
Monsoon : राज्यात पूर्व मोसमी पावसाची हजेरी; ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज
पुणे - राज्यात तुरळक ठिकाणी पूर्व मोसमी पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान, ढगाळ हवामानामुळे कमाल तापमानात चढ-उतार होत आहे. येत्या दोन दिवसांत राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.
दरम्यान, कोकण-गोव्यात तुरळक ठिकाणी गुरुवारी (ता.१) पाऊस पडेल. तर विदर्भात शनिवारी (ता.३) आणि रविवारी (ता.४) तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची आणि मेघगर्जना, विजांचा कडकडाट होण्याची शक्यताही हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.
विदर्भ, मराठवाडा, कर्नाटक, तमिळनाडूपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. दरम्यान, विदर्भात बहुतांश ठिकाणी, मराठवाड्यात आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक नोंदविले आहे. उर्वरित राज्यात कमाल तापमानाचा पारा ३४ ते ४० अंश सेल्सिअस इतका होता. राज्यात अकोला येथे ४३.७ अंश सेल्सिअस अशा उच्चांकी तापमानाची नोंद झाली.
पुणे आणि परिसरात हलक्या पावसाची शक्यता
पुणे आणि परिसरात गुरुवारी (ता.१) आकाश मुख्यत: निरभ्र राहण्याची शक्यता आहे. तर दुपारी आणि संध्याकाळी आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होऊन अति हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. तर शुक्रवार (ता.२) ते रविवार (ता.४) दरम्यान आकाश निरभ्र राहून दुपारी आणि संध्याकाळी अंशत: ढगाळ राहील, असे हवामानशास्त्र विभागाने सांगितले आहे. पुण्यात बुधवारी ३९.६ अंश सेल्सिअस इतके कमाल तापमान नोंदविण्यात आले.
मॉन्सूनच्या पुढील वाटचालीस अनुकूल वातावरण
नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी संपूर्ण अंदमान निकोबार यांसह बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात प्रवेश केला आहे. दरम्यान अरबी समुद्रातील आगमनासाठी अनुकूल वातावरण तयार होत आहे. येत्या दोन-तीन दिवसांत मालदिव आणि कोमोरिन यासह बंगालच्या उपसागराचा उर्वरित भागात मॉन्सून दाखल होण्याची चिन्हे आहेत.