विशेष अधिवेशनाची सांगता; दिवसभरात काय घडलं जाणून घ्या

विधानसभेचं अध्यक्षपद जिंकत शिंदे-भाजपा सरकारने मोठा विजय मिळवला आहे.
Vidhan Sabha
Vidhan Sabha

राहुल नार्वेकर : दोन दिवसीय विशेष अधिवेशनात प्रतिदिन ९ तास ३५ मिनिटं काम झालं. यावेळी विधानसभा अध्यक्षाची निवड, सरकारचा विश्वासदर्शक प्रस्ताव घेण्यात आला. तसेच अजित पवार यांची विरोधीपक्ष नेतेपदी निवड करण्यात आली. विधानसभेचं अधिवेशनाची सांगता झाली.

अजित पवार : आषाढी एकादशीची पूजा कोण करणार याबाबत उद्धव ठाकरे की देवेंद्र फडणवीस यांच्याच नावाची चर्चा होती. पण आता एकनाथ शिंदे ही पूजा करतील. राज्यातील कोट्यवधी जनतेच्यावतीनं तुम्हाला हा वेळ मिळतोय ही आनंदाची गोष्ट आहे.

अजित पवार : या सभागृहात शिस्त रहावी सभागृहाचं पावित्र रहावं. असं कुठलंच काम आपल्या कुणाकडूनच होता कामा नये. मी २००४ सालापासून आमदार म्हणून पाहिलं. पण तुमचं असं भाषण कधी ऐकलं नव्हतं. सभागृहाला सांगू इच्छितो की विधीमंडळात काम करताना न्यायपालिकेला हस्तक्षेप करावा लागू नये याची काळजी घ्यावी.

अजित पवार : सत्तेत नसतानाही चांगला विरोधीपक्ष नेता राज्याच्या विकासात चांगल योगदान कसा देऊ शकतो हे आधीच्या लोकांनी दाखवून दिलं आहे. सरकारची भूमिका जर राज्याच्या विरोधात जाणार असेल तर त्याला कडाडून विरोध केला जाईल. एकही कायदा सभागृहात चर्चेशिवाय होणार नाही.

अजित पवार : महाराष्ट्राच्या विधानसभेची उज्ज्वल परंपरा आहे. त्यात विरोधीपक्ष नेत्याचीही परंपरा आहे. आमचा ग्रुप ९०च्या बॅचचा होता. त्यापूर्वी ८५ मध्ये बाळासाहेब थोरातांचा ग्रुप निवडून आला होता. पूर्ण बहुमत मिळून भाजप-शिंदे सत्तेत आले आहेत. जशी लोकशाहीत मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षपद महत्वाचं असतं तसेच विरोधीपक्ष नेतेपदही महत्वाचं आहे.

अजित पवार : सर्वांना मी धन्यवाद देतो. शरद पवार, उद्धव ठाकरे, सोनिया गांधी, बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक मान्यवर आणि सहकाऱ्यांनी मला इथं संधी दिली. ही जबाबदारी मी स्विकारली. राजीव गांधींच्या नेतृत्वाखाली लोकसभा निवडणूक झाली तेव्हा मला बारामतीतून उमेदवारी दिली. त्यावेळी मला दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली.

राहुल नार्वेकर : अजित पवार हे सभागृहातील वरिष्ठ नेते आहेत. येणाऱ्या काळात त्यांच्या अनुभवाचा फायदा सर्वांना होईल. अत्यंत यशस्वी राजकारणी म्हणून महाराष्ट्रानं त्यांना पाहिलं आहे. पण एक यशस्वी स्टेट्समन म्हणूनही त्यांच्याकडे पाहिलं पाहिजे. अजित दादांनी दिलेला वेळ कधीच चुकत नाही.

भास्कर जाधव : कोरोनाच्या कालावधीत देखील सर्वांची काळजी घेऊन तिथं उपस्थित राहणारे अजित पवार आहेत. आमदार कायम सक्षम राहिला पाहिजे लोकप्रिय राहिला पाहिजे यासाठी अंतुले यांच्यानंतर अजित पवारांनी काम केलं आहे. मला भीती वाटते की तुम्ही फारच सॉफ्ट होत चालला आहात. तुमच्यातील तो करारीपणा कमी होऊ देऊ नका. मी हक्कानं जातो अजित पवारांच्य केबिनमध्ये जातो. विरोधीपक्ष नेते म्हणून तुम्ही कणखरपणे काम करा आम्ही तुमच्या पाठिशी.

भास्कर जाधव : अजित पवारांचे गुणविशेष आणि कार्यपद्धती आहे. यामध्ये सर्वांनाच त्यांचे स्वभाव वैशिष्ट माहिती आहे. त्यांना प्रचंड प्रकारची स्वच्छता आवडते. एखादा कागदाचा कपटा जरी रस्त्यात पडला तरी तो ते उचलतात. टेबल, भितींवरील धूळही त्यांना चालत नाही.

बाळासाहेब थोरात : अजित दादांना मी ९० पासून जवळून पाहतो आहे. लोकनेते म्हणून त्यांचा एक कालखंड होता. त्यावेळी ते तरुणांचे आवडते व्यक्तीमत्व होते आजही आहेत. अत्यंत स्पष्टवक्ते आणि शिस्तीचे अजित पवार आहेत. जमेल तसा सर्वांना जास्तीत जास्त न्याय देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.

जयंत पाटील : मला खात्री आहे की एकनाथ शिंदेंच काम करेल यात शंका नाही. पण त्याचबरोबर विरोधीपक्ष तुम्हाला चुकांवर बोट ठेवेल. त्यासाठी विरोधीपक्ष नेते तुम्हाला मार्गदर्शनही करतील. जे जे मंत्री होतील त्यांनाही अजित दादा चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करतील. कणखर विरोधीपक्ष नेता आपल्याला मिळाला आहे. ते चोख काम पार पाडतील याची तुम्हाला खात्री देतो.

जयंत पाटील : अनेक वर्षांचा अनुभव अजितदादांना काम करताना उपयोगी पडेल. अनेक खात्यांचा अनुभव त्यांना आहे. गेल्या अडीच वर्षे त्यांनी अर्थमंत्री म्हणून काम केलेलं असल्यानं त्यांना सगळी माहिती आहे. सरकारच्या बाजूनं अनेक विषय मांडले जातील तेव्हा अधिक चांगल्या पद्धतीनं ते त्यावर भाष्य करतील.

फडणवीस : राजकीय दादागिरी अजित पवारांची असते. पण त्यामध्ये शिस्त आहे. दिलेला शब्द मोडला नाही पाहिजे याची ते काळजी घेतात. राष्ट्रवादीच्या घड्याळाचे काटे दहा वाजून दहा मिनिटांनी स्थिर आहेत. अनेकदा आपण खूप लोकांच्या गराड्यात असतो त्यामुळं आपण सांगतो की मी वेळ पाळू शकलो नाही. पण कितीही लोक असले तरी त्यांना भेटून अजित पवार हे बैठकांना हजर राहतात.

फडणवीस : २००४ साली अजित पवारांना मुख्यमंत्री होण्याची संधी होती. कारण त्यावेळी राष्ट्रवादीला सर्वात जास्त जागा होत्या. पण त्यांच्या पक्षानं त्यांना संधी दिली नाही. त्यानंतर त्यांना कायम या पदानं हुलकावणी दिली. सातत्यानं सात टर्म आमदार म्हणून ते काम करत आहेत. आम्ही ७२ तासांच्या मंत्रिमंडळातील सहकाही होतो. चार वेळा उमुख्यमंत्री होण्याचा मान अजितदांदांना.

शिंदे : अजित दादा म्हणजे अजिंक्य अशी पावरफुल शक्ती. सगळ्यांनाच विरोधीपक्ष नेता होता येत नाही. या नेत्याकडे बघण्याचा सर्वांचा दृष्टीकोन वेगळा असतो. सरकार चुकत असेल तर त्याला ती चूक दाखवून देण्याच काम विरोधीपक्ष नेत्याला करावं लागतं. अजित दादांची एक घाव दोन तुकडे अशी पद्धत आहे, ही चांगली पद्धत आहे. नाहीतर सरकारी काम आणि सहा महिने थांब असं काही तुमच्याकडे नसतं.

शिंदे : सर्वात जास्तवेळ मंत्रालयात बसलेला व्यक्ती म्हणजे अजित पवार. अजित दादांना शेतीची चांगली माहिती आहे.अजित दादांनी आजपर्यंत आपल्या खात्याचा कारभार चांगला केला आहे. प्रत्येक प्रश्नाच्या मुळाशी जाऊन त्यावर साधक-बाधक विचार करण्याची त्यांची वृत्ती आहे. पुणे जिल्ह्यात फडणवीसांचा दरारा आहे.

एकनाथ शिंदे : राजकारणावर पकड असलेला नेता म्हणजे अजित पवार. अशा व्यक्तीचा विरोधीपक्ष नेते पदी नियुक्ती झाल्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. या सभागृहात सत्ताधारी पक्षापेक्षा विरोधीपक्षाचा देखील मान ठेवावा लागतो तो आमच्याकडून ठेवला जाईल. विरोधीपक्ष नेते हा सत्तारुपी हत्तीवर अंकुश ठेवणारा माहूत असतो. पण आजची परिस्थिती वेगळी आहे. काल परवा पर्यंत सत्तेत असलेली मंडळी विरोधीपक्षात आहे. त्यामुळं अनुभवी आहेत.

अजित पवार यांची विरोधीपक्ष नेतेपदी निवड झाल्याची घोषणा यावेळी विधानसभा अध्यक्षांनी घोषणा केली.

बहुमताचा ठराव जिंकताच मुख्यमंत्री शिंदेंच्या दोन मोठ्या घोषणा

हिरकणी गाव वाचवण्यासाठी २१ कोटींचा निधी देणार. इंधन दरावरील व्हॅट राज्याने कमी केला नव्हता. लवकरच तो निर्णयही कॅबिनेट बैठकीत घेणार, अशी घोषणा मुख्यमंत्री शिंदेंनी केली आहे.

मी देवेंद्र फडणवीसजींचे आभार मानतो की त्यांनी मला गेल्या सरकारमध्ये मंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली आणि मी समृद्धी महामार्ग प्रकल्पावर काम करू शकलो. ते शिवसेनेलाही 2019 मध्ये उपमुख्यमंत्रीपद देणार होते, असं प्रतिपादन एकनाथ शिंदेंनी केलं आहे.

मुलांच्या आठवणीत CM एकनाथ शिंदे भावूक

विधानसभा अध्यक्ष निवडणुकीच्या निमित्ताने शिंदे-भाजपा सरकारने पहिली लढाई जिंकल्यानंतर आता विश्वासदर्शक ठरावही जिंकला. यानंतर भाषणादरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुलांच्या आठवणीत भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.

माझा श्रीकांत डॉक्टर झाला. पण मी त्याला वेळ देऊ शकलो नाही. मी लेट यायचो आणि तो आधी निघून जायचा. मी संघटनेला वेळ दिला. शिवसेना हेच माझं कुटूंब मानलं. माझ्या आयुष्यात वाईट प्रसंग आला. माझी मुलं माझ्यासमोर डोळ्यासमोर गेली. तेव्हा मला दिघेंनी आधार दिला. असे सांगत एकनाथ शिंदे भावूक झाले. त्यांना यावेळी अश्रू अनावर झाले.

एकनाथ शिंदे आज विधानसभेत बोलताना आक्रमक शैलीमध्ये दिसले आहेत. आपली बंडामागची भूमिका मांडत असताना मात्र त्यांना अश्रू अनावर झाले. माझ्या कुटुंबाला प्राधान्य न देता मी कायम संघटनेसाठी झटत राहिलो. काही वेळा मी खचलोही, पण मला दिघेंनी आधार दिला, असंही शिंदेंनी सांगितलं. मी बाळासाहेबांच्या विचाराने वेडा झालो होतो. आनंद दिघेंनी मला शाखाप्रमुख केलं, असंही ते पुढे म्हणाले. यावेळी उद्धव ठाकरे आणि आईमधल्या संभाषणाची आठवणही करुन दिली. तसंच आपल्यावर रेडे, प्रेतं, अशा टिप्पण्या केल्याबद्दल त्यांनी खंतही व्यक्त केली आहे.

उद्धव ठाकरे शिवसेना भवनात; पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार

उद्धव ठाकरेंची आज शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, जिल्हाप्रमुख यांच्यासोबत बैठक होत आहे. शिवसेनेची बांधणी आणि रणनीती याविषयी या बैठकीत चर्चा होणार आहे.

आम्ही बंड नाही, उठाव केला: गुलाबराव पाटील

आम्ही बंड केलेला नाही उठाव केला आहे. आज माझ्या सारख्या माणसाला म्हणतात गुलाबराव तुम्हाला टपरीवर पाठवीन. रिक्षा चालवणारा, चहा विकणारा ज्यांना काही काम नव्हतं त्यांना नेता केलं. आता जे शिवसेना सोडून जातात ते पुन्हा निवडून येत नाही असे दादा म्हणाले. पण दादा आम्ही शिवसेना सोडली नाही त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. आमचा साधा मेंबर जरी फुटतो तेव्हा आम्ही विचार करतो. चाळीस आमदार फुटले ही आजची आग नाही, अशा शब्दांत एकनाथ शिंदेंनी आपली बंडाबद्दलची भावना बोलून दाखवली आहे.

काँग्रेस आमदार अनुपस्थित

  1. अशोक चव्हाण

  2. प्रणिती शिंदे

  3. जितेश अंतापुरकर

  4. विजय वडेट्टीवार

  5. झिशान सिद्दीकी

  6. कुणाल पाटील

  7. राजू आवळे

  8. मोहन हंबर्डे

  9. शिरीष चौधरी

  10. माधवराव जवळगावकर

धीरज देशमुख उपस्थित होते

भास्कर जाधवांचा सभागृहात गोंधळ; सरकारवर कठोर टीका

भाजपामध्ये आयात सदस्यांनी यादीच भास्कर जाधवांनी यावेळी वाचून दाखवली. सदस्यांची नावे घेतल्याने अध्यक्षांनी त्यांना थांबवलं. कोण कुणाशी लढत आहे हे समजून घ्या. लढाईत कधी थांबायचं हे कळेल तोच खरा योद्धा. या लढाईत संपणारै ती, शिवसेना, शिवसैनिक, त्यामुळे नीट विचार करा, असं आवाहनही भास्कर जाधवांनी केलं आहे.

..अन् शिंदे सरकारवर शिक्कामोर्तब होताच आदित्य ठाकरे उठून गेले!

विधानसभेत आज शिंदे सरकार बहुमताने विजयी झालं. हे मतदान झाल्यानंतर काही शिवसेना आमदारांसह आदित्य ठाकरे सभागृहातून उठून निघून गेले.

"ED म्हणजे एकनाथ आणि देवेंद्र"; फडणवीसांची फटकेबाजी

फडणवीसांनी सभागृहात जोरदार फटकेबाजी केली आहे. मी पुन्हा येईन, असं म्हणालो, तेव्हा अनेकांनी माझी थट्टा केली. पण आता मी पुन्हा आलोय आणि यांना सोबत घेऊन आलोय, असंही देवेंद्र फडणवीस आपल्या भाषणात म्हणाले आहेत. त्याचबरोबर माझी टिंगल करणाऱ्यांचा मी बदला घेणार, असा इशाराही त्यांनी दिला. मात्र पुढे लगेचच माझा बदला म्हणजे मी त्यांना माफ केलं हा आहे, असंही फडणवीस म्हणाले.

एकनाथ शिंदेंनी माणसं जोडावीत, कोणत्याही कार्यकर्त्याकडे दुर्लक्ष करू नये. कोणाचं आमंत्रण आलं, तर रात्री अपरात्री का होईना पण तिथे उपस्थिती दर्शवायचीच. शांत राहायचं, जास्त बोलायचं नाही, असा सल्ला एकनाथ शिंदेंना दिला आहे. तसंच ED म्हणजे एकनाथ आणि देवेंद्र असंही फडणवीस म्हणाले आहेत.

अजित पवार विरोधी पक्षनेते

विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून आता महाविकास आघाडीकडून अजित पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे.

समाजवादी आणि MIM चे एकूण ३ आमदार आजही तटस्थ राहिले आहेत. प्रस्तावाच्या विरोधात ९९ जणांनी मतदान केलं आहे. विरोधी पक्षाला कालपेक्षा ९ मतं कमी मिळाली आहेत.

सरकारने पार केला बहुमताचा टप्पा

आत्तापर्यंत बहुमतापेक्षा जास्त मतं शिंदे सरकारच्या बाजूने मिळालेली आहेत. त्यामुळे शिंदे सरकारला दिलासा मिळाला आहे.

शिरगणती सुरू झाल्यानंतर विजय वडेट्टीवार आणि अशोक चव्हाण विधानभवनात दाखल झाले आहेत. त्यामुळे आता ते मतदान करू शकणार नाहीत. तर आदित्य ठाकरे अगदी शेवटच्या क्षणी विधानभवनात दाखल झाले आहेत. काँग्रेसचे पाच आमदार सभागृहाबाहेरच राहिले आहेत. तर अपक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी भाजपाच्या बाजूने मतदान केलं आहे. प्रणिती शिंदे,जितेश अंतापूरकर कालही अनुपस्थित होते आता आज पण अनुपस्थित आहेत. अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, अण्णा बनसोडे, संग्राम जगताप हे आमदार बाहेर राहिल्याची माहिती आहे. विश्वासदर्शक ठरावासाठी दरवाजे बंद केल्यामुळे त्यांना वेळेत आत जाता आले नाही.

आज एकनाथ शिंदे सरकारची शेवटची परीक्षा आहे. आम्ही १०० टक्के ही बहुमत चाचणी जिंकणारच, अशी प्रतिक्रिया भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केली आहे.

अंतिम बेल वाजूनही सेनेचे आमदार विधान परिषद सभापतींच्या दालनातच

सभागृहाची अंतिम बेल वाजली मात्र सेनेचे आमदार विधान परिषद सभापतींच्या दलनातच बसून आहेत. आमदार आदित्य ठाकरे यांच्याशी संवाद साधल्यानंतर आमदार सभागृहात जाणार असल्याची माहिती मिळत आहे. सभागृहात मतदान करतांना काय भूमिका घ्यायची याबाबत सेनेचे आमदार चर्चा करणार, अशी माहिती मिळत आहे.

शिंदे गटाकडून ठाकरे गटातल्या १६ आमदारांच्या निलंबनाची याचिका

शिवसेनेच्या शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी ठाकरे गटाच्या १६ आमदारांच्या निलंबनासाठी विधानसभा अध्यक्षांकडे याचिका दाखल केली आहे. या १६ आमदारांना नोटिस देण्यात येणार आहे.

शिवसेना विधिमंडळ कार्यालयाचं सील काढलं!

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शिवसेनेच्या विधिमंडळ कार्यालय सील करण्यात आलं होतं. मात्र आता हे सील काढण्यात आलं आहे. मात्र आता त्या ठिकाणी ओळखपत्राशिवाय कोणालाही प्रवेश दिला जात नाहीये.

बहुमत चाचणीआधीच संतोष बांगर शिंदे गटात; थेट बसमध्येच बसले!

आत्तापर्यंत शिवसेनेच्या ठाकरे गटाची बाजू लढवणारे आमदार संतोष बांगर आज एकनाथ शिंदे गटात पोहोचले आहेत. काल त्यांनी राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षपदाच्या विरोधात मतदान केलं होतं. मात्र आज सकाळी ते थेट शिंदे गटाच्या बसमध्येच चढले. रात्री बांगर यांची एकनाथ शिंदेंसोबत चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.

आमची पहिली परिक्षा कालच अग्निपरिक्षा होती आणि ही परिक्षा मोठ्या फरकाने पास झालेलो आहे. आजही आम्हाला मोठं बहुमत मोठ्या फरकाने विजय प्राप्त होईल असा विश्वास भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केला. यावेळी विधानसभेच्या अध्यक्षांनी अधिकृत गटनेता कोण आणि अधिकृत प्रतोत कोण याची घोषणा केलेली आहे. तसेच मुख्य प्रतोद आणि गटनेता अजय चौधरी आणि सुनिल प्रभू यांची नियुक्ती रद्द केलेली आहे. शिंदे सरकार आल्यानंतर जनता आनंदी झाली असल्याचंही दरकर यांनी यावेळी सांगितले.

बहुमत चाचणीसाठी भाजपाचे आमदार विधानभवनात दाखल झाले आहेत. यावेळी भाजप आणि सेना युतीचा विजय असो अशा घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिल्या.

बहुमत चाचणीआधी उद्धव ठाकरेंनी बोलावली शिवसेनेची तातडीची बैठक

आज बहुमत चाचणी होणार आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटात आज त्या पार्श्वभूमीवर बैठक बोलावली आहे. या बैठकीसाठी पक्षाच्या सर्व जिल्हाप्रमुखांना शिवसेना भवन इथे बोलावण्यात आलं आहे.

बहुमत चाचणीसाठी रात्रीच ठरली रणनीती; शिंदे गट-भाजपाची खलबतं

बहुमत चाचणीच्या रणनीतीविषयी काल रात्री शिंदे गट आणि भाजपाची बैठक झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी उपस्थितांशी संवाद साधला. विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाच्या उद्या दुसऱ्या दिवशी शिवसेना-भाजप युती सरकारला बहुमताच्या चाचणीला सामोरे जायचे आहे. यावेळी नक्की सरकारची रणनीती काय असेल यावर प्रामुख्याने चर्चा करण्यात आली, असं ट्वीट करत एकनाथ शिंदेंनी ही माहिती दिली आहे.

ठाकरे गटाला धक्का; शिंदेच गटनेते

भाजपाचे राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदी निवडून आल्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदेंच्या गटनेतेपदाला वैध ठरवलं आहे. त्यामुळे ठाकरे गटाचे गटनेते अजय चौधरी यांची नियुक्ती रद्द करण्यात आली आहे. तर शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांची नियुक्तीही वैध ठरवण्यात आली आहे.

विधानसभेचं अध्यक्षपद जिंकत शिंदे-भाजपा सरकारने मोठा विजय मिळवला आहे. त्याबरोबरच आता त्यांनी बहुमताची कसोटीही पार केली आहे. विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकत त्यांनी सरकार कायम ठेवलं आहे. दरम्यान, आपल्या भाषणात बोलताना आज एकनाथ शिंदेंना अश्रू अनावर झाले. पक्षाप्रतिची निष्ठा आणि बंडानंतर झालेली टीका याविषयी बोलताना मुख्यमंत्री शिंदे भावूक झाले. (Maharashtra Politics Live Updates)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com