Vidhansabha 2019 : दक्षिण महाराष्ट्र : महायुतीचं पारडं जड

South-Maharashtra
South-Maharashtra

विधानसभा 2019 : लोकसभेच्या निवडणुकीत दारुण पराभव झालेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससमोर विधानसभा निवडणुकीत कोल्हापूरसह सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील गड राखण्याचेच नव्हे, तर खेचून आणण्याचे आव्हान असेल. विशेषतः राष्ट्रवादीला सातारा जिल्ह्यातील आपली ताकद पुन्हा दाखवावी लागेल, त्याचबरोबर एकही आमदार नसलेल्या कोल्हापुरात काँग्रेसला करिष्मा दाखवण्याची संधी आहे; पण अंतर्गत गटबाजी रोखणार कशी, हा प्रश्‍न आहे. सांगलीतही दोन्ही काँग्रेसने हातात हात घालून काम केले तर हा जिल्हा पुन्हा आघाडीचा बालेकिल्ला होण्यात अडचण नाही. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या विधानसभेबरोबरच या वर्षी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत दोन्ही काँग्रेसची मोठी पिछेहाट झाली. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देशभर असलेल्या लाटेत कोल्हापुरात राष्ट्रवादीचे माजी खासदार धनंजय महाडिक यांनी विजय मिळवून मोदी यांचा वारू जरूर रोखला; पण त्यांचा सोयीच्या भूमिकेमुळे त्या वेळी पराभव झाला. आज तेच भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून काम करत आहेत आणि काँग्रेस, राष्ट्रवादीला त्यांच्याशी दोन हात करावे लागणार आहेत.

गेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने दोन जागा जिंकून पक्षाची लाज राखली; पण एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या या जिल्ह्यात एकही आमदार निवडून आला नाही, त्यामुळे मोठी पिछेहाट झालेल्या काँग्रेसला या वेळी पहिल्यांदा धक्का बसला तो जिल्हाध्यक्ष व माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या राजीनाम्याने. ऐन निवडणुकीच्य तोंडावर आवाडे यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे इचलकरंजीसह हातकणंगले आणि शिरोळची राजकीय समीकरणे बदलणार आहेत. सध्या काँग्रेस अडचणीत असताना पक्षाला आमदार सतेज पाटील यांच्या रूपाने एक तरुण, आश्‍वासक चेहरा जिल्हाध्यक्ष म्हणून मिळाला; पण ते स्वतः रिंगणात असणार नाहीत. त्यांनी आपले पुतणे ऋतुराज यांना कोल्हापूर दक्षिणमधून रिंगणात उतरवले असून, ऋतुराज यांच्यासह करवीरमध्ये पी. एन. पाटील आणि कोल्हापूर दक्षिणमध्ये काँग्रेसचा जो उमेदवार असेल त्याच्या विजयासाठी जिवाचे रान करावे लागणार आहे. राष्ट्रवादीतही फार आलबेल आहे असे नाही.

उमेदवारीवरून जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील हेच बंडाच्या तयारीत आहेत. पक्षाच्या विद्यमान आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी लढण्यापूर्वीच तलवार म्यान केली आहे. शिरोळची जागा ‘स्वाभिमानी’ला गेली तर राजेंद्र पाटील-यड्रावकर हे राष्ट्रवादीचे बिनीचे शिलेदार ‘जनसुराज्य’चा झेंडा हातात घेण्याची शक्‍यता आहे. अशा विचित्र परिस्थितीत दोन्ही काँग्रेससमोर जास्त आव्हान आहे. याउलट शिवसेना व भाजप युतीमुळे त्यांच्या आहे त्या दहापैकी आठ जागा राखण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावावी लागेल. यात खरी कसोटी ही पालकमंत्री व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची असणार आहे. त्याचवेळी विधानसभा निवडणूक डोळ्यांपुढे ठेवून राष्ट्रवादी व काँग्रेसच्या अनेकांनी भाजप किंवा शिवसेनेत प्रवेश केला आहे. युती झाली तर उमेदवार आणि जागाही निश्‍चित आहेत, अशा परिस्थितीत आमदार व्हायचे म्हणून पक्षात आलेल्यांचे बंड रोखण्याचे आव्हान युतीसमोर असेल. 

साताऱ्यात उदयनराजे फॅक्‍टर
सातारा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला. आठपैकी तब्बल पाच आमदार आणि एक खासदार राष्ट्रवादीचे असलेल्या या जिल्ह्यात तीन महिन्यांपूर्वी सर्वांचा विरोध डावलून राष्ट्रवादीने उमेदवारी दिलेले व विजयी झालेले उदयनराजे भोसले यांनीच पक्षाचा राजीनामा देत भाजपची वाट धरली. त्यांचे विधानसभा मतदारसंघातील उपद्रव्यमूल्य मोठे आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादीचे माजी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनीही भाजपची कास धरली आहे. काँग्रेसच्या दोन आमदारांपैकी जयकुमार गोरे हे भाजपवासी झाले आहेत. दुसरे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर भाजपचे अतुल भोसले यांचे आव्हान असेल. साताऱ्यात विधानसभेसोबत लोकसभेची पोटनिवडणूक नाही हा आघाडीलाच धोका आहे. रिकामे असलेले उदयनराजे संधी मिळेल तिथे आघाडीच्या विरोधात मैदानात उतरण्याची शक्‍यता आहे.

या मतदारसंघात शिवसेनेचा एक आमदार आहे; पण भाजपला खाते उघडण्याची संधी असली तरी आघाडी भक्कम राहिली तर भाजपसमोरही तगडे आव्हान असेल.

सांगलीतही कडवे आव्हान
काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या सांगलीत गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे ‘कमळ’ चार ठिकाणी फुलले. खासदार संजयकाका पाटील हेही भाजपच्या तिकिटावर दुसऱ्यांदा खासदार झाले. काँग्रेसचे माजी मंत्री प्रतीक पाटील यांनी राजकीय संन्यास घेतल्यासारखी स्थिती आहे, त्याचा फटका पक्षाला बसणार आहे. कडेगावमधून विश्‍वजित कदम हे एकमेव काँग्रेसचे आमदार आहेत, त्यांच्यासमोरही जागा राखण्याचे आव्हान आहे.

राष्ट्रवादीच्या दोन आमदारांना सध्या तरी आव्हान नाही, याशिवाय शिराळ्याची जागाही जिंकण्याची संधी राष्ट्रवादीला आहे, याठिकाणी माजी आमदार मानसिंगराव नाईक हे पक्षाचे उमेदवार असतील. खानापूरमध्ये शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांच्या विरोधात सर्वपक्षीय एकवटले आहेत, त्याचा फायदा माजी आमदार सदाशिवराव पाटील यांना होऊ शकतो. पाटील काँग्रेसच्या उमेदवारीचे प्रबळ दावेदार असले तरी अपक्ष म्हणून रिंगणात उतरण्याची त्यांची मानसिकता आहे. सुमनताई पाटील या तासगांवमधून निवडून येतील. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या विरोधकांतच एकजूट नसल्याचा फायदा त्यांना होईल. त्यांना रोखण्यासाठी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत रिंगणात उतरण्याची शक्‍यता होती; पण ऐनवेळी या उमेदवारीसाठी क्रांतिवीर नागनाथ नाईकवडी यांचे नातू गौरव यांना पुढे केले जाण्याची तयारी सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com