राज्यात खून, बलात्कार, खंडणी, महिलांवर होणाऱ्या अत्याचारात मोठी वाढ झाली आहे. विविध गुन्हेगारी प्रकरणात महाराष्ट्र हे देशात प्रथम किंवा दुसऱ्या क्रमांकावर आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा राज्यात प्रश्न निर्माण झाला असून याबाबत कठोर निर्णय घ्यावेत, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी केली.
अर्थसंकल्पी अधिवेशनात आज गृह, पर्यावरण, जलसंपदा, सहकार, पणन, वस्त्रोद्योग, पाणीपुरवठा आणि पर्यटन विभागांच्या अनुदान मागण्यांवर चर्चा झाली. यावेळी जाधव यांच्यासह अनेकांनी आपली मते व्यक्त केली.
यावेळी संजय कुटे यांनी जलजीवन मिशन योजनेची विस्तृत माहिती दिली. ही योजना चांगली असली तरी, बहुतांश गावांना भूजलावर आधारित योजनेतून पाणी दिले जात आहे. अनेक ठिकाणी दूषित पाण्याचा पुरवठा होत असून, स्रोतांचे बळकटीकरण झालेले नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. तसेच या जलप्रदूषणास जलसंपदा, उद्योग, पर्यावरण, नगरविकास असे सर्वच विभाग जबाबदार आहेत. या सर्व विभागाने एकत्रित काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
आमदार रोहित पवार म्हणाले, ‘सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी देणे आवश्यक आहे. या कर्जमाफीसाठी २५ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात यावी. शेतकरी सन्मान योजनेचा अजूनही ६ लाख ५० हजार शेतकऱ्यांना लाभ मिळालेला नाही. २०१७ पासून हे शेतकरी लाभापासून वंचित आहेत, त्याकडे सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे,’ अशी मागणी त्यांनी केली.
आ. वरुण सरदेसाई यांनी गृह विभागावरील अनुदान मागण्यांवर चर्चा करत असताना मुंबईतील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केला. मुंबईत बीट चौकी असल्या तरी कर्मचारी नाहीत. गर्दुल्ले या चौकीत बसून ड्रग्ज घेत असल्याचा आरोप त्यांनी केला. राज्य शासनाकडे सायबर सेल असला तरी, या सेलकडून गुन्ह्यांची उकल करण्याचे प्रमाण असमाधानकारक असल्याचे त्यांनी सांगितले.
वरिष्ठपेक्षा कनिष्ठ सभागृहाची अवस्था वाईट
मागील सहा वर्षे वरिष्ठ सभागृहाचे प्रतिनिधित्व केले. त्यावेळी वाटले होती की, या सभागृहात फारच वाईट परिस्थिती आहे. मात्र कनिष्ठ सभागृहात आल्यानंतर लक्षात आले आहे, की वरिष्ठ सभागृहापेक्षा कनिष्ठ सभागृहाची अत्यंत वाईट परिस्थिती आहे, असे सुरेश धस यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.