाचे कर्ज त्यांनी व्यवसायासाठी घेतले. त्यात घरातील 50 हजारांची भर घालून तराजू, किराणा माल आणि इतर साहित्य खरेदी केले. सन 2016 च्या प्रारंभी व्यवसाय सुरू केला. तो करताना पती सुधाकर झाडे यांचे सहकार्य लाभले. कारण घरकाम, शेतकाम, शिलाई मशिन चालवून किराणा दुकान सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागे; परंतु दुकानातून महिन्याकाठी दहा हजारांवर नफा मिळायला लागला. गटाकडून घेतलेले कर्ज फेडले. एकूण 24 पैकी 23 हप्ते भरून कर्जाची परतफेड केली. पुढील महिन्यात त्या कर्जमुक्त होणार असल्याने त्यांचे मनोबल वाढले आहे. आता घरातील आर्थिक परिस्थिती सुधारली आहे. त्यांच्यात बोलण्याचे धाडस वाढले. घराच्या निर्णय प्रक्रियेत स्थान मिळाले आणि स्वप्नही साकार झाले. 

Web Title: maharashtra news parbhani women