कोरोना झालेल्यांना ७ दिवस होम आयसोलशनचे बंधन; ‘हे’ नियम पाळा कोरोनापासून मिळेल संरक्षण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

corona
कोरोना झालेल्यांना ७ दिवस होम आयसोलशनचे बंधन; ‘हे’ नियम पाळा कोरोनापासून मिळेल संरक्षण

कोरोना झालेल्यांना ७ दिवस होम आयसोलशनचे बंधन; ‘हे’ नियम पाळा कोरोनापासून मिळेल संरक्षण

सोलापूर : कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू लागला आहे. तीव्र किंवा मध्यम लक्षणे नसलेल्या रुग्णांना त्यांच्याच घरी उपचार घेण्याची मुभा आहे. मात्र, त्या रुग्णाला किमान सात दिवस घराबाहेर पडता येणार नाही असे निर्बंध घालण्यात आले आहेत. उपचार काळात घरातील कोणाच्याही संपर्कात त्या रुग्णाने येवू नये, अशा सूचना देखील त्यास दिल्या जातात.

दरवर्षी उन्हाळ्यातच कोरोनाचा संसर्ग वाढतोय, अशी वस्तुस्थिती आहे. जून २०२२ ते फेब्रुवारी २०२३ या काळात शांत झालेला कोरोना आता पुन्हा जोर धरत आहे. सोलापूर ग्रामीणमध्ये १५ सक्रिय रुग्ण असून त्यात १२ पुरुष व तीन महिलांचा समावेश आहे. तर शहरात ३५ रुग्ण आहेत. दिलासादायक बाब म्हणजे शहर-ग्रामीणमधील बहुतेक रुग्ण त्यांच्याच घरी वैद्यकीय सल्ल्याने उपचार घेत आहेत.

कोरोना वाढतोय, पण घाबरण्यासारखी स्थिती नाही. परंतु, नागरिकांनी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ नुसार खबरदारी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. लक्षणे असल्यास अंगावर काढू नयेत, वयस्क व्यक्ती विशेषत: पूर्वीचे गंभीर आजार असलेल्यांना गर्दीत जावू द्यायचे नाही, असे देखील आरोग्याधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

जिल्ह्यात ५० रुग्ण; ‘सिव्हिल’मध्ये उपचाराची सोय

सोलापूर शहरात सध्या ३५ तर ग्रामीणमध्ये १५ सक्रिय रुग्ण आहेत. जिल्ह्यातील माळशिरस, सांगोला व मोहोळ या तीन तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण नाही. दक्षिण सोलापूर तालुक्यात सर्वाधिक पाच रुग्ण आहेत. बाधित रुग्णामध्ये तीव्र किंवा मध्यम स्वरुपाची लक्षणे असतील आणि त्याला उपचाराची गरज भासल्यास श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार (सिव्हिल) रुग्णालयात सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.

लक्षणे असलेल्यांनी ताबडतोब कोरोनाची चाचणी करून घ्यावी

नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, गर्दीत गेल्यास चेहऱ्यावर मास्क हवा. लक्षणे असलेल्यांनी गर्दीत न फिरता ताबडतोब कोरोनाची चाचणी करून घ्यावी. जेणेकरून संसर्ग वाढणार नाही. प्रतिबंधित लस घ्यावी आणि स्वत:बरोबरच कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेतल्यास निश्चितपणे आपण कोरोनापासून सुरक्षित राहू शकतो.

- डॉ. बसवराज लोहारे, आरोग्याधिकारी, सोलापूर महापालिका

‘हे’ उपाय करा कोरोनापासून मिळेल संरक्षण

- हिरव्या स्वच्छ पालेभाज्या, मोड आलेले कडधान्य असा घ्यावा पौष्टिक आहार

- भरपूर पाणी प्यावे, व्यायाम हवा आणि पुरेशी झोप गरजेचीच

- गर्दीत जावू नये किंवा गर्दीत गेल्यावर चेहऱ्यावर मास्क लावणे आवश्यक

- कोरोनावरील प्रतिबंधित लसीचे वेळोवेळी डोस घेतल्यास कोरोनापासून मिळते संरक्षण