
Maharashtra Politics : संजय राऊतांना कोर्टाकडून १००० रुपयांचा दंड, काय आहे प्रकरण
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना न्यायालयाकडून एक हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. शिवडी न्यायालयाने त्यांना ही शिक्षा दिली असून गैरहजर राहिल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
खासदार संजय राऊत यांच्या विरोधात भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी डॉ.मेधा सोमय्या यांनी अब्रुनुकसानीची याचिका दाखल केली होती. त्याप्रकरणी न्यायालयात आज सुनावणी होणार होती. मात्र संजय राऊत या सुनावणीसाठी आले नाहीत.
त्यांनी आपल्या वकिलांकडून न्यायालयीन कामकाजासाठी गैरहजर राहण्याचा अर्ज दाखल केला. मात्र न्यायालयाने हा अर्ज फेटाळून लावला आणि राऊतांना १००० रुपयांचा दंड ठोठावला आहे.
संजय राऊत यांनी सामना पेपरमध्ये छापलेल्या एका बातमीवरुन ही याचिका दाखल करण्यात आली होती. संजय राऊतांनी १०० कोटींचा शौचालय घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी पुढची सुनावणी आता १० एप्रिल रोजी होणार आहे.