अभाविप - विद्यार्थी शक्तीचा हुंकार

Maharashtra-Pradesh-Adhiveshan
Maharashtra-Pradesh-Adhiveshan

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे ५४ वे महाराष्ट्र प्रदेश अधिवेशन २८ ते ३० डिसेंबरला पुण्यात होत आहे. त्यानिमित्त. 

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) शैक्षणिक क्षेत्रात काम करणारी, खऱ्या अर्थाने भारताच्या कान्याकोपऱ्यातील महाविद्यालयांमध्ये अस्तित्व असणारी राष्ट्रवादी विद्यार्थी संघटना. अभाविपचे कार्यक्षेत्र प्रामुख्याने महाविद्यालय परिसर असून ‘सेव्ह कॅम्पस’ ते ‘कॅम्पस कल्चर’ अशी आंदोलने आणि चळवळीच्या माध्यमातून विद्यार्थी परिषदेने आज ‘एक महाविद्यालय- एक शाखा’ अशी मजल मारली आहे. तरुणांमध्ये नेतृत्वगुण वाढीस लागावे, महाविद्यालय स्तरावरील प्रश्न त्यांनी स्वत: मार्गी लावावेत, युवकांची ऊर्जा विधायक कार्यात वापरली जावी, यासाठी विविध अभिनव उपक्रम महाविद्यालय शाखेतील कार्यकर्ते पार पाडतात. 

समाजातील ऐरणीच्या प्रश्नांबाबत बघ्याची भूमिका न घेता विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते देशहिताला प्राधान्य देऊन ते प्रश्न सोडविण्यासाठी संवैधानिक मार्गाने प्रयत्न करतात. ९ जुलै १९४९ पासून कार्यरत असणारी ही संघटना कालसुसंगत बदल स्वीकारत देशातील सर्वात मोठी विद्यार्थी संघटना बनली आहे. परिषदेचे प्रांतस्तरीय अधिवेशन प्रत्येक वर्षी एखाद्या शाखेत आयोजित केले जाते. अधिवेशनात राज्याच्या सर्व भागांतून आलेल्या कार्यकर्त्यांत खुला संवाद होतो. केवळ शैक्षणिकच नव्हे, तर सामाजिक, आर्थिक, राजकीय, राष्ट्रीय प्रश्नांवर ऊहापोह होतो व युवकांच्या मनात काय खदखदतंय हे जाणून घेतले जाते. विचारांच्या देवाणघेवाणीतून कार्यकर्ते कामांची स्पष्ट दिशा ठरवतात व ऊर्जा घेऊन आपापल्या स्थानिक ठिकाणी परततात. २०१९ चे अभाविप महाराष्ट्र प्रांताचे अधिवेशन दि. २८ ते ३० डिसेंबरला पुण्यात होत आहे. त्यात महाराष्ट्रातून येणाऱ्या सुमारे पंधराशे कार्यकर्त्यांच्या गटश: चर्चाही होणार आहेत. या उद्‌घाटनप्रसंगी महाराष्ट्रातील सर्वच विद्यापीठांच्या कुलगुरूंना, अधिष्ठात्यांना तसेच शिक्षणतज्ज्ञांना आमंत्रित करण्यात आले आहे.

नूतन प्रदेशाध्यक्ष व नूतन प्रदेशमंत्री यांची औपचारिक निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यावर महाविद्यालयीन युवकांचे मनोगत व्यक्त होईल ते अधिवेशनात मांडण्यात येणाऱ्या तीन प्रस्तावांच्या माध्यमातून. शैक्षणिक, सामाजिक तसेच कृषी व पर्यावरण या तीन विषयांवर छात्र नेते आपली मते मांडतील. या प्रस्तावांवर सर्व प्रतिनिधींकडून सूचना मागविण्यात येतील व योग्य सूचनांचा अंतर्भाव करून हे प्रस्ताव ३० डिसेंबरला संमत होतील. एन.आर.सी., ३७० वे कलम यांसारख्या सध्याच्या विषयांबरोबरच भारताचे आर्थिक धोरण, संरक्षण धोरण, अंतराळ धोरण यांसारखे धोरणात्मक विषय तसेच स्मार्ट सिटीज, इनोव्हेशन स्टार्ट अप यांसारखे तंत्रज्ञानाधीष्ठित विषय अधिवेशनात चर्चिले जातील. ३० डिसेंबरला ‘भविष्यातील भारत’ या विषयावर भाषण असेल व त्यानंतर ‘उद्यमशीलता’ या विषयावर चर्चासत्र आयोजित केले आहे. उद्यमशीलतेचे प्रत्यक्ष उदाहरण कार्यकर्त्यांसमोर यावे व त्यांनी त्यातून प्रेरणा घ्यावी यासाठी पाच उद्यमशील आणि त्यामुळेच यशस्वी होऊ शकलेल्या व्यक्तींना पाचारण करण्यात आले आहे. अतिशय वेगवेगळ्या क्षेत्रात प्रयोग करत, नावीन्यपूर्ण संकल्पना घेऊन काम करणाऱ्या व्यक्तींनी त्यांची धडपड मांडावी, त्यांचे प्रत्यक्ष अनुभव कार्यकर्त्यांना मिळावे, असा या चर्चासत्राचा हेतू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com