Vidhan Sabha 2019 : राज्यात आजपासून प्रचाराचा झंझावात

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 8 October 2019

राज ठाकरेंचा ‘लाव रे तो व्हिडिओ’ पुण्यातून
विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रचाराचा शुभारंभ पुण्यातून होणार आहे. येत्या ९ ऑक्‍टोबर रोजी पुण्यातील नातूबागच्या मैदानावर राज यांची सायंकाळी ६ वाजता सभा होणार आहे. मनसेने कोथरूडमधून चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात उमेदवार मैदानात किशोर शिंदे यांना उतरवले आहे. कोथरूडमध्ये मनसेच्या उमेदवाराला काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने पाठिंबा जाहीर केला आहे. चंद्रकांत पाटील यांना घेरण्यासाठी आघाडीने व्यूहरचना केल्याचे चित्र दिसून येत आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकींच्या वेळी प्रत्यक्ष निवडणुकींमध्ये न लढता राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांच्याविरोधात प्रचार केला होता. राज यांच्या प्रचारसभांमधील ‘लाव रे तो व्हिडिओ’ गाजला होता. मात्र राज यांच्या या भाजपविरोधी प्रचाराचा फारसा फरक पडल्याचे निकालांमध्ये दिसले नाही.

ठाकरे बंधू, शरद पवार यांच्यासह मोदी, शहा, राहुल गांधी यांच्या तोफा धडाडणार
मुंबई - विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याची मुदत संपली असल्याने राज्यातील सर्व २८८ मतदारसंघांतील चित्र स्पष्ट झाले आहे. आता दसऱ्यापासूनच राज्यभरात प्रचाराच्या तोफा धडाडणार असून केंद्रीय आणि राज्यस्तरावरील नेत्यांच्या प्रचाराचा झंझावात सुरू होणार आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रचारसभांचा कार्यक्रम अद्याप जाहीर झाला नसला तरी उद्या शिवाजी पार्क येथील दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे प्रचाराचे रणशिंग फुंकणार आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला असून ९ ऑक्‍टोबर रोजी राज यांची पुण्यातील नातूबाग येथे पहिली सभा होणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याआधीपासूनच संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. पवार यांची उद्या नगर जिल्ह्यातील पारनेर आणि जळगावच्या पारोळा येथे सभा होणार आहे. ९ ऑक्‍टोबर रोजी विदर्भातील अकोला येथील बाळापूर, वाशीमच्या कारंजा, तसेच १० ऑक्‍टोबर रोजी हिंगणघाट, बुटीबोरी, हिंगणा आणि काटोल येथे पवार यांच्या सभा होणार आहेत.

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या प्रचाराचा कार्यक्रम अद्याप जाहीर झाला नसला, तरी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने राहुल यांच्या सभांची मागणी केली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची पहिली सभा लातूरच्या औसा मतदारसंघात होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहायक अभिमन्यू पवार यांच्यासाठी शहा यांची सभा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यात दहा सभा घेण्याची शक्‍यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार १३ ऑक्‍टोबर रोजी जळगाव, साकोली, १६ ऑक्‍टोबरला अकोला, परतूर आणि पनवेल, १७ ऑक्‍टोबर परळी, सातारा आणि पुणे, तर १८ ऑक्‍टोबर रोजी मोदी यांची मुंबईत जाहीर सभा होण्यार असल्याचे सांगण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Vidhansabha 2019 Politics Promotion