Vidhan Sabha 2019 : भाजप : ‘२२० प्लस’ हा हवेतील आकडा नाही - पाटील

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 ऑक्टोबर 2019

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मोठ्या बहुमताने युती पुन्हा सत्तेवर येण्याचा दावा केला आहे. केंद्र आणि राज्य सरकारची कामगिरी उजवी ठरली आहे. युतीला राज्यात पुन्हा दमदार कामगिरी करण्याची संधी जनता देणार असल्याचे त्यांनी ‘सकाळ’चे प्रतिनिधी योगेश कुटे यांच्याशी बोलताना सांगितले. या मुलाखतीचा अंश...

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मोठ्या बहुमताने युती पुन्हा सत्तेवर येण्याचा दावा केला आहे. केंद्र आणि राज्य सरकारची कामगिरी उजवी ठरली आहे. युतीला राज्यात पुन्हा दमदार कामगिरी करण्याची संधी जनता देणार असल्याचे त्यांनी ‘सकाळ’चे प्रतिनिधी योगेश कुटे यांच्याशी बोलताना सांगितले. या मुलाखतीचा अंश...

प्रश्न - भाजप-शिवसेना युतीला २२० हून अधिक जागा मिळतील, हा दावा कशाच्या आधारे करता?
पाटील - लोकसभा निवडणुकीच्या निकालात युती ही २२७ मतदारसंघांत पुढे होती. राज्यात ज्या पक्षाला एक कोटी ७० लाख मते मिळतात, तो पक्ष सत्तेत येतो. लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेला दोन कोटी ७४ लाख मते मिळाली. त्याआधारे २५० जागा मिळायला हव्यात; पण एक, त्यातही किमान आकडा म्हणून २२० जागा मिळतील. लोकसभा निवडणुकीनंतर राज्यघटनेतील ३७० कलम रद्द झाले. तिहेरी तलाक रद्द झाला. कंपन्यांना करसवलत मिळाली. मोदींना परदेशात प्रचंड प्रतिसाद मिळतोय. महाराष्ट्रात सरकारने विविध निर्णय मार्गी लावले. या सर्वांच्या आधारे आम्हाला २२० जागा मिळतील. हा काही हवेतील आकडा नाही.

ईडीने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांच्याबद्दल जनतेत सहानुभूती निर्माण झाली आहे...
शरद पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात सरकारची काहीच भूमिका नाही, हे जनतेला माहिती आहे. त्यामुळे पवारांना सहानुभूती मिळण्याचा प्रश्नच नाही. उलट पवार या वयात कशासाठी एवढी धडपड करताहेत, असा प्रश्न जनतेला पडलाय. याशिवाय, पवारांच्या राजकारणाचा लोकांना कंटाळा आलाय. जनतेला फार काळ थापा मारलेले आवडत नाही. काही काळ ते खपूनही जाईल; पण सर्वकाळ नाही. पवारांनी अनेकांचे राजकारण संपविले. समोरच्याला किरकोळीत काढलं आहे. तसे आता होणार नाही. 

तुमचा आणि शरद पवारांचा एवढा वाद का आहे? 
पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला पश्‍चिम महाराष्ट्रातून आम्ही हद्दपार केले. सोलापूर, सांगली, सातारा आणि कोल्हापूर या ठिकाणी राष्ट्रवादीचा एकही खासदार नाही. त्यांचा बालेकिल्ला ढासळलाय. भाजपच्या वतीने हे सगळं कोण करतं आहे? राष्ट्रवादीला भवितव्य नाही, हे कोण सांगत होतं? तर मी हे सारे करत आहे. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या पवारांचा माझ्यावर थेट राग आहे.

तुम्ही स्वतःचा उल्लेख पाकीट असा करता आणि पक्ष ज्या पत्त्यावर पाठवेल तेथे मी जातो, असे सांगता. २०१४ पासून तुमचं पाकीट योग्य ठिकाणी पडतंय, हे कसं काय?
संघटना दहा हजार डोळ्यांनी तुम्हाला पाहत असते. बरं वागलात तर त्याचं फळ मिळतं. चुकीचं वागाल तर त्याचे शासनही करते. मला २०१४च्या आधीपासूनच विविध जबाबदाऱ्या मिळत आल्यात. सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची माझी पद्धत असल्याने संघटना माझा विचार करत असावी.

खडसे, तावडे, बावनकुळे यांच्या पाकिटाचा पत्ता या वेळी कसा काय चुकला?
त्यांचं काय चुकलं, हे माहीत नाही. आमच्या पक्षात गुपिते ठेवली जातात. ती संबंधित व्यक्तींशिवाय कोणाला माहीत नसतात; पक्षाची जबाबदारी त्यांना दिली जाईल, असे वाटतंय.

तुमच्या पाकिटाचा पुढचा पत्ता मंत्रालयातील सहावा मजला (मुख्यमंत्रिपद) असेल, असे बोलले जातेय.
मला काहीही माहीत नाही. मी आध्यात्मिक माणूस आहे. त्या अर्थाने चार तास पूजाअर्चा करणारा नव्हे; पण जे काही घडायचं असेल ते घडेल. ते आपल्या हातात नसतं, अशा वृत्तीवर भरवसा ठेवून मी काम करत असतो.

कोथरूड मतदारसंघातून निवडणूक लढवावी लागेल, हे पक्षाने केव्हा सांगितले होते?
अध्यक्ष अमित शहा यांनी महाजनादेश यात्रेच्या सोलापूर येथील सभेच्या वेळी, महिनाभरापूर्वी विधानसभा निवडणूक लढविण्याचे सूतोवाच केले होते; पण मी त्यासाठी तयार नव्हतो. उमेदवार निश्‍चित करण्याच्या बैठकीत शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत कोथरूड मतदारसंघावर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे पक्षाचा आदेश मला मान्य करावा लागला. कोथरूडमध्ये सर्व कार्यकर्ते मनापासून काम करत आहेत. त्यामुळे विरोधकांनी येथे दिवास्वप्ने पाहून उपयोग नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Vidhansabha 2019 BJP Chandrakant Patil Interview Politics