
नेमकं काय होते सुपर-६० अभियान
२००९ व २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत अवघ्या काही मतांनी गमावलेल्या आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पिछाडीवर राहीलेल्या एकूण ६० जागा निश्चित करून त्या ठिकाणी नव्याने लढा देऊन त्या ठिकाणी यश संपादित करण्याचा मानस करून सुपर-६० अभियान तांबे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आले.
मुंबई : नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये राज्यात काँग्रेस पक्षाला मिळालेल्या यशामध्ये महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचा सिंहाचा वाटा असल्याचे प्रतिपादन टिळक भवन येथे पार पडलेल्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीवेळी भारतीय काँग्रेस कमिटी सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी केले. यावेळी राज्यात विविध उपक्रम राबवून काँग्रेस पक्षाला यश मिळवून दिल्याबद्दल युवक काँग्रेस अध्यक्ष सत्यजीत तांबे यांचा सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेले यश वाखाणण्याजोगे असून यासाठी युवक काँग्रेसने राबविलेले विविध उपक्रम, कार्यक्रम आणि नवनवीन संकल्पनांचे तोंडभरून कौतुक देखील खर्गे यांनी केले. युवक काँग्रेसने राबविलेले सुपर-६० अभियान आणि देशातील पहिलाच प्रयोग असलेला युवक जाहीरनामा राज्यातील मतदारांना भावला असून कोणत्याही परिस्थितीमध्ये राज्यातील ६०जागांवर विजय मिळवायचाच या उद्देशाने सुपर-६० या अभियानाचे उपस्थितांनी चांगलेच कौतूक केले.
सुपर-६० अभियानातील १२ जागा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला गेल्यानंतर उर्वरित ४८ विधानसभा मतदार संघांचे सूक्ष्म नियोजन करून
त्या ठिकाणी सत्यजीत तांबे यांच्या नेतृत्वा खाली युवक काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन उमेदवारांचा प्रचार केला आणि युवक जाहीरनाम्याच्या प्रतींचे वाटप देखील केले. याच बरोबर जाहीर सभा, कॉर्नर सभा, पदयात्रा व आढावा बैठक यांसारख्या अनेक प्रकारे काँग्रेस उमेदवारांचा प्रचार करण्यावर तांबे यांनी भर दिल्याचे बघायला मिळाले. सत्यजीत तांबे यांनी घेतलेल्या जाहीर सभांमधील बेरोजगारी, आर्थिक मंदी, शेतकरी आत्महत्या, महिला अत्याचार, सरकारची चुकीची धोरणं यांची चिरफाड करणारी आक्रमक भाषणे चर्चेचा विषय ठरली आहे. विशेष म्हणजे सत्यजीत तांबे यांच्या सर्व सभांना युवावर्गाचा भरभरून प्रतिसाद देखील लाभला. याच पार्श्वभूमीवर युवक काँग्रेस अध्यक्ष सत्यजीत तांबे, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी घेतलेले अथक परिश्रम यशस्वी ठरले. आणि सुपर-६० मधील तब्बल २८ जागा काँग्रेसने जिंकल्या.
प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली आणि आखिल भारतीय काँग्रेस कमिटी सरचिटणीस व महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सत्कार समारंभाला देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, अखिल भारतीय काँग्रेस कमिटी सचिव व हिमाचल प्रदेशच्या प्रभारी रजनीताई पाटील, अखिल भारतीय काँग्रेस कमिटी सचिव व तामिळनाडूचे प्रभारी संजय दत्त, प्रदेश काँग्रेस कार्यध्यक्ष आ. डॉ. नितीन राऊत, आ. यशोमती ठाकूर, आ. डॉ. विश्वजीत कदम, विधानपरिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे, आ. विजय वडेट्टीवार, खा. बाळू धानोरकर, के सी पाडवी, किसान काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष नाना पटोले, अखिल भारतीय काँग्रेस कमिटी सचिव अमित देशमुख, वर्षा गायकवाड, संपतकुमार, सोनल पटेल, बी. एम. संदीप, चेला वामशी रेड्डी, विधानपरिषद गटनेते शरद रणपिसे आणि काँग्रेस पक्षाचे सर्व नवनिर्वाचित आमदार, विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
नेमकं काय होते सुपर-६० अभियान
२००९ व २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत अवघ्या काही मतांनी गमावलेल्या आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पिछाडीवर राहीलेल्या एकूण ६० जागा निश्चित करून त्या ठिकाणी नव्याने लढा देऊन त्या ठिकाणी यश संपादित करण्याचा मानस करून सुपर-६० अभियान तांबे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आले.