Vidhan Sabha 2019 : ‘राज्यात लढायचे कोणाशी?’

सकाळ वृत्तसेवा
Friday, 11 October 2019

फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री - बारणे
‘आगामी मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार’, असा विश्‍वास पक्षप्रमुख उद्धव ठाकरे प्रचार सभांमध्ये व्यक्त करीत आहेत. मात्र, त्यांच्या पक्षाचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी मात्र, ‘राज्यात पुन्हा महायुतीची सत्ता येऊन देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील,’ असे वक्तव्य केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.

विधानसभा 2019 : पिंपरी - ‘आमचे पहिलवान तेल लावून तयार आहेत; पण काँग्रेस, राष्ट्रवादीने आधीच पराभव स्वीकारला आहे. आमच्या समोर त्यांचा पहिलवानच नाही, मग राज्यात लढायचे तरी कोणाशी, हेच समजत नाही,’’ अशी बोचरी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी केली. विरोधी पक्षनेतेपद घेण्याइतके दहा टक्के संख्याबळही त्यांच्याकडे नसेल, असे सूतोवाचही त्यांनी केले.   

पिंपरी, चिंचवड व भोसरी मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष- शिवसेना महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी रहाटणीत आयोजित सभेत ते बोलत होते. त्यापूर्वी त्यांनी भोसरीत रोड शो केला. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘‘पिंपरी- चिंचवडमध्ये अजित पवारांच्या घड्याळाचे बारा वाजले आहेत, त्यामुळेच राष्ट्रवादीला भोसरी, चिंचवड मतदारसंघात उमेदवार मिळाला नाही. पवारांचा बालेकिल्ला यापूर्वीच उद्‌ध्वस्त झाला आहे. त्यांच्यासोबत आता कोणी जायला तयार नाही. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना पराभव दिसत असल्याने ते गायब झाले. निवडणूक सोडून बॅंकॉकला फिरायला गेले. तर, राष्ट्रवादीची अवस्था, ‘आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी बचे मेरे पिछे आओ’ अशी झाली आहे. शरद पवार यांच्यामागे प्रत्यक्षात कुणीही नाही.’’

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची राज्यात आणि पिंपरी- चिंचवड महापालिकेत पंधरा वर्षे सत्ता होती. मात्र, त्यांना शहरातील प्रश्‍न सोडवता आले नाहीत. शास्तीकराचा बोजा जनतेवर लादला, असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘‘राज्यात आणि महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर शास्तीकराच्या जुलमातून पिंपरी- चिंचवडकरांची सुटका केली.

शहराला चोवीस तास पाणीपुरवठा करण्याबाबत पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प शेतकऱ्यांना विश्‍वासात घेऊन पूर्ण केला जाईल, त्यासाठी त्यांच्याशी चर्चा केली जाईल. आंद्रा व भामा आसखेड धरणांचे पाणी शहरात आणण्यासाठी निधीची तरतूद केली जाईल. नागपूर मेट्रोनंतर पुणे व पिंपरी- चिंचवडमध्ये मेट्रोचे काम गतीने सुरू आहे. अनेक वर्षांपासूनची पोलिस आयुक्तालयाची मागणी आम्ही पूर्ण केली आहे. शहरांतील घनकचरा व्यवस्थापन व सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्यासाठी सरकारने साडेतीन हजार कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत. आधुनिक भारत घडविण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न साकार करण्यासाठी व समृद्ध महाराष्ट्र घडविण्यासाठी तुमच्या जनादेशाची गरज आहे. राज्यात सर्वाधिक मतांनी निवडून आलेल्या आमदाराचे रेकॉर्ड तुम्हाला करायचे आहे.’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra Vidhansabha 2019 devendra fadnavis talking politics