mahtma jyotiba phule
mahtma jyotiba phulesakal

सत्यशोधक क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले

ज्याला केवळ समोरचे दिसते त्याला नजर म्हणतात, परंतु ज्यांना आपल्या समोरील शंभर-दोनशे वर्षांचे दिसते आणि त्या संबंधाने विचार मांडतात त्यांना दृष्टा म्हटले जाते.

ज्याला केवळ समोरचे दिसते त्याला नजर म्हणतात, परंतु ज्यांना आपल्या समोरील शंभर-दोनशे वर्षांचे दिसते आणि त्या संबंधाने विचार मांडतात त्यांना दृष्टा म्हटले जाते. कडेकोट वर्ण व्यवस्था, शिक्षण आणि समतेचा पूर्णतः अभाव असतांना जोतीराव घरातून बाहेर पडले. प्रस्थापितांना सरळ अंगावर घेतले. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रोकठोक विचार मांडून सर्वांना निरुत्तर करून टाकले.

सामाजिक समतेच्या क्रांतीचे आद्य जनक असणारे जोतीराव आपले विचार व्यक्त करतांना कुणाचीही गय करत नाहीत. आज आपण स्वतंत्र भारत वर्षात असून जोतीराव फुलेंचे विचार जाहीरपणे बोलू सुद्धा शकत नाही, असे महान विचार जोतीराव फुल्यांनी एकोणिसाव्या शतकात, पारतंत्र्यात बोलून आणि त्या अनुषंगाने कृती करून दाखवली.

एखाद्या व्यक्तीला महात्मा किंवा दृष्टा का म्हटले जाते? याचे कारण म्हणजे जोतीराव आणि सावित्रीबाई फुले यांनी स्वतः मैदानात उतरून व्यवस्थेसी दोन हात केले. शिक्षण देऊन लोकांना विचार करायला भाग पाडले. आपल्या शरीरावर आपलेच डोके आहे हे निक्षून सांगतांना शिक्षणाच्या माध्यमातून वारंवार पटवून दिले. 'महार-मांगाची पहिली शाळा काढण्याचा मान जोतिबांचा आहे.

तसेच त्या मुलांसाठी पहिले वाचनालय काढण्याचा मानही त्यांच्याकडेच जातो.' पुण्यासारख्या सनातनी शहरात प्रस्थापितांना अंगावर घेऊन गावकुसाबाहेरील लोकांसाठी काम करणारा एकमेव अद्य महापुरुष म्हणजे जोतीराव फुले! सर्वार्थाने महाराष्ट्राच्या समाजमनाची मशागत करणारा कुशल माळी म्हणजे ज्योतीराव फुले. ज्याप्रमाणे कुदळ, फावडे, नांगराने शेतकरी जमीनीची मशागत करून तिला सुपीक बनवतो तसे भारतीय स्वातंत्र्याच्या १०० वर्षे अगोदर जोतीरावांनी कष्टाने महाराष्ट्राची माती सुपीक करून अविचार, भेदाचे, वर्णव्यवस्थेचे तण मुळासकट उपटण्याचे महत्कार्य जोतीरावांनी केले.

शालेय शिक्षणाचा संबंध मनोविकासाशी असतो. जोतीरावांच्या शाळेतील चवदा वर्षांच्या एका मांग मुलीने आपल्या निबंधात, 'जर वेद ब्राह्मणांसाठी आहेत तर वेदा प्रमाणे वर्तन करणे हा ब्राह्मणांचा धर्म होय. जर आम्हास धर्मासंबंधी पुस्तक पाहण्याची मोकळीक नाही तर आम्ही धर्मरहित आहो असे साफ दिसते की नाही बरे?

तर हे भगवान, तुजकडून आलेला कोणता धर्म तो आम्हांस कळीव, म्हणजे आम्ही सर्व त्याच्यासारख्या रीतीने अनुभव घेऊ.' असे लिहून आपल्या गुरूंचे विचार व्यक्त केले आहेत. हा पारतंत्र्यातील विचार आजही आपल्याला मोलाचा वाटतो. स्त्री शिक्षणासंबंधी मूलगामी कार्य करतांना ब्रिटीश सरकारने त्यांना मनाची २०० रुपयाची शाल देऊन त्यांचा सन्मान केला.

जोतीराव इ.स.१८४८ साली केवळ मुलींसाठी शाळा काढून थांबले नाहीत तर आपल्या पत्नीला शिकवण्यास सज्ज केले. इथे जोतीरावांचे खरे कर्ते सुधारकत्व समोर येते. जोतीराव आपल्या एका भाषणात स्त्री शिक्षणाचे महत्व स्पष्ट करतांना, 'जोपर्यंत हिंदूंच्या माता आणि भगिनी शिकून सुसंस्कृत होत नाहीत तो पर्यंत ते सुखी होणार नाहीत.'

आपल्या बोलण्यात, वागण्यात अज्ञान, अंधश्रध्दा यावर घणाघाती हल्ला चढवतांना ते कुणाचीही गय करत नाहीत. 'ज्या समाजामध्ये स्त्रीला हीन आणि गुलाम समजण्यात येते त्या समाजाला कायम स्वरुपाची प्रगती करता येईल ही अश्यक्य गोष्ट आहे" असे लिहून समाजाच्या प्रगतीची नाळ हि स्त्रियांच्या प्रगतीसी जुळलेली आहे याचे जोतीराव वारंवार प्रतिपादन करतात.

वडिलांनी घरातून काढून दिले, बाहेर लोकांनी त्यांच्या पत्नीला शेन, चिखल, सडकी अंडी, टमाटे फेकून मारतांना जंग जंग पछाडले. तरीही जोतीराव आणि सावित्रीबाई तसूभरही आपल्या ध्येय्यापासून डगमगले नाहीत. त्याचे कारण म्हणजे जोतीराव स्पष्ट वक्ते, निर्भय, सरळ स्वभावी आणि त्यागी होते.

जीवनात सत्ता, संपत्ती, मान-सन्मान याचा कधीही विचार केला नाही. जोतीरावांना म. गो. रानडे यांच्या, 'तुमच्या राजकीय हक्कांच्या बाबतीत जर तुमची अधोगती झाली असेल तर तुमची समाजपद्धती चांगली असणे शक्य नाही." असे रोकठोक विचारांची मंडळी पाठीशी होती.

जोतीरावांनी रायगडावरील रयतेचे राजे, कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीची जागा शोधून काढली. तेथील समाधीची डागडुजी करून घेतली आणि पहिल्यांदा रायगडावर शिवजयंती साजरी केली. हे सगळे करतांना जोतीरावांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा लिहून राजाची कीर्ती महाराष्ट्राच्या गावागावात पोहोचवण्याचे महत्कार्य केले.

जोतीरावांचे शेतकऱ्यांच्या उत्कर्षाकडे विशेष लक्ष होते. त्यासाठी त्यांनी गुलामगिरी नावाचा ग्रंथ लिहून होमरच्या, 'ज्या दिवशी मनुष्य गुलाम होतो त्या दिवशी त्याचा अर्धा सद्गुण जातो" या वचनाने सुरु करतांना मनसुबे स्पष्ट केले. इथल्या अन्यायकारी, भेदाभेदाच्या धर्माने इथला शेतकरी नेहमीच लुबाडला आहे. एकोणिसाव्या शतकात ज्ञानोबा-तुकोबांचा वारकरी संप्रदाय तथाकथित धर्ममार्तंडांनी पायदळी तुडविला होता.

त्यासाठी आपल्या गुलामगिरीतून शेतकरी वर्गाला उपदेश करतांना धर्म कसा शेतकऱ्याला रसातळाला नेतो(?) हे वारंवार सांगितले आहे. शेतकरी जर सुखी व्हायचा असेल तर थोतांड, कर्मकांड असणाऱ्या खोट्या चालीरीती, परंपरा यांना नाकारून विवेकावर अधारीत सत्यधर्म पालन करण्याचे आवाहन जोतीराव शेतकरी वर्गाला वारंवार करतांना दिसतात. शूद्रातिशूद्र, स्त्रिया, शेतकरी आणि भूमिहीन लोकांसाठी जोतीराव अहोरात्र झगडत होते.

हे सगळे करतांना त्यांनी आपल्या घराचा, पत्नीचा कधीच विचार केला नाही. धर्म ही अफूची गोळी आहे या न्यायाने जोतीरावांनी सर्वसामान्य लोकांना सहज पचेल-रुचेल असा सत्यशोधक समाज नावाचा नवा धर्म काढून उच्च निचतेला तिलांजली दिली. इथला सामान्य माणूस धर्माच्या गुलामगिरीच्या पाशात घट्ट आवळला गेला होता. त्याला मुक्त करण्यासाठी आपला स्वतंत्र विचार त्यांच्या सत्यशोधक समाज यातून पुढे आला.

ही सगळी क्रांतिकारी कामे करतांना जोतीराव फुल्यांवर प्रतीगाम्यांनी अनेकवेळा हल्ले चढवले. लहूजी वस्ताद मांग यांच्या तालमीत दांडपट्टा, कुस्तीत तरबेज झालेले जोतीराव कोणत्याही शारीरिक हल्ल्याला घाबरले नाहीत. अनेकांचे हल्ले कधी शक्तीने तर कधी युक्तीने परतवून लावतांना त्यांनी सनातन्यांना सडेतोड प्रती उत्तर दिले.

सज्जनहो, आज आपण लोकशाहीच्या शंभरीकडे वाटचाल करत आहोत. जगातील सर्वात मोठी संसदीय लोकशाही म्हणून आपण आपली पाठ बडवून घेत आहोत. असे असले तरी आज देशाला कृतीशील महापुरुषांची नितांत गरज आहे. आज सगळीकडे स्त्री शिक्षणाची चळवळ मोठ्या प्रमाणात सक्रीय झाली असली तरी ग्रामीण भागातील शिक्षणाचे प्रमाण म्हणावे तेवढे समाधानकारक दिसत नाहीत.

या वर्षीपासून नवीन शैक्षणिक धोरण २०२० लागू होत आहे. ते लागू झाल्यानंतर त्यातील साधक बाधक परिणाम आपल्यासमोर येतील. असे असले तरी छोट्या छोट्या खेड्यातील, वस्ती-वाडी-तांडा येथील शाळा बंद होता कामा नये. दहावी पर्यंतचे सक्तीचे आणि मोफत शिक्षण हे देशाला खऱ्या अर्थाने तारक ठरणारे आहे. शिक्षणाची गंगा गावागावातून प्रवाही असणे अत्यंत गरजेचे आहे.

एकीकडे विकासाची भाषा करतांना ग्रामीण भागात डोनेशन घेऊन इंग्रजी शिक्षण देणाऱ्या शाळांचे पेव फुटले आहे. असे झाल्यास गोर गरिबांना शिक्षण योग्य पद्धतीने मिळेल का? इतर सर्वच बाबी बरोबर शिक्षणाचे खाजगीकरण करणे कितपत योग्य आहे? छोट्या शाळा बंद करणे योग्य आहे का? याचा सरकारांनी विचार करून देशातील शिक्षण जोतीरावांच्या मार्गदर्शनात आजही पुढे न्यावे. असे होणे म्हणजेच जोतीराव फुल्यांच्या स्वप्नातील भारत उभे करणे होय! जय ज्योतीराव!

- प्रा. डॉ. विठ्ठल खंडुजी जायभाये

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com