Maharashtra Politics : ठाकरे गटाला अपेक्षा आक्रमकतेची! सभेत धारदार वागण्यासंबंधी मविआशी चर्चा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

maharashtra politics uddhav thackeray bring powerful issues maharashtra shiv sena politics

Maharashtra Politics : ठाकरे गटाला अपेक्षा आक्रमकतेची! सभेत धारदार वागण्यासंबंधी मविआशी चर्चा

मुंबई : महाराष्ट्राला अस्वस्थ करणारे विषय विधिमंडळासमोर आणणे अन जनतेच्या न्याय्य मागण्यांसाठी आक्रमक होणे आवश्यक आहे. विधानपरिषदेत जनतेच्या प्रश्नांची धग प्रतिबिंबित होत असली तरी विधानसभेचे चित्र तसे नसल्याने ठाकरे गट अस्वस्थ झाला असल्याचे समजते.

आज शेतकर्यांच्या जिव्हाळ्याच्या कांदाप्रश्नावर विधीमंडळाचे कामकाज बंद पाडायचे ठरले असतानाही सभा सुरु का राहिली हा सेनानेत्यांना पडलेला प्रश्न आहे.उद्या ता १ मार्च रोजी कामकाजाला प्रारंभ होण्यापूर्वी ठाकरे गट मविआतील कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेसशी या संदर्भात चर्चा करणार आहे.

आक्रमक झाल्याशिवाय देशातल्या मोदीमंडित वातावरणाला छेद देणे शक्य नसल्याचे ठाकरे गटाचे मत असल्याचे समजते. विधानपरिषदेत ठाकरे गटाची लक्षणीय उपस्थिती आहे.तेथे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसशी चर्चा करुन आज कांदाप्रश्नावर सभागृहाचे कामकाज बंद पाडण्यात आले.मात्र सभेत तसे घडले नाही.कामकाजाला प्रारंभ करण्यापूर्वी जी निदर्शने सुरु होती ती नंतर सभेत उमटली नाहीत.

सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु असतानाही निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिल्यामुळे कमालीचा अन्याय झाल्याची ठाकरे गटाची भावना आहे.महाराष्ट्रात उध्दव ठाकरेंवर अन्याय करणार्या भाजप आणि एकनाथ शिंदेंविरोधात प्रचंड राग आहे .

त्या रागाला वाट फुटावी याची प्रतीक्षा मतदार करत असून विधीमंडळ अधिवेशनातही सरकारबद्दलचा रोष समोर यावा अशी ठाकरेनिष्ठांची इच्छा आहे.त्यामुळेच या सरकारकडून शेतकर्यांवर होत असलेला अन्याय ,विविध पातळ्यांवरचा भ्रष्टाचार यावर आवाज करण्याची व्यूहरचना असावी अशी ठाकरे गटाची आग्रही भूमिका आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांशी याबाबत सतत चर्चाही केली जाते आहे.विधानपरिषदेच्या कामकाजाला प्रारंभ होण्यापूर्वी तेथील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे दहा मिनिटे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसशी चर्चा करतात.आज त्या चर्चेनुसारच आक्रमकता स्वीकारली गेली.ही आक्रमकता हाच शिवसेनेचा स्थायीभाव असल्याचे मत ठाकरे परिवारात आहे.आज आक्रमक विरोधकांमुळे परिषदेचे कामकाज थांबले पण विधानसभेत मात्र पायर्यांवरील आक्रमकता दिसली नाही.

खरे तर विधानसभेतही आक्रमक होण्याची रणनीती होती असे एका ज्येष्ठ नेत्याने नमूद केले.राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या एका नेत्यानेही अशी चर्चा झाली होती हे मान्य केले.मात्र कामकाज ठप्प पाडण्याऐवजी कार्यवाही सुरु ठेवण्याचा मार्ग का पत्करला गेला याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जाते आहे.नागपूर अधिवेशनातही प्रारंभी आक्रमक होत नंतर सहकारी पक्ष शांत का झाले ते कळले नाही अशी कुजबूज होती.

मुख्यमंत्री शिंदे यांना अडचणीत आणणारे नागपूर सुधार प्रन्यासचे प्रकरण अर्ध्यावरच ठेवले गेल्याची चर्चा आहे. अर्थात चर्चेतून एकवाक्यता निर्माण होईल असा विश्वासही ठाकरे गटात व्यक्त होतो आहे. युवासेनेचे नेते आदित्य ठाकरे हे दिवसभर विधीमंडळात सक्रीय असतात .

परिषदेत जी सुसूत्रता दिसते ती विधानसभेतही मविआदरम्यान निर्माण व्हावी असे त्यांना वाटत असल्याचे समजते.कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांशी ठाकरे गटातले समकक्ष नेते यावर लवकरच चर्चा करणार असल्याचे समजते.