राज्यातल्या परिचारिका संपावर जाणार, 'या' दिवशी करणार आंदोलन

भाग्यश्री भुवड
Monday, 17 August 2020

महाराष्ट्र राज्यातील परिचारिका संपावर जाण्याच्या तयारीत आहेत. विविध मागण्यांसाठी त्यांनी संपावर जाण्याचा पवित्रा घेतला आहे.

मुंबईः  गेल्या सहा महिन्यापासून जगभर कोरोना महामारीने थैमान घातले आहे, या काळातही परिचारिका जिवाची पर्वा न करता कोरोनाशी लढत आहेत. या काळात परिचारिकांना फ्रंटलाईन योद्धे असे संबोधून जगभर त्यांचे कौतुक केले जात आहे. मात्र आता महाराष्ट्र राज्यातील परिचारिका संपावर जाण्याच्या तयारीत आहेत. विविध मागण्यांसाठी त्यांनी संपावर जाण्याचा पवित्रा घेतला आहे.

काही मागण्यांसाठी त्यांना गेल्या अनेक वर्षांपासून रखडवले जात आहे. 
त्यामुळे, महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या वतीने परिचारिकांच्या अतिसंवेदनशील आणि न्यायिक मागण्यांसाठी 1 सप्टेंबर 2020पासून आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहे. या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देण्यात आले आहे.

या आहेत परिचारिकांच्या मागण्या 

  • राज्यात गेल्या अनेक वर्षात परिचारिकांची मोठ्या प्रमाणात सर्व स्तरावरची पदे रिक्त आहेत. सध्या कोरोना महामारीमध्ये शासनाने टेंडर भरती काढून तात्पुरती सोय करण्याचा प्रयत्न केला. मात्र तुटपुंजा पगार आणि जीवाची भीती यामुळे अनेक जण राजीनामे देऊन निघून गेले. त्यामुळे नियमित पदभरती करणे गरजेचे आहे. परिचारिकांची संख्या अत्यल्प आहे त्यामुळे सर्व स्तरावरचे पदोन्नती आणि पदभरती अत्यावश्यक आहे. 100% परिचारिकांच्या पदभरतीसाठी शासनाने परवानगीही दिली आहे, मात्र प्रत्यक्षात पदभरती झालेली नाही.
  • कोविड कक्षात रोटेशन करताना अत्यंत अपुरे मनुष्यबळ असल्याने आणि रुग्ण संख्या क्षमतेपेक्षा खूप जास्त असल्यामुळे परिचारिकावर प्रचंड मानसिक ताण येतो, त्यातच सात दिवस रोटेशन आणि तीन दिवस क्वारंटाईन त्या आठवड्याची साप्ताहिक सुट्टी ही दिली जात नाही. म्हणून 7 दिवस रोटेशन आणि 7 दिवस क्वारंटाईन हा क्रम कायम ठेवावा. तसेच, प्रोटीनयुक्त आहार आणि चांगल्या दर्जाच्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था करण्यात यावी. 
  • कोरोना (कोविड-19) महामारीमध्ये जिवाची बाजी लावून लढणार्या परिचारिकांचे फक्त शाब्दिक कौतुक न करता, केंद्र शासनाप्रमाणे जोखीम भत्ता नव्याने मंजूर करून देण्यात यावा.
  • कोणत्याही घटनेत अधिकाराचा गैरवापर करून परिचारिकांना त्रास देणाऱ्या अशा अधिकाऱ्यांवर विनाविलंब कडक कार्यवाही करण्यात यावी.
  • राज्यातील परिचारिकांना फक्त रुग्णसेवेचीच कामे द्यावी, ग्रामीण रुग्णालय स्तरावर मासिक अहवाल तयार करणे, डाटा एन्ट्री इ. कारकुनाची कामे त्यांच्याकडून काढून घेण्यात यावी.

1 सप्टेंबर पासून आंदोलनाच्या तयारित 

1 सप्टेंबर 2020 पासून रुग्णसेवा विस्कळीत न करता काळीफीत आंदोलन आणि निदर्शने करणार आहोत आणि जर तरिही मागण्या मान्य झाल्या नाही. तर, 8 सप्टेंबर 2020 या दिवशी एक दिवस काम बंद आंदोलन करण्यात येईल, त्यानंतरही मागण्या पूर्ण न झाल्यास बेमुदत संपावर जातील असे महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या उपाध्यक्ष हेमलता गजबे यांनी सांगितले आहे.

(संपादनः पूजा विचारे)

Maharashtra State Nurses going strike on 1 september


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra State Nurses going strike on 1 september