आयटीआय प्रवेशाच्या नियमावलीत मोठे बदल; विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी मोबाईल ॲप

Major changes in IIT Admission Rules by Government of Maharashtra
Major changes in IIT Admission Rules by Government of Maharashtra

अहमदनगर : दहावी व बारावीचा निकाल लागला की विद्यार्थी आणि पालकांना प्रवेश कोठे घ्यायचा असा प्रश्‍न पडतो. अनेकजण आयटीआयला पसंदी देता तर काहीजण आवडच्या क्षेत्राकडे जातात. यावर्षी कोरोना व्हायरसमुळे यावर्षी बारावीचे निकाल उशीरा लागले. याच पार्श्वभूमीवर आयटीआय प्रवेशाच्या नियमावलीत सरकारने काही बदल केले आहेत.
कौशल्य विकास व उद्योजकता विभागाअंतर्गत संचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय मार्फत शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये 2013- 14 पासून ऑनलाइन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या निर्णयानुसार औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेश व प्रशिक्षण शुल्क नियमावलीस मान्यता देण्यात आली. मात्र शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेश क्षमतेपेक्षा कमी प्रवेश होऊन दरवर्षी मोठ्या प्रमाणात जागा रिक्त राहतात. औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेश क्षमताचा पूर्ण वापर व्हावा व प्रशिक्षणाच्या १०० टक्के जागा भरल्या जाव्यात म्हणून सरकारने प्रवेश नियमावलीत बदल केले आहेत. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे सहसंचालक डॉ. अनिल जाधव यांच्या अध्यक्षतेखाली यासाठी समिती स्थापन केली होती. या समितीने संचालक व्यवसाय शिक्षण यांच्यामार्फत सरकारला अहवाल सादर केला होतर. या समितीच्या शिफारशी व अन्य घटकांकडून आलेल्या सूचना विचारात घेऊन 2020- 21 या सत्रापासून सुधारित नियमावली जाहीर करण्यात आली आहे. 
यापूर्वी राज्य स्तरावर 30 टक्के जागा व तालुकास्तरावर 70 टक्के जागा हा निकष आता बदलण्यात आला आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आता जिल्हास्तरावर 70 व राज्य स्तरावर 30 टक्के प्रवेश असा बदल करण्यात आला आहे. जिल्हा व राज्य स्तरावर विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी तयार करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना राज्य स्तरावर व अन्य जिल्ह्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेश हवा असल्यास त्याला त्या जिल्ह्यामध्ये निवास व्यवस्थेची चौकशी करणे आवश्यक राहणार आहे. ॲडमिशन पोर्टलवर विद्यार्थ्यांना जिल्हानिहाय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची माहिती व विषयाची सर्व माहिती उपलब्ध केली जाणार आहे. याबरोबर ॲडमिशन पोर्टलवर विषयाची माहिती देणारे व्हिडिओ, गेल्या वर्षीच्या प्रवेशाची माहिती औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना उपलब्ध करुन द्यावी लागणा आहे.  प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचा आवश्यक तो डेटा शिक्षण विभागांतर्गत राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणार आहे. प्रवेशासाठी जनरल चार फेऱ्या घ्यावात. आरक्षणाचे प्रचलित निकष कटाक्षाने पाळले जावेत असेही यामध्ये सांगण्यात आले आहे. विद्यार्थ्यांचे गुण संवर्ग व प्राधान्यक्रम यावरच प्रवेशाचे वाटप करावे, प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रवेश नियंत्रणासाठी प्रवेश नियंत्रण समिती नेमली जाणार आहे. 
प्रवेशासाठी जनरल चार फेऱ्या झाल्यानंतर पारदर्शक पद्धतीने समुपदेशन होणार आहे. या संदर्भात आवश्यक त्या सूचना विचारात घेऊन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य त्या सूचना विचारात घेऊन संचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय यांना देण्यात यावी. खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये व्यवस्थापन कोठ्यामधून आलेले प्रवेश पोर्टलवर अपलोड करणे संस्थांना बंधनकारक राहणार आहे. शासकीय व खासगी औद्योगिक शिक्षण संस्थांच्या बाबतची माहिती वेब पोर्टलवर अपलोड करणे संस्थांना बंधनकारक राहील. अल्पसंख्यांक संस्थांना अल्पसंख्यांक कोट्यातून केलेले प्रवेश वेब पोर्टलवर अपलोड करणे बंधनकारक राहील. संस्था व्यवस्थापन समितीच्या जागांची माहिती देखील पोर्टलवर असावी तसेच या जागा देखील ऑनलाइन पद्धतीने भरल्या जाणार आहेत. या जागांच्या प्रवेशासाठी संस्थेने निश्चित केलेल्या प्रशिक्षण शुल्काची माहिती उपलब्ध असावी. विद्यार्थ्यांना प्रवेशाबाबतची माहिती मोबाईलवर संदेश द्वारे देण्याची व्यवस्था करण्यात यावी. विद्यार्थ्यांना प्रवेशाबद्दल काही अडचण असल्यास जिल्हास्तरावर समुपदेशनाची सुविधा उपलब्ध असावी समुपदेशकांची नावे व दुरध्वनी क्रमांक वेबपोर्टलवर असावेत. वस्तीगृह व उपहारगृहाच्या सुविधेबाबत देखील विद्यार्थ्यांना माहिती देण्यात यावी असेही यामध्ये म्हटले आहे. याबरोबर औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील प्रवेश वाढावेत म्हणून तंत्र शिक्षण संचालनालयातर्फे राबवण्यात आलेल्या स्कूल कनेक्ट कार्यक्रमाप्रमाणे जिल्हा व तालुकास्तरावरुन माध्यमिक शाळांची समन्वय करून प्रवेश प्रोत्साहन अभियान राबविण्यात यावा. विद्यार्थ्यांकडून प्राप्त होणाऱ्या प्रवेश प्रक्रिया संदर्भातील माहिती देण्यात यावी. प्रवेशाकरिता मोबाईल ॲपची निर्मिती करण्यात यावी, असही यामध्ये म्हटले आहे. सरकारने जाहीर केलेल्या निर्णयामध्ये २८ नियम सांगितले आहेत. यात जिल्हा स्तरावर उपल्बध होणाऱ्या रोजगाराच्या संधीची माहिती देखील दिली जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com