आर्थिक मागास विद्यार्थ्यांसाठी मुंबईत वसतीगृह

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 जुलै 2019

मुबईत पहिले पंजाबराव देशमुख मुलांचे वसतीगृह सुरू होत आहे.

मुंबई: मराठा आरक्षणाच्या निमित्ताने राज्यात लाखोंचे मोर्चे निघाल्यानंतर सरकारने त्याला सकारात्मक प्रतिसाद देत, आर्थिक मागासवर्गातल्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्या अंतर्गत पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाहभत्ता योजने अंतर्गत मुबईत पहिले पंजाबराव देशमुख मुलांचे वसतीगृह सुरू होत आहे.

मुंबईत शैक्षणिक सुविधा उपलब्ध असूनही राहण्याची व्यवस्था नसल्यामुळे अनेक विद्यार्थी शिक्षण घेऊ शकत नाहीत. त्यामुळे मुंबईत या विद्यार्थ्यांसाठी 72 खोल्यांचे वसतिगृह सुरू करण्यात येत आहे. त्याची कायदेशीर पूर्तता झाली असून, या वसतिगृहाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी वसंतदादा पाटील प्रतिष्ठानकडे सोपवण्यात आली आहे.

यासंदर्भात बोलताना वसंतदादा पाटील प्रतिष्ठानचे आप्पासाहेब देसाई म्हणाले, 'मुंबईतील वडाळा स्टेशन जवळ 71खोल्यांचे हे वसतिगृह सूरू करण्यात येणार आहे. या वसतिगृहाच्या हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण झाली असून, वसतिगृहाच्या रंगरंगोटीचे काम अंतिम टप्प्यात आहे. या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येईल. महिन्याला 1 हजार रूपये एवढी कमी शुल्क आकारून विद्यार्थ्यांना ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा आहे, त्यांनी वसंतदादा पाटील प्रतिष्ठानकडे संपर्क साधावा.'

या वसतिगृहात सुमारे 213 विद्यार्थ्यांची व्यवस्था केली जाणार आहे. ऍण्टॉपहिल येथील वडाळा अग्निशमन दलाच्या कार्यालयासमोर हे वसतिगृह सुरू करण्यात येणार आहे. हे वसतिगृह अत्याधुनिक सोयींनी तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून, येथे भोजनालयाचीही वेगळी व्यवस्था करण्यात येणार आहे. या वसतिगृहामुळे अनेक गरिब विद्यार्थ्यांची सोय होणार आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क: 9769735825


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marartha reservation first student hostel at mumbai