बहिणाबाई चौधरी पुण्यतिथी : कवितांमधून दिसणारी स्त्रीमनातील तळमळ, प्रबोधनाचे देशी बोल

नियतीने घात घातला अन् वयाच्या तिशीतच बहिणाबाईला विधवापण
Poet Bahinabai Chaudhari
Poet Bahinabai Chaudhari Sakal

अरे संसार संसार,जसा तवा चुल्ह्यावर,

आधी हाताला चटके,तेव्हा मिळते भाकर ।

बहिणाबाई चौधरी (Bahinabai Chaudhari) यांची ही कविता. खरं तर बहिणाबाईंच्या प्रत्येक कवितेमागे त्यांच्या जीवनाची करुण कहाणी दडलेली आहे. बहिणाबाईचा जन्म जळगाव जिल्ह्यातील आसोदे या गावात 28 ऑगस्ट 1880 ला नागपंचमीच्या दिवशी झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव उखाजी महाजन आणि आईचे नाव भीमाई असे होते. पुढे वयाच्या तेराव्या वर्षीच बहिणाबाई यांचा विवाह जळगावातील नथुजी चौधरी यांच्याशी झाला. सासरी एकत्र कुटुंबात बहिणाबाईना सर्वांचा स्नेह, प्रेम मिळत होतं. संसार सुखाने चालु होता. पण नियतीने घात घातला अन वयाच्या तिशीतच बहिणाबाईला विधवापण आले.

पतीचे निधन आणि सुरुवातीचे एकत्र कुटुंब कालांतराने वेगळे झाले त्यामुळे बहिणाबाईंना अतिशय हलाखीच्या परिस्थितीचा सामना करावा लागला. पण त्याही परिस्थितीत त्यांनी आपली मुलगी काशी आणि पुत्र ओंकार आणि सोपान यांच्यावर चांगले संस्कार घडवले. पुढे आयुष्याची सल आणि वाटयाल्या येणाऱ्या भोगातुन त्यांच्या वाणीला धार येत गेली. जात्यावर दळतांना,पाटयावर तिखट वाटतांना,तिफणीवर पेरतांना, जसे सुचेल तशा त्या बोलीभाषेतून व्यक्त होऊ लागल्या. आजही बहिणाबाईंनी वापरलेले औत, फाटे, स्वंयपाकाच्या वस्तू, भांडी, पूजेचे साहित्य अस्तित्वात आहेत. बहिणाबाई जिथे राहायच्या त्याच वाडयाला आता संग्रहालय म्हणून मान्यता दिली गेली आहे. त्यामुळे हा अलौकिक ठेवा पुढील पिढीला पाहता येणार आहे.

अरे संसार संसार म्हणत संसारातील सुख दुःखांच्या साक्षीदार असलेल्या अनेक गोष्टी या संग्रहालयात बघायला मिळतात. हे संग्रहालय फक्त बहिणाबाईंच्या वस्तूंचे,आठवणींचेच संग्रहालय नाही तर या भागातील कृषीजन संस्कृतीत राबणाऱ्या,कष्टकरी महिलांच्या आठवणींचा,श्रमाचा हा ठेवा आहे. जळगावात जेव्हा लेखक,कवी,साहित्य प्रेमी येतात तेव्हा ते आवर्जून ह्या वाड्याचे दर्शन घेतात.

बहिणाबाई स्वत: शेतकरी जीवन जगत असल्याने शेती,जमीन, शेतकऱ्यांची सुख-दु:खे, त्यातले चढउतार, झाडे,प्राणी, निसर्ग साऱ्याविषयी त्यांच्या मनात विलक्षण आत्मीयता होती अन तिच आत्मीयता त्या आपल्याला ओवीतून मांडू लागल्या.

"नको नको रे ज्योतिषा माह्या दारी नको येऊ,

माह्य दैव मले कळे माह्या हात नको पाहू.

धनरेषांच्या च-यांनी तळहात रे फाटला,

देवा तुह्याबी घरचा झरा धनाचा आटला."

ही कविता वाचून कळतं की बहिणाबाईंकडे दांडगी स्मरणशक्ती,बारीक निरीक्षण, उपजत विनोदबुद्धी, जीवनातील सुख-दुःखांकडे सारख्या दृष्टीने पाहणारी नजर आणि सगळयात महत्त्वाचे जगण्यातून कळलेले तत्त्वज्ञान ही त्यांच्या कवित्वाची वैशिष्ट्ये होत.

मराठी साहित्यात लोकगीतांची परंपरा फार जुनी आहे. पण त्यातही स्त्रीगीतांची आणि ओव्यांची परंपरा नुसतीच जुनी नाही तर अनुभवांनी समृध्द आहे. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आणि विसाव्या शतकाच्या सुरुवातीला स्त्रियांना सामाजिक जीवनात स्थान नव्हतेच. घराची चौकट आणि अगदीच झाले तर शेत अशा दोनच टप्प्यांत स्त्रियांचे जीवन बांधले गेले होते. अशावेळी माहेरची आठवण,सासरच्यांचे वर्तन आणि वाटयाला आलेले इतर भोग व्यक्त करण्याकरता स्त्रियांकडे एकच पर्याय उपलब्ध होता. तो होता काव्याचा. वर्षभरातील सणांना एकत्र जमून परस्परांशी साधला जाणारा संवाद हाच काय तो स्त्रियांच्या जीवनातला विरंगुळा होता. हर्ष, खेद, चीड, संताप अशा भावना व्यक्त होण्याचे काव्य हेच माध्यम होते आणि तेच स्त्रियांनी निवडले. त्यामुळेच मराठीला समृध्द अशी स्त्रीगीतांची आणि ओव्यांची परंपरा लाभली. स्त्रीगीतांची मराठीतील परंपरा समृध्द आहे आणि तिच्या अग्रणी आहेत अंगभूत काव्याचं लेणं लाभलेल्या बहिणाबाई चौधरी.

बहिणाबाईंच्या कवितांतून आपल्याला वावर शिवार पाऊस भेटतो,नात्या-नात्यांतील परस्परसंबंध जाणवतो,स्त्रीमनातील तळमळ दिसते,प्रबोधनाचे उपदेशाचे देशी बोल जाणवतात,वास्तवात आलेला सहजची विनोदाची खोली जाणवते. त्यांच्या कवितांतून बोली भाषेची रेख सुंदर वळणे,बोलीभाषेतील शब्दांचा अचूक वापर आणि सरलता,म्हणी यांचा मिलाफ जाणवतो. बहिणाबाईनी लिहिलेल्या ओवीत आपण थेट त्या ओवीत अनुभूतीशीच जाऊन भिडतो.

वेडीवाकडी वळणं न घेता येणारी सहजसुंदर अशी बहिणाबाईची कविता आपल्याला शब्दांतून जाणवते. बहिणाबाई चौधरी यांनी शाळेची पायरी नव्हती चढलेली. तरीही त्यांनी रचलेले काव्य वाचल्यावर एखादा जाणता,शिकलेला आणि चार ठिकाणी फिरून अनुभव घेतलेला कवी असावा असं वाटतं. बहिणाबाईंनी काव्यातील स्त्रीजीवन अगदी सहज मांडले आहे. बाई मग ती कुठचीही असो तिला माहेरची ओढ सदैव लागलेली असते. हीच माहेरची ओढ आपल्याला बहिणाबाईंच्या अनेक कवितांतून जाणवते. जसे,की

“लागे पायाला चटके,रस्ता तापीसनी लाल

माझ्या माहेराची वाट,माले वाटे मखमल”

पण माहेराचे कौतुक म्हणजे सासरचा दुस्वास नव्हे. बहिणाबाईच्या कवितांतून माहेरचे वर्णन जितके आणि जसे येते तितक्याच वेळा आणि त्याच सहजतेने त्या सासरचे,सासरच्या माणसांचे वर्णन देखील आहे.

पुढे ह्या चार ओळींत त्या संसाराचे सारे गुपित सांगून जातात.

"ऐका संसार,संसार

दोन्ही जीवाचा इचार

देतो दुःखाला होकार

अन् सुखाले नकार”

थोडक्यात काय तर बहिणाबाईंच्या ओव्यांतून माणसाच्या सर्वअंगी जीवनाचे दर्शन घडते. बहिणाबाई या कवितेचे चालतं,बोलतं विद्यापीठ होत्या.

बहिणाबाईंच्या कवितांचे जतन आणि लिखाण सोपान देव आणि त्यांच्या एका भावाने करुन ठेवले आहे. कारण बहिणाबाईंना लिहिता वाचता येत नव्हते. बहिणाबाईंच्या मृत्यू नंतर त्यांच्या साहित्याची विल्हेवाट लावताना त्यांना ही वही सापडली होती.

ती वहि आचार्य अत्रे यांना दाखवली वहीतील काव्य वाचुन ते बोलले'हे तर शंभर नंबरी सोनं आहे. महाराष्ट्रापासून हे विचारधन लपवले तर ते पाप ठरेल!'

त्यानंतर मग ते बहिणाबाईच्या मुलगा म्हणजे कवी सोपान चौधरी यांनी ते प्रकाशित केले.

बहिणाबाई कष्टाळू होत्या. स्वतःच्या सामर्थ्यावर त्यांचा विश्वास होता. दैववादापेक्षा प्रयत्नवाद श्रेष्ठ आहे,अशी त्यांची धारणा होती. त्या रडत बसल्या नाही,कि कोणाला दोष देत बसल्या नाही. उलट त्या धीराने जीवनाला सामोरे गेल्या. हेच त्यांचे जीवनविषयक तत्वज्ञानचे वेगळेपण आहे. त्यांचे तत्त्वज्ञान हे शक्तिशाली स्त्रीचे तत्वज्ञान आहे. आजही 21 व्या शतकात बहिणाबाईंच्या मौखिक साहित्यात प्रचंड आपलेपणा वाटतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com