गुड इव्हनिंग! आज दिवसभरात काय झालं?

Good Evening
Good Evening

1) देश :

- #PMModionDiscovery : मोदी दिसणार 'ManvsWild'मध्ये!

डिस्कव्हरी वाहिनीवरचा सर्वात लोकप्रिय शो Man Vs Wild मध्ये आता चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी दिसणार आहेत. Man Vs Wild च्या या भागात मोदींसोबत लोकप्रिय निवेदक बेअर ग्रेल्सही दिसेल. 12 ऑगस्टला रात्री 9 वाजता हा भाग दाखवला जाईल.

बेअर ग्रेल्सने मोदींच्या शोच्या व्हिडिओचा काही भाग ट्विट केला आहे. यात मोदी ग्रेल्सचे स्वागत करत आहेत. दोघेही उत्तराखंडमधील जीम कॉर्बेट राष्ट्रीय अभयारण्यात फिरत आहेत. '180 देशांमधील नागरिकांना पंतप्रधान नरेंद्र मोदींची दुसरी आणि वेगळी बाजू दिसेल. मोदी या शोमध्ये प्राणी संरक्षण व पर्यावर संवर्धनाबाबत संवाद साधतील,' असे ट्विट त्याने केले आहे.

- येडियुरप्पांनी जिंकला विश्वासदर्शक ठराव; बहुमत सिद्ध

बंगळूर : कर्नाटकच्या विधिमंडळात आज (सोमवार) मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकत बहुमत मिळविले. भाजपने कर्नाटक विधानसभेत 106 मतांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला. तर, विरोधात 100 मते पडली.

येडियुरप्पा यांनी रविवारीच आपण बहुमत सिद्ध करू असा विश्‍वास व्यक्त केला होता. काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या (जेडीएस) मागील सरकारने तयार केलेले अर्थविधेयक कोणत्याही बदलाशिवाय विधिमंडळात सादर केले जाईल. अर्थविषयक विधेयक विधिमंडळात मंजूर होणे गरजेचे आहे; कारण त्याशिवाय आम्हाला राज्य कारभाराचा गाडा हाकता येणार नाही, असेही येडियुरप्पा म्हणाले होते.

विधानसभेचे अध्यक्ष के. आर. रमेशकुमार यांनी पक्षांतरबंदी कायद्याचा आधार घेत रविवारी चौदा बंडखोर आमदारांना अपात्र ठरविले. ही अपात्रता 2023 पर्यंत म्हणजे विधिमंडळाची मुदत संपेपर्यंत कायम राहील. यामुळे अपात्र ठरलेल्या एकूण बंडखोरांची संख्या सतरावर आली आहे. बंडखोर आमदारांच्या अपात्रतेमुळे एकूण विधिमंडळाचे संख्याबळ घटून भाजपचा सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला होता.

2) ग्लोबल :

- इस्त्राईलमध्येही झळकले मोदींचे पोस्टर; प्रचारासाठी वापर

तेल अविव : आंतरराष्ट्रीय पातळीवर भारत व इस्त्राईलचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. तसेच मोदी व इस्त्राईलचे अध्यक्ष बेंजामिन नेत्यानाहू यांची मैत्री जगात प्रसिद्ध आहे. आता यांच्या मैत्रीचे पडसाद इस्त्राईलमधील पोस्टवर दिसू लागले आहेत. आगामी निवडणूकांसाठी नेत्यानाहू यांनी मोदींचे फोटो त्यांच्या प्रचाराच्या पोस्टर्सवर लावले आहेत.  

इस्त्राईलमध्ये सप्टेंबर महिन्यात निवडणूका होणार आहेत. या निवडणूकांच्या प्रचाराची तयारी सुरू झाली असून नेत्यानाहू यांनी आपल्या प्रचाराच्या बॅनरवर मोदी व त्यांचा हास्तांदोलन करतानाचा फोटो वापरला आहे व हे पोस्टर इस्त्राईलमध्ये रस्तोरस्ती लावले आहेत. 

मतदारांना आकर्षित करण्यासाठी नेत्यानाहू यांनी अनेक राष्ट्राध्यक्षांचे फोटो लावले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्या फोटोंचा वापर नेतन्याहू निवडणूक प्रचारासाठी करत आहेत.

3) महाराष्ट्र : 

International Tiger Day : महाराष्ट्रात वाघांच्या संख्येत 65 टक्क्यांनी वाढ 

मुंबई : राज्यात २०१४ साली १९० वाघ होते ते वाढून आता २०१९ मध्ये ३१२ इतके झाले आहेत. ही वाढ अंदाजे  ६५ टक्के आहे, स्थानिकांच्या सहभागातून वन विभागाने व्याघ्र संवर्धनासाठी जे प्रयत्न केले त्याचे हे यश असल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

देशातील वाघांची संख्या २९६७

भारतीय वन्यजीव संस्था, डेहरादून आणि राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण यांच्यावतीने देशात दर चार वर्षांनी व्याघ्र गणना करण्यात येते. त्यानुसार देशात पहिली व्याघ्र गणना २००६ मध्ये झाली. तेंव्हा देशात १४११ वाघ होते, २०१० मध्ये दुसरी गणना झाली तेंव्हा  १७०६, २०१४ मध्ये तिसरी गणना झाली तेंव्हा देशात २२२६ वाघ होते. वाघांच्या या संख्येत वाढ होऊन आता देशात २९६७ वाघ झाले आहेत.

महाराष्ट्रातील व्याघ्रसंवर्धनाला भरीव यश

महाराष्ट्रात २००६ साली १०३ वाघ होते. ते २०१० मध्ये वाढून १६८ झाले. २०१४ मध्ये झालेल्या व्याघ्र गणनेत ही संख्या आणखी वाढून १९० झाली. तर मागील चार वर्षात राज्यातील वाघांच्या संख्येत अंदाजे ६५ टक्के वाढ होऊन आता ही संख्या ३१२ इतकी झाली आहे. वाघांच्या संख्येत महाराष्ट्र देशात पाचव्या स्थानावरून चौथ्या स्थानावर आला आहे.

राज्यात सहा व्याघ्र प्रकल्प

राज्यात बोर, मेळघाट, पेंच, नवेगाव नागझिरा आणि सह्याद्री, ताडोबा-अंधारी असे सहा व्याघ्र प्रकल्प आहेत. या सहा व्याघ्रप्रकल्पाच्या क्षेत्रात स्थानिकांच्या सहभागातून वाघांचे संरक्षण आणि संवर्धन करण्याला वन विभागाने प्राधान्य दिले आहे. 

व्याघ्रसंवर्धनात  पहिली पाच राज्ये

देशात मध्यप्रदेश राज्यात वाघांची संख्या ३०८ वरुन ५२६ इतकी झाली आहे. हे राज्य प्रथम क्रमांकावर आहे. त्यानंतर कर्नाटक राज्यातील वाघांची संख्या ४०६ वरुन ५२४ इतकी झाली आहे. हे राज्य दुसऱ्या क्रमांकावर आहे. व्याघ्रसंवर्धनात तिसरा क्रमांक उत्तराखंड राज्याने पटकावला असून येथील वाघांची संख्या ३४० वरुन ४४२ इतकी झाली आहे.  महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर असून राज्यातील वाघांची संख्या १९० वरुन ३१२ इतकी झाली आहे.  पाचव्या स्थानावर तामिळनाडू राज्य असून येथील वाघांची संख्या २२९ वरुन २६४ झाली आहे.

4) पुणे :

- प्रवाशांनो सावधान! मुंबई-पुणे द्रुतगती प्रवास धोकादायक

लोणावळा : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर बोरघाटात आडोशी बोगद्यानजीक द्रुतगती मार्गावर 'शोल्डर लेन' खचली आहे. द्रुतगती मार्ग व लगतचा भराव यादरम्यान मोठी भेग पडल्याने अपघाताबरोबर द्रुतगती मार्गासही धोका निर्माण झाला आहे. लोणावळा,खंडाळ्यासह घाटादरम्यान मोठा पाऊस पडत आहे.

गेल्या आठवड्यात आडोशी बोगद्याजवळ दरडी कोसळण्याच्या लागोपाठ दोन घटना घडल्या आहे. बोरघाटात शेकडो कोटी रुपये खर्च करुनही दरडींचा धोका आहे. त्यामुळे प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. मुंबईहून पुण्याच्या दिशेने येताना आडोशी बोगद्यालगत द्रुतगती मार्गालगत शोल्डर लेन दरम्यान मोठी भेग पडली असल्याने मार्गास धोका निर्माण झाला आहे. त्याचबरोबर आडोशीनजीक काही ठिकाणी द्रुतगती मार्गास तडे गेले आहे.

5) क्रीडा : 

- वेस्ट इंडीजच्या शेल्डनने केला धोनीला सॅल्यूट

नली दिल्ली : वेस्ट इंडीजचा वेगवान गोलंदाज शेल्डन कॉट्रेल याने धोनीच्या देशप्रेमाचे तोंडभरुन कौतुक केले आहे. धोनीने विंडीज दौऱ्यातून माघार घेत दोन महिने निम लष्करी दलात प्रशिक्षण घेण्याचा निर्णय घेतला आहे. 

कॉट्रेलने धोनीचा व्हिडिओ त्याच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर करत त्याचे कौतुक केले आहे. ''हा माणूस मैदानावर अनेकांचे प्रेरणास्थान आहे. मात्र, मैदानाबाहेर ही माणूस प्रेरणादायी आहे. त्याच्या कामाशिवायही को देशाला बरेच काही देतो. धोनी आणि त्याची पत्नी यांचे देशावरील आणि एकमेकांवरील प्रेम अत्यंत प्रेरणादायी आहे,'' असे ट्विट त्याने केले आहे. 

6) मनोरंजन :

#KGFChapter2 : संजूबाबा पुन्हा 'खलनायक'; 'केजीएफ चॅप्टर 2'चे पोस्टर लॉन्च

'केजीएफ चॅप्टर 2'ची सगळीकडेच चर्चा सुरू असताना आज रिलीज झालेल्या पोस्टरमुळे पुन्हा एकदा केजीएफ चॅप्टर 2 ट्रेंडिंगमध्ये आला आहे. याचं कारणंही विशेष आहे. अभिनेता संजय दत्त हा या चित्रपटात एका मुख्य भूमिकेत झळकणार आहे. ही भूमिका 'अधिरा' नावाच्या खलनायकाची असले. केजीएफचा चाहता वर्ग मोठा आहे, त्यात आता संजय दत्तची भर पडल्यामुळे आता प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

विशेष म्हणजे आज संजय दत्तचा साठावा वाढदिवस आहे आणि त्याच्या वाढदिवशीच केजीएफ चॅप्टर 2 च्या खलनायकाचा पहिला लूक सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. संजय दत्तने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर हा लूक शेअर करत चाहत्यांचे अभार मानले आहेत. 'अधीराच्या निमित्ताने मला या चित्रपटाचा भाग होता आला यामुळे मी अत्यंत आनंदी आहे. धन्यवाद!' असा संदेशही त्याने या पोस्टमध्ये दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com