Coronavirus: परीक्षाही पुढे ढकलल्या; सार्वजनिक कार्यक्रमांना मज्जाव

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 17 मार्च 2020

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या डीएड. बीएड, अभियांत्रिकी व वैद्यकीय महाविद्यालये आणि विद्यापीठ स्तरावरील परीक्षा पुढे ढकलण्याचा; तसेच राज्यातील सर्व ग्रामीण भागातीलही शाळा ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने आज घेतला. 

ग्रामीण भागातीलही शाळा बंद
मुंबई - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या डीएड. बीएड, अभियांत्रिकी व वैद्यकीय महाविद्यालये आणि विद्यापीठ स्तरावरील परीक्षा पुढे ढकलण्याचा; तसेच राज्यातील सर्व ग्रामीण भागातीलही शाळा ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने आज घेतला. 

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधून सूचना दिल्या. तत्पूर्वी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी उच्च व तंत्रशिक्षण विभागाची आढावा बैठक घेतली. या बैठकीत वैद्यकीय शिक्षण, उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या अखत्यारीत येणारे डीएड, बीएड, इंजिनिअरिंग महाविद्यालये, विद्यापीठ स्तरावरील परीक्षा आदी पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या बैठकीतील निर्णयांची माहिती देताना सामंत म्हणाले, ‘‘सर्व परीक्षा ३१ मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यानंतर परीक्षा घेण्याबाबतचा निर्णय २७-२८ मार्च रोजी होणाऱ्या बैठकीत घेण्यात येईल.’’

‘‘राज्यात २५ मार्च २०२० पर्यंत प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना ‘वर्क फ्रॉम होम’ अर्थात घरी राहून काम करण्याची मुभा देण्यात आली आहे. या कालावधीत झालेल्या परीक्षांचे पेपर तपासणी, प्रश्नपत्रिका तयार करायच्या असतील त्या तयार करणे आदी गोष्टी त्यांना करता येणे शक्‍य आहे,’’ असे ते म्हणाले. 

या निर्णयामुळे ३ हजार १२० महाविद्यालयांची परीक्षा पुढे ढकलण्यात आली; तसेच महाविद्यालयीन स्तरावरील खासगी शिकविण्याही बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

आज ‘वर्षा’ निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. या वेळी उद्योग मंत्री सुभाष देसाई, आरोग्य मंत्री राजेश टोपे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, मुख्य सचिव अजोय मेहता, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास उपस्थित होते.

ग्रामीण भागातील शाळाही बंद करतानाच, सार्वजनिक स्वच्छतागृह या ठिकाणी सॅनिटायझर, साबण आणि पाणी उपलब्ध राहील यांची दक्षता घ्यावी, असेही त्यांनी सांगितले. 

परदेशातील सहलींना पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. राज्य शासन कोरोनाचा प्रभाव रोखण्यासाठी आवश्‍यक त्या सर्व उपाययोजना करीत आहे. नागरिकांनी दक्ष राहावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी या वेळी केले.

महत्त्वपूर्ण निर्णय 
    राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या.
    ग्रामीण भागातीलही शाळा बंद ठेवणार.
    कोरोनाच्या उपाययोजनांसाठी तातडीच्या निधीसाठी कोकण आणि पुणे विभागीय आयुक्तांना प्रत्येकी १५ आणि १० कोटी; तर नागपूर, अमरावती, औरंगाबाद आणि नाशिक विभागीय आयुक्तांना प्रत्येक ५ कोटी रुपये असे ४५ कोटींचा पहिला हप्ता देणार.
    ज्यांना १०० टक्के घरी क्वारंटाईन करण्याच्या सूचना आहेत, त्यांच्या डाव्या हातावर शिक्का मारावा; जेणेकरून समाजात या व्यक्ती वावरताना आढळल्यास त्याची ओळख पटेल.
    सक्तीचे विलगीकरण करणाऱ्या देशांच्या यादीमध्ये राज्य सरकारकडून दुबई, सौदी अरेबिया आणि अमेरिका यांचाही समावेश 
    नागरिकांनी शासकीय कार्यालयांत गर्दी न करता ई-मेलच्या माध्यमातून तक्रारी, अर्ज पाठवावेत. त्यावर जिल्हा प्रशासनाने सात दिवसांत कार्यवाही करावी.

भाविकांची गर्दी बंद करा
कोरोनाचा प्रादुर्भाव थांबविण्यास सर्वोच्च प्राधान्य असून, राज्य शासनाने उचललेल्या पावलांमुळे अद्यापतरी राज्यात परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र, गर्दी थांबविण्यासाठी काटेकोर प्रयत्न करावेच लागतील. या दृष्टीने सर्व धर्मीयांच्या प्रार्थना स्थळांवर नियमित पूजा-अर्चा सुरू ठेवून भाविकांची गर्दी मात्र थांबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले. साथरोग प्रतिबंध कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांची असून, रोगाचे हे संकट टळल्यानंतर धार्मिक सण, उत्सव पूर्ववत साजरे करता येतील. याक्षणी जनतेचे आरोग्य हे एकमेव प्राधान्य आहे. कोणत्याही पक्ष-संघटनांचे राजकीय कार्यक्रम, समारंभ, मेळावे रोगाचा प्रादुर्भाव असल्यामुळे होऊच नयेत, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

दृष्टिक्षेपात...
राज्य
    मुंबईतील सिद्धीविनायक मंदिर तसेच तुळजापूरचे भवानीमाता मंदिर दर्शनासाठी बंद
    पुण्यातील कसबा गणपती व दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर बंद 
    अजंठा, वेरूळ लेणी मंगळवारपासून सात एप्रिलपर्यंत पर्यटकांसाठी बंद
    नृसिंहवाडीतील दत्त मंदिरात भाविकांना प्रवेश बंद, धार्मिक विधी सुरू
    संत गजानन महाराज मंदिर ३१ पर्यंत बंद
देश
    जम्मू-काश्मीरमधील उधमपूरमधील सर्व हॉटेल ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश
    आसाममध्ये सर्व सरकारी व खासगी कार्यालयांमध्ये बायोमेट्रिक हजेरी ३१ मार्चपर्यंत बंद
    दिल्लीत मोबाईल वॉशबेसिन योजना
    दिल्लीत ५० हून अधिक लोकांच्या कार्यक्रमांवर बंदी
    पश्चिम बंगालमधील स्थानिक स्वराज्यसंस्था निवडणुका पुढे ढकलल्या
    आसाममधील व्याघ्र प्रकल्प २९ मार्चपर्यंत बंद
    गुजरातमधील राष्ट्रीय उद्याने बंद
    कर्तारपूर कॉरिडोरही तात्पुरता बंद
    जवाहर नवोदय विद्यालयांना २१ मार्च ते २५ मे सुटी जाहीर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi News about Coronavirus Affect Exams postponed