
Shrikant Shinde: शिंदेंच्या कार्यालयावर दगडफेक करणं शिवसैनिकाला भोवलं
शिंदेंच्या कार्यालयावर दगडफेक करणं एका शिवसैनिकाला चांगलच महागात पडलं आहे. शिवसेनेचा शाखाप्रमुख सुरेश पाटील याला पोलिसांनी तीन जिल्ह्यांमधून तडीपार करण्यात आलं आहे. (Maharashtra Politics Eknath Shinde Shrikant Shinde ShivSena Uddhav Thackeray supporter )
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड केल्यानंतर राज्यात वावटळ उठलं. शिंदे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आव्हान देत आमदारांसह आधी सुरत आणि नंतर गुवाहाटी शहर गाठलं होतं.
मात्र एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील बंडानंतर त्यांचे पुत्र आणि पक्षाचे खासदार श्रीकांत शिंदे यांचं उल्हासनगरमधील कार्यालय फोडण्यात आलं होतं. त्यावेळी सुरेश पाटील याच्यासह काही कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, सुरेश बाबुराव पाटील हा उल्हासनगर कॅम्प १ भागातला शिवसेनेचा शाखाप्रमुख होता. एकनाथ शिंदे हे गुवाहाटीला गेल्यानंतर सुरेश पाटील याने उल्हासनगरमधील खासदार श्रीकांत शिंदे यांचं कार्यालय फोडलं होतं.
सुरेश पाटील याच्यावर यापूर्वीही ४ गंभीर गुन्हे दाखल असून २०२२ साली ३ गुन्हे दाखल झाले. त्यामुळे पोलिसांनी त्याला ठाणे, मुंबई आणि नाशिक या तीन जिल्ह्यांमधून २ वर्षांसाठी तडीपार करण्यात आलं आहे.
उल्हासनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप फुलपगारे यांनी याबाबतची माहिती दिली असून यामुळे उल्हासनगरात ठाकरे गटाला धक्का बसला आहे.