मका उत्पादकांना कोट्यवधींचा फटका

गोपाल हागे  
Saturday, 9 November 2019

असे झाले नुकसान...

  • लष्करी अळीपासून वाचलेला मका पावसाने घालवला
  • सततच्या आणि वादळी पावसाने मका प्रभावित
  • कापणी केलेला मक्याचे पावसाने १०० टक्के नुकसान 
  • कणसात पाणी शिरून काळवंडले दाणे; रोगांचे आक्रमण
  • ओला झाल्याने फुटले कोंब 
  • शेतकऱ्यांचा एकरी १५ हजारांचा लागवड खर्चही निघेना

अकोला - राज्यात ऑक्टोबरमधील परतीच्या पावसाने सोंगणी केलेला तसेच उभ्या असलेल्या मक्याचे प्रचंड नुकसान केले आहे. मक्याच्या कणसांमधून जागोजागी कोंब बाहेर पडल्याने उत्पादनाला फटका बसला. राज्यात मक्याचे बहुतांश भागात ५० टक्क्यांवर नुकसान झाले आहे. या शिवाय मक्याचा चारासुद्धा हिरावला गेला आहे. ऑक्टोबरमधील वादळी पावसाने राज्यात १५०० कोटींपेक्षा अधिकचा फटका मका उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. 

राज्यात नाशिक, धुळे, जळगाव, नगर, औरंगाबाद, जालना, बुलडाणा हे मका उत्पादनाचे प्रमुख जिल्हे आहेत. इतर पिकांच्या तुलनेत खरिपात मक्याचे पीक गेल्या काही वर्षांत चांगले येत असल्याने व उत्पादनाची हमखास खात्री निर्माण झाल्याने नवीन शेतकरी मक्याच्या लागवडीकडे वळाले होते. परंतु गेल्या रब्बी हंगामापासून मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव यायला सुरवात झाली. या वर्षी खरिपात लावगड केलेल्या मक्यावर आधीच या अळीने मोठा उच्छाद मांडला होता. यातून वाचलेले पीक ऑक्टोबरमध्ये काढणी दरम्यान झालेल्या वादळी पावसाने ५० टक्क्यांवर खराब झाले. 

धानोरा विटाळी (ता. नांदुरा, जि. बुलडाणा) येथे प्रभाकर नरवाडे यांनी तीन एकरांत खरीप मक्याची लागवड केली होती. काढणीसाठी परिपक्व झालेल्या मक्याची ऑक्टोबर महिन्यात सोंगणी केली. आता पाऊस उघडल्यानंतर कणसे तोडायला सुरवात करणार तोच प्रत्येक कणीस डागाळलेले असल्याचे पाहून ते धास्तावले आहेत. नरवाडे कुटुंबाकडे सहा एकर शेती आहे. पैकी तीन एकरात मका लावलेला आहे. संपूर्ण वर्षाचे आर्थिक नियोजन अवलंबून असलेली पिके हातातून गेल्याने आता उदरनिर्वाहाचा तसेच स्वतःवर असलेले बॅंकेचे कर्ज कसे फेडायचे, हा पेच बनल्याचे ते म्हणाले. नुकसानीची पाहणीसाठी अद्याप कोणताही अधिकारी शेतात आलेला नाही. या संकट काळात शासनाकडून तातडीने मदत देण्याची गरज आहे.

दृष्टिक्षेपात यंदाचे मका पीक आणि नुकसान...
राज्याचे खरीप मका सरासरी क्षेत्र-७३६६६३
यंदा लावगड झालेले क्षेत्र- ८६६००५
सरासरीच्या तुलनेत टक्केवारी- ११८
झालेले नुकसान : सुमारे ५० टक्के
सर्वसाधारण बाजारभाव : १८०० रुपये प्रति क्विंटल
सरासरी उत्पादन : २० क्विंटल
एकूण नुकसान :  १५०० कोटी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maize production loss by rain