राज्य पतसंस्था फेडरेशनची निवडणूक बिनविरोध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

State-Cooperative-Union

महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनची पंचवार्षिक निवडणूक अखेर बिनविरोध झाली.

Credit Unions Election : राज्य पतसंस्था फेडरेशनची निवडणूक बिनविरोध

पुणे - महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनची पंचवार्षिक निवडणूक अखेर बिनविरोध झाली. अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी उर्वरित चारही अर्ज बुधवारी मागे घेतले गेल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध पार पडली.

फेडरेशनच्या २१ जागांसाठी विद्यमान अध्यक्ष काकासाहेब कोयटे आणि सहकार भारतीचे उदय जोशी यांच्या नेतृत्वाखाली सहकार समृद्धी पॅनेलच्या २१ जणांसह एकूण ३२ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. दरम्यान, कोयटे यांनी जोशी यांच्याशी चर्चा करून अंतिम २१ जणांची नावे उमेदवारीसाठी जाहीर केली होती. त्यातील भटक्या विमुक्त जाती-जमाती, इतर मागास प्रवर्ग, महिला आणि अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातून एकमेव अर्ज दाखल झाले होते. त्यामुळे या जागांवर बिनविरोध निवड झाली होती. मात्र, सर्वसाधारण प्रवर्गातून १६ जागांसाठी २० अर्ज होते. हे अतिरिक्त चार अर्ज बुधवारी (ता. २१) अंतिम दिवशी मागे घेण्यात आले. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाल्याचे फेडरेशनचे विद्यमान अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांनी सांगितले.

बिनविरोध निवड झालेले उमेदवार - ओमप्रकाश तथा काकासाहेब कोयटे (नगर), वसंत शिंदे (मुंबई), राधेश्याम चांडक (बुलडाणा), दादाराव तुपकर (जालना), डॉ. शांतीलाल सिंगी (औरंगाबाद), शशिकांत राजोबा (सांगली), चंद्रकांत वंजारी (ठाणे), ॲड. दीपक पटवर्धन (रत्नागिरी), धनंजय तांबेकर (नांदेड), रवींद्र भोसले (सातारा), जवाहर छाबडा (कोल्हापूर), भास्कर बांगर (पुणे), वासुदेव काळे (नगर), सुभाष आकरे (गोंदिया), नीलिमा बावणे (नागपूर), नारायण वाजे (नाशिक), राजुदास जाधव (यवतमाळ), सुरेश पाटील (रायगड), ॲड. अंजली पाटील (नाशिक), भारती मुथा (पुणे) आणि शरद जाधव (पालघर).

कोयटे यांनी १९९० सालापासून संचालक, सहसचिव, महासचिव या पदांवर काम केले आहे. गेली १४ वर्षे ते अध्यक्षपदी कार्यरत आहेत. राज्यभर १६ हजार पतसंस्थांचे नेतृत्व करणाऱ्या या संस्थचे सव्वा दोन कोटी सभासद आहेत.

सहकारातील ही निवडणूक सहकार भारतीचे राष्ट्रीय महामंत्री उदय जोशी, भाजपचे नेते प्रवीण दरेकर आणि सहकार व बँकिंग तज्ज्ञ विद्याधर अनास्कर, रिझर्व्ह बँकेचे संचालक सतीश मराठे यांच्यासह सर्व सहकाऱ्यांमुळे बिनविरोध झाली, याचा आनंद आहे. सहकार क्षेत्र राजकारणविरहित असावे, हे यातून पुन्हा एकदा सिद्ध झाले.

- काकासाहेब कोयटे, विद्यमान अध्यक्ष, राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन.

टॅग्स :maharashtraelection