‘मराठा आंदोलनामुळे दरदिवशी मोदींची सभा’

भारतीय जनता पक्षाला देशातील मोठ्या जाती संपवायच्या आहेत. त्यासाठी त्यांनी छोट्या-छोट्या जातींना हाताशी धरले आहे. त्याला आमचा विरोध आहे.
Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patilsakal

भारतीय जनता पक्षाला देशातील मोठ्या जाती संपवायच्या आहेत. त्यासाठी त्यांनी छोट्या-छोट्या जातींना हाताशी धरले आहे. त्याला आमचा विरोध आहे. मराठा आरक्षण आंदोलन त्यांनी ज्या पद्धतीने हाताळले त्यामुळेच नरेंद्र मोदींना दरदिवशी सभा घ्याव्या लागत आहेत, असे मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी ‘सकाळ’च्या प्रतिनिधी दीपा कदम यांना दिलेल्या मुलाखतीत सांगितले. मुलाखतीचा संपादित अंश.

प्रश्‍न - लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात मराठा आंदोलनाचा विषय केंद्रस्थानी आहे?

मनोज जरांगे - मी निवडणुकीत सक्रिय नाही. मराठा समाजाच्या हातात निवडणूक आहे. त्यामुळे धास्ती बाळगावीच लागेल. समाजाला मी सांगितलंय, यावेळी ज्याला तुम्हाला पाडायचंय त्याला ताकदीने पाडा. मराठ्यांची धास्ती वाटली पाहिजे.

तुमच्या आंदोलनानंतर मराठा समाज या निवडणुकीत एकजुटीने उतरलेला दिसतो.

- आंदोलनानंतर मराठा संघटित झाला आहे, हे खरंय. गेले शंभर वर्षे मराठा एकत्र नव्हते, आता एकत्र होताहेत. इतरांच्या पोटात का दुखतंय? मराठ्यांनी संघटित होऊ नये, असे ओबीसी नेतृत्वाला वाटते का? ओबीसी जसे एकत्र आहेत तसे आम्हीही एकत्र आलो आहोत. ग्रामीण भागात ओबीसी-मराठा वादच नाही. वाद करायचाच नाही, हे आम्ही ठरवलंय.

आरक्षणाचा पेच संसदेतच सुटू शकतो. मग तुम्ही लोकसभा निवडणूक का लढवली नाही?

- आमचा प्रश्न मराठा आरक्षणाचा नाहीच आहे. आम्ही कुणबी आहोत. आमच्याकडे तशा नोंदी आहेत. आम्ही ओबीसीमध्ये आहोतच. त्यामुळे आम्हाला स्वतंत्र आरक्षण नको आहे. आम्हाला ओबीसीमध्ये आरक्षण हवंय. ५० टक्क्यांवर आरक्षणाची आमची मागणीच नाही. आमचा प्रश्न राज्य सरकारच सोडवू शकते.

तुम्हाला निवडणुकीत विजयाची खात्री नव्हती का?

- खात्री नसण्याचा प्रश्नच नाही! दलित-मुस्लिम-मराठा तिघेही एक झालो असतो तर यांची कुणाचीच एक पण जागा आली नसती. पण आमच्याकडे वेळ कमी होता. राजकारणात बहुमतावर चालते, भावनेवर नाही.

गावागावात मराठा आणि ओबीसी असे गट पडलेले दिसतात. याला जबाबदार कोण?

- मराठा आणि ओबीसी वेगवेगळे आहेत, असे त्यांचे नेते भासवताहेत. आमच्यासोबत ओबीसीही आहेत. वाद कुठेही नाही. नेते भांडण लावायचा प्रयत्न करताहेत. ओबीसी-मराठा वाद असता तर आतापर्यंत जे ओबीसी नेते निवडून आले ते काय केवळ ओबीसी मतांवर आले का? केशरबाई क्षीरसागर तीनदा बीडच्या खासदार होत्या. मराठ्यांनी त्यांना मतदान केले नाही का? गोपीनाथ मुंडे यांच्यावर बीडने अमाप प्रेम केले. प्रीतम मुंडे दोनदा खासदार झाल्या. त्यांना फक्त ओबीसींचीच मते मिळायची? धनंजय मुंडे परळीतून निवडून येतात, तिथे लाखावर मराठ्यांचे मतदान आहे. मराठे विरोधात असते तर मुंडे कुटुंबातले कुणी निवडून आले असते का? त्यांच्या मतदारसंघात मराठे उमेदवार मोठ्या मतांनी हरले आहेत. मराठे-ओबीसी वाद आहे असं फक्त पंकजा मुंडेच का बोलतात? मराठा समाजाने मुंडे कुटुंबावर एवढी माया केली आणि त्यांनाच बोलायचे!

प्रचारादरम्यान ओबीसी उमेदवारांच्या गाड्या अडवल्या जाताहेत. त्याबद्दल आंदोलकांकडे बोट दाखवले जाते...

- या घटनांशी मराठा आंदोलकांचा अजिबात संबंध नाही. त्यांचेच कार्यकर्ते गाड्या अडवतात, व्हिडिओ काढतात आणि ओबीसींना भडकवण्याचा प्रयत्न करतात. ओबीसींच्याही हे लक्षात आले आहे. बीड मतदारसंघात एकही मराठा उमेदवार नाही. पंकजा मुंडे, बजरंग सोनावणे दोघेही ओबीसी आहेत. सोनावणेंकडे कुणबी जात प्रमाणपत्र आहे. बीडमध्ये ओबीसीविरुद्ध ओबीसी लढत आहे. बदनाम मराठा होताहेत.

मराठा आंदोलनाचा निवडणुकीवर काय परिणाम होईल?

- आंदोलनाचा परिणाम राज्यभर होईल. राज्यातले ९३ विधानसभा मतदारसंघ असे आहेत जिथे सगळ्या जाती एकत्र झाल्या तरी केवळ मराठ्यांच्या बळावर ते निवडून येऊ शकतात. ५७ ते ६७ मतदारसंघ असे आहेत जिथे मराठ्यांनी मदत केल्याशिवाय जागाच जिंकू शकत नाहीत.

मराठा-कुणबी आरक्षणाविषयी पंतप्रधान मोदींनी भूमिका घ्यावी, अशी मागणी तुम्ही केली होती!

- पंतप्रधान मोदींना महाराष्ट्रात दरदिवशी सभा घ्यावी लागत आहे. मराठ्यांविषयी प्रचंड द्वेष असणाऱ्या महाराष्ट्रातील त्यांच्या चार-पाच जणांमुळे ही वेळ आली आहे. सुरुवातीला त्यांना सत्ता मिळवण्यासाठी गरिबांची गरज होती, ती आता राहिलेली नाही. आता त्यांना मराठा काय आहे, हे कळलेले दिसते.

तुमचा रोख कोणत्या नेत्यांकडे आहे?

- आमच्या आंदोलनातील महिलांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला; तर देवेंद्र फडणवीस म्हणाले, माझ्या पोलिसांवर हल्ला झाला. आमच्यावर ३६०चे गुन्हे दाखल केले. माझ्यावर ‘एसआयटी’ लावली. देशाच्या इतिहासात आंदोलनातील महिलांना कधी तडीपार केले नव्हते. आंदोलनातल्या मराठा समाजाच्या महिला चोर, दरोडेखोर, खुनी आहेत का? महिलेला तडीपार केले जाते तेव्हा तिचे कुटुंब पार उद्धवस्त होते, हे फडणवीसांना माहिती नाही का? मराठ्यांविषयी द्वेषामुळेच त्यांनी आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतलेले नाहीत. मराठ्यांचा द्वेष करणाऱ्या या नेत्यामुळे मोदींवर ही वेळ आली. मराठ्यांचे आरक्षण द्यावे, नाहीतर अजून फजिती होईल.

मात्र देवेंद्र फडणवीस म्हणतात, यापूर्वीच मराठ्यांना आरक्षण त्यांनीच दिले होते.

- मराठ्यांना आरक्षण दिले आणि घालवले पण त्यांनीच ना! यापूर्वीचा अहवालही त्यांनीच तयार केला होता. त्यानुसार मराठा समाज मागास सिद्ध होत नव्हता, तो आता त्यांनी मागास असल्याचे सिद्ध केले आहे. आम्हाला त्या आरक्षणाची गरजच नाही. आमच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत, आम्ही ओबीसी आहोत. आम्हाला ओबीसी आरक्षण मिळावे.

सरकारने सगेसोयरेचे परिपत्रक काढले आहे. त्याचे अध्यादेश करण्याची तुमची मागणी आहे. मात्र तांत्रिक आणि कायद्याच्या पातळीवर ते टिकणारे नाही.

- सगेसोयरे त्यांना मान्य करावेच लागेल. आमच्यासोबत चर्चा करताना घटनेचे अभ्यासक, माजी न्यायाधीश, राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष, प्रशासकीय अधिकाऱ्यांची फौज घेऊन सरकार आले होते. सगेसोयरे आणि मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय शांत बसणार नाही. २००४मध्ये केलेल्या कायद्यातील सुलभता, अटीशर्तींमध्ये सुधारणांची मागणी आहे. यापूर्वी सरकार म्हणायचे मराठ्यांच्या कुणबी नोंदी नाहीत म्हणून ते ओबीसी नाहीत. आता नोंदी सापडल्यात!

विधानसभा निवडणूक लढवण्याची तुम्ही घोषणा केली आहे. महायुती किंवा महाविकास आघाडीसोबत जाणार का?

- त्यांच्यासोबत गेलो तर त्यांच्यात आणि आमच्यात काय फरक राहिला! मराठे त्यांच्याच राजकारणाला वैतागले आहेत. समाजाला मी दावणीला बांधल्यासारखे होईल. समाजाला ते नकोच आहेत.

तुम्ही स्वतंत्र पक्ष काढणार का?

- मला राजकारणात जायचे नाही. सगेसोयरेची अंमलबजावणी केली तर मला राजकारण करायचे नाही. पण हे जर त्यांनी केले नाही तर २८८ मतदारसंघात सर्व जातीधर्माचे उमेदवार देऊ. सर्व जातीधर्मांना सोबत घेऊन पुढे जायचे आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत तुमचा संवाद चांगला होता. नंतर काय झाले...

- मुख्यमंत्री समाजाचे म्हणून आमच्यासोबत बोलत होते तोपर्यंत आम्हीही सहकार्य केले. मात्र राजकारण्यांसारखे वागायला लागले. आम्हीही त्यांच्याशी तसेच वागू लागलो. फडणवीसांना मी बोलतो म्हणून माझा ‘करेक्ट’ कार्यक्रम करणार, असे ते म्हणाले. आता त्यांना जेवढ्या सभा घ्याव्या लागताहेत त्यावरून त्यांना कळले असेलच कोणाचा ‘करेक्ट’ कार्यक्रम झाला आहे ते.

आंदोलनाची पुढची दिशा काय?

- मराठे पहिल्यासारखे राहिले नाहीत, ते योग्य मार्गावर आहेत. भाजपला संघटित ओबीसींची गरज आहे आणि मराठ्यांची गरज नाही, हा समजच त्यांच्या डोक्यातून आम्ही काढून टाकलाय. मराठ्यांशिवाय त्यांचे पानच हलू शकत नाही, हे दाखवून दिले आहे. मराठे बाजूला झाले की मग छोट्या जातींना हाताशी धरून सत्ता मिळवायची अशी भाजपची योजना आहे. त्यांना देशातल्या मोठ्या जाती संपवायच्या आहेत. छोट्या-छोट्या जाती जवळ करून राज्य करायचे आहे. भाजपला पटेल, गुर्जर, यादव, जाट या मोठ्या जातींना संपवायचे आहे. मराठा ही जात राजकीयदृष्ट्या पूर्णपणे संपवण्याचा त्यांचा विचार आहे. त्यालाच आम्ही रोखणार आहोत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com