Vidhansabha 2019 : उत्तर महाराष्ट्र : ‘महाजन-आदेश’च अंतिम

श्रीमंत माने
Sunday, 22 September 2019

गेल्या महिनाभरापासून चर्चेत असलेला छगन भुजबळांचा शिवसेनाप्रवेश आता थांबल्यात जमा असून, काँग्रेस नेते अमरीश पटेल यांच्याही भाजपप्रवेशाला ब्रेक लागला आहे. उत्तर महाराष्ट्रात पडत्या काळात काँग्रेस महाआघाडीला मिळालेला केवळ हा एकच दिलासा म्हणता येईल. आघाडीसमोर सर्वांत मोठं आव्हान मुख्यमंत्र्यांचे विश्‍वासू आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी उभं केलं आहे.

विधानसभा 2019 : गेल्या महिनाभरापासून चर्चेत असलेला छगन भुजबळांचा शिवसेनाप्रवेश आता थांबल्यात जमा असून, काँग्रेस नेते अमरीश पटेल यांच्याही भाजपप्रवेशाला ब्रेक लागला आहे. उत्तर महाराष्ट्रात पडत्या काळात काँग्रेस महाआघाडीला मिळालेला केवळ हा एकच दिलासा म्हणता येईल. आघाडीसमोर सर्वांत मोठं आव्हान मुख्यमंत्र्यांचे विश्‍वासू आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी उभं केलं आहे.

आतापर्यंत आघाडी उत्तर महाराष्ट्रात, विशेषत: खानदेशात एकनाथ खडसे यांच्या डावपेचांविरोधात लढत आली. आता आघाडीचा सामना गिरीश महाजन यांच्याशी आहे. नाशिक जिल्ह्यात युती व आघाडी यांच्यात तुल्यबळ लढत अपेक्षित आहे. सध्या भाजप व शिवसेनेचे प्रत्येकी चार, असे युतीचे आठ आमदार आहेत. इगतपुरीच्या काँग्रेस आमदार निर्मला गावित शिवसेनेत दाखल झाल्याने आघाडीचे संख्याबळ कमी झाले आहे. छगन भुजबळ यांची ताकद आघाडीसोबत असली; तरी भ्रष्टाचाराचे आरोप, तुरुंगवास यामुळे युतीच्या प्रचाराचे लक्ष्यही तेच असतील. मांजरपाडा वळण योजनेने जिल्ह्याच्या पूर्व भागात जाणारे पाणी हा भुजबळांच्या प्रचाराचा मुद्दा असेल. याच भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मते प्रत्यक्ष निवडणूक निकालात निर्णायक असतील. जळगाव हा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला असल्याने इथल्या अकरापैकी अधिकाधिक जागा जिंकण्याचा गिरीश महाजनांचा प्रयत्न असेल.

कित्येक दशकांनंतर सुरेश जैनांच्या अनुपस्थितीत विधानसभा निवडणूक होईल. जळगाव जिल्ह्यात बऱ्यापैकी ताकद असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रयत्न २००९ सारखे मोठे यश मिळविण्याचा असेल. काँग्रेसची स्थिती अगदीच तोळामासा आहे. नऊ मतदारसंघांच्या धुळे, नंदुरबार जिल्ह्यांत मुख्य स्पर्धा काँग्रेस व भारतीय जनता पक्षात असेल. रोहिदास दाजी पाटील, अमरीशभाई पटेल, स्वरूपसिंह नाईक, के. सी. पाडवी हे काँग्रेसचे नेते किती प्रभाव टिकवतात, यावर सारे अवलंबून असेल. 

पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या खांद्यावर भाजपच्या यशाची जबाबदारी राहील. महाजनादेश यात्रेच्या समारोपावेळी भाजपच्या निवडणूक प्रचाराची दिशा बऱ्यापैकी स्पष्ट झाली असली, तरी स्थानिक मुद्देही निवडणुकीत असतीलच. विशेषत: गिरीश महाजनांच्या जलसंपदा खात्याशी संबंधित नुसतेच घोषणा झालेले तापी व गोदावरी खोऱ्यातील छोटेमोठे पाटबंधारे प्रकल्प, सतत चर्चेत राहिलेला महाराष्ट्र-मध्य प्रदेश सीमेवर तापी मेगा रिचार्ज प्रकल्प, झालेच तर गुजरातकडे वळविले जाणारे महाराष्ट्राच्या हक्‍काचे पाणी निवडणुकीत गाजेल. नुकत्याच झालेल्या विजय संकल्प सभेच्या माध्यमातून भाजपने नाशकात जोरदार शक्तिप्रदर्शन केले. मुख्यमंत्र्यांसह राज्यभरातील नेते यावेळी उपस्थित होते. या शक्तिप्रदर्शनाला जनतेचा कसा प्रतिसाद मिळतो, हे निकालानंतर पाहणे औत्सुक्याचे ठरेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Vidhansabha 2019 North Maharashtra Politics