मराठी शुद्धलेखनाचे महत्त्व आणि त्यासाठीच्या युक्त्या

भाषेचे नियम पाळून केलेले लेखन म्हणजे शुद्धलेखन, अशी सर्वसाधारण व्याख्या केली जाते
marathi bhasha gaurav din 2022
marathi bhasha gaurav din 2022sakal

भाषेचे नियम पाळून केलेले लेखन म्हणजे शुद्धलेखन, अशी सर्वसाधारण व्याख्या केली जाते. आता शुद्धलेखन म्हणजे काय हे माहिती असलं, तरी त्याचे नियम जोपर्यंत माहिती नाहीत तोपर्यंत निर्भेळ, बिनचूक लिखाण करता येत नाही. मराठी आपली मातृभाषा, आपल्या आईच्या पोटातून आपण ती शिकून येतो. “भाषेचं ज्ञान माणसाला उपजत असतं, त्याच्या आजूबाजूच्या वातावरणामुळे तो आपली भाषा घडवतो,” असं महान तत्त्वज्ञ आणि भाषातज्ज्ञ नोम चोमस्की म्हणतात. माणूस भाषा बोलायला आपोआप शिकतो पण लेखन मात्र त्याला प्रयत्नपूर्वक शिकावे लागते. भाषेचे व्याकरण लेखनाचे प्रमाणीकरण करून भाषेच्या योग्य वापराचे सूत्र शिकवते, त्यामुळे व्याकरण महत्त्वाचं. व्याकरणाच्या प्रभावी वापरामुळे लेखन सुलभ व अर्थवाही होते.

संस्कृत भाषेतून एक शाखा फुटून मराठी भाषेची व्युत्पत्ती झालेली आहे. यामुळे मराठीचा स्वभाव काही अंशी संस्कृतसारखाच आहे. मराठीतील वाक्यरचना ही कर्ता-कर्म-क्रियापद अशी आहे. शब्दक्रम बदलला की मराठी वाक्याचा अर्थ बदलतो. वाक्यरचनेसोबतच शब्दरचनेचेही नियम मराठीत आहेत. व्याकरणातील काना, मात्रा, वेलांट्या, उकार त्यांचे ऱ्हस्व/ दीर्घ हेही अर्थवाही आहेत. या नियमांचे पालन झाले नाही तर अनेकदा वाक्यांचे, शब्दांचे अर्थ योग्य रीतीने लावता येत नाहीत व परिणामी चुकीची माहिती पसरते अथवा अपेक्षित संदेश पोचवला जात नाही.

मराठीच्या शुद्धलेखनासाठी महाराष्ट्र अभ्यास मंडळाने मराठी लेखनाचे १८ नियम केलेले आहेत. हे नियम आत्मसात केल्यास आपले लिखाण निखालसपणे बिनचूक होईल. हे नियम प्रामुख्याने शब्द लेखणविषयी असून अनुस्वार, विरामचिन्हे, काना, मात्रा, वेलांटी, उकार यांची योजना, जोडाक्षरे याबद्दलचे मराठीचे नियम यात सांगितलेले आहेत. याची माहिती तुम्हाला मराठी शुद्धलेखनाचे नियम – मराठी विश्वकोश (marathivishwakosh.org) या वेबसाईटवर मिळेल. हे नियम आत्मसात केल्यास आपले लिखाण निखालसपणे बिनचूक होईल. हे नियम प्रामुख्याने लेखनाविषयी असून अनुस्वार, विरामचिन्हे, काना, मात्रा, वेलांटी, उकार यांची योजना, जोडाक्षरे याबद्दलचे मराठीचे नियम यात सांगितलेले आहेत. शुद्धलेखनासोबतच योग्य भाषा, समर्पक शब्दरचना, लहेजा लेखनाचे मूल्य वाढवतात. उत्तम शब्दसंग्रहाची यासाठी मदत होते. मराठी बृहद्कोश यासाठी नक्कीच उपयोगी ठरेल. याची लिंक https://bruhadkosh.org/ यासोबतच निर्भेळ मराठीत लिहीण्यासाठी शासन व्यवहारासाठी शब्दकोश आणि शास्त्रीय व तांत्रिक परिभाषा कोश मराठी शब्दकोश (marathi.gov.in) अतिशय उपयुक्त आहेत. शासनाने विविध शास्त्रीय व तांत्रिक संज्ञांचे प्रमाणित भाषांतर यात दिलेले आहे. या सामग्रीच्या मदतीने आपल्याला सहजपणे उत्तम मराठी लिहीता बोलता येईल.

मराठी भाषेचा इतिहास पाहायला गेलं तर मराठी भाषेतील पहिला शिलालेख इकर्नाटकातल्या श्रवणबेळगोळमधील गोमाटेश्वरच्या मूर्तीखाली शिलालेख लिहिलेला आहे. याचे साल आहे इ. स. ९७३. म्हणजेच मराठी वाङमयाची लेखन परंपरा आपल्याला इ. स. ९७३ पासून शोधता येते. तेव्हापासून मराठी भाषा वापरात असल्याचा हा लिखित पुरावा असल्याने, मराठी भाषा इ. स. ९७३ साली अस्तित्वात होती हे सिद्ध करता येते. हे लेखन परंपरेचे महत्त्व आहे.

अक्षर म्हणजे जे क्षर नाही, ज्याचा क्षय होत नाही, जे चिरंतन आहे. अक्षराच्या या चिरंतनत्वामूळेच इतिहासाचा अभ्यास करताना हस्तलिखिते, शिलालेख, ताम्रपट, भूर्जपत्रे हे महत्त्वाचे दस्त-ऐवज मानले जातात. संज्ञापन अर्थात कम्युनिकेशनमध्ये सुद्धा लिखित संज्ञापनास महत्त्व आहे कारण ते पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाते. बोलण्यापेक्षाही कागदावर लिहिलेल्या शब्दाला व्यावहारिक जगात अनन्यसाधारण महत्त्व आहे, कारण ते टिकणारे आहे, अधिक विश्वासार्ह आहे. यावरून लिखित साहित्याचे महत्त्व आपल्याला लक्षात यावे.

विविध प्रकारचा अभ्यास करताना आधीचे दस्त ऐवज तपासले जातात, जुनी माहिती पाहिली जाते. त्यावरून तत्कालिन परिस्थितीबाबत अंदाज बांधला जातो. समजा आजपासून काही दशकांनंतर असे एखादे चुकीच्या रीतीने लिहिलेले कागदपत्र कोणी अभ्यासास घेतेले तर त्यास योग्य बोध होईल का? चुकीच्या लेखनामुळे संशोधकास होणारे आकलन अर्थात चुकीचे असेल. चुकीच्या लेखनाचे अनर्थ समजून घेण्यासाठी समस्त मराठी बांधवांना ‘ध चा मा करणे’ या म्हणीमागची कथा ठावूक आहेच. आजकाल वृत्तपत्रे आणि निरनिराळ्या वेबसाईट्सवरील अशुद्ध लेखणामुळे घडलेले अर्थाचे अनर्थ आणि विनोद आपण पाहतोच. समाजमाध्यमांवरून अनेकजण याबद्दल टीका होते. काही वेळा यातून नामुष्कीची वेळ ओढवते. तुम्हाला यात रूची असेल आणि फेसबूकवर तुम्ही सक्रिय असाल तर उसंडू आणि मुरावि या संज्ञा तुम्हाला नक्की माहित असतील. त्यामुळे योग्य अर्थ आणि जतनाच्या दृष्टीने लेखन परंपरेत शुद्धलेखनाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.

सुमारे १२०० वर्षांचा इतिहास असलेली आपली मराठी भाषा समस्त मराठी बांधवांची अस्मिता आहे. हिंदी, इंग्रजीच्या रेट्यात आपली मातृभाषा, आपली मराठी आवर्जून वापरत तिचा आग्रह धरला पाहिजे. तिची मुळं घट्ट केली पाहिजेत, ती आणखी धट्ट रूजवली पाहिजे. आज मराठी भाषा दिनानिमित्त या सर्व गोष्टींचे पुनरूच्चारण करणे आवश्यक आहे.

- तेजाली चं. शहासने

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com