मदतीसाठी सविस्तर ज्ञापन सादर करणार  - चंद्रकांत पाटील 

सकाळ न्यूज नेटवर्क 
सोमवार, 2 सप्टेंबर 2019

"कोकण व पश्‍चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागाच्या पाहणीसाठी आलेल्या केंद्रीय पथकाकडून महापुराची भीषणता केंद्र शासनाच्या निदर्शनास आणून दिली जाईल. त्यानंतर केंद्राकडून महाराष्ट्राला आवश्‍यक ती मदत मिळेल,' अशी आशा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज व्यक्त केली.

मुंबई - "कोकण व पश्‍चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागाच्या पाहणीसाठी आलेल्या केंद्रीय पथकाकडून महापुराची भीषणता केंद्र शासनाच्या निदर्शनास आणून दिली जाईल. त्यानंतर केंद्राकडून महाराष्ट्राला आवश्‍यक ती मदत मिळेल,' अशी आशा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज व्यक्त केली. पूरग्रस्त भागाच्या मदतीसाठी राज्य शासनाकडून केंद्राकडे सविस्तर ज्ञापन सादर केले जाणार आहे, असेही पाटील यांनी सांगितले. 

सह्याद्री अतिथीगृह येथे चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय पथकातील सदस्यांची बैठक घेण्यात आली. या वेळी मुख्य सचिव अजोय मेहता यांच्यासह राज्याच्या विविध विभागांचे सचिव उपस्थित होते. या बैठकीत केंद्रीय पथकातील सदस्यांनी पूरग्रस्त भागात प्रत्यक्ष पाहणीदरम्यान आढळलेली निरीक्षणे नोंदविली. 

पाटील म्हणाले की, सात जणांचे पथक 27 ऑगस्ट रोजी पूरग्रस्त भागाच्या पाहणीसाठी दाखल झाले. त्यांचे दोन गट तयार करून त्यांच्यामार्फत सांगली, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे आणि पालघर या आठ जिल्ह्यांचा दौरा करण्यात आला. पूर ओसरल्यानंतर तातडीने हे पथक पाहणीसाठी आल्याबद्दल महसूलमंत्र्यांनी त्यांचे आभार मानले. पूरग्रस्त भागात नुकसानभरपाई देताना नेहमीपेक्षा वेगळे निकष लावावेत, असे महसूलमंत्र्यांनी या वेळी सांगितले. या भागातील केवळ शेतीचे नुकसान झाले नाही, तर त्यासाठी लागणाऱ्या आवश्‍यक त्या पायाभूत सुविधांचेदेखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे फक्त या वर्षाचेच नुकसान झाले नाही, तर पुढील दोन ते तीन वर्षांचे नुकसान झाले आहे, असेही त्यांनी सांगितले. केंद्राच्या मदतीपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूरग्रस्तांना दिलासा देणारे निर्णय घेतले आहेत. त्याची अंमलबजावणी राज्य शासनाकडून सुरू आहे, असेही पाटील यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra will get the help it needs says chandrakant patil