स्वातंत्र्य चळवळीत संघ परिवार कुठं होता?; शिवसेनेचा प्रश्न

वृत्तसंस्था
Thursday, 27 February 2020

वीर सावरकरांच्या विषयावर सरकारची कोंडी करू, असे भाजपच्या महाराष्ट्रातील नेत्यांनी जाहीर केले. याचा अर्थ स्पष्ट आहे. सावरकर हा भाजपसाठी आदर किंवा श्रद्धेचा विषय राहिला नसून फक्त राजकारणाचा विषय बनला आहे.

महाराष्ट्र विधानसभेत स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव प्रस्ताव आणून महाविकास आघाडीतील शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे. त्यावरून शिवसेनेने 'सामना'तून त्यांच्यावर निशाणा साधला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भाजपला वीर सावरकरांचा आलेला पुळका खोटा आहे. वीर सावरकरांचे स्वातंत्र्य लढ्यात मोठे योगदान होतेच, पण स्वातंत्र्य चळवळीत भाजप किंवा तेव्हाचा ‘संघ’ परिवार कोठे होता?, असा प्रश्न या लेखातून उपस्थित केला जात आहे. 

वीर सावरकरांच्या विषयावर सरकारची कोंडी करू, असे भाजपच्या महाराष्ट्रातील नेत्यांनी जाहीर केले. याचा अर्थ स्पष्ट आहे. सावरकर हा भाजपसाठी आदर किंवा श्रद्धेचा विषय राहिला नसून फक्त राजकारणाचा विषय बनला आहे. वीर सावरकर हा फक्त चर्चेचा विषय नाही, तर कृतीचा आणि जगण्याचा विषय आहे. वीर सावरकर हे त्याग, तत्त्व, तेज आणि संघर्षाच्या बाबतीत सगळ्यांनाच पुरून उरले व हयातभर त्यांचे स्थान अढळ राहिले. सावरकरांच्या स्मृतिदिनी त्यांचे पुण्यस्मरण सगळ्यांनीच केले. त्यांच्या स्मरणाचे ढोंग आज जे करीत आहेत त्यांना सावरकर खरेच कळले काय? जे स्वतःच कोंडीत सापडले आहेत त्यांनी दुसऱ्यांची कोंडी करण्याची भाषा करू नये. महाराष्ट्रात सरकारची कोंडी करण्यापेक्षा केंद्रातील भाजप सरकारने वीर सावरकरांचा काय सन्मान राखला यावर महाराष्ट्रातील फडणवीस, पाटील, मुनगंटीवार, शेलार आदी मंडळींनी प्रश्न उभे केले पाहिजेत.

कालच्या प्रजासत्ताक दिनीही मोदी सरकारने वीर सावरकरांना ‘भारतरत्न’ का जाहीर केला नाही? यावर महाराष्ट्रातील हे नव सावरकरप्रेमी काही प्रकाश टाकणार आहेत काय? फडणवीस मुख्यमंत्री असताना वीर सावरकरांना ‘भारतरत्न’ देण्याविषयी दोन पत्रे पंतप्रधान मोदी यांना पाठवली होती. त्या पत्रांची दखल केंद्राने घेतली नाही हा महाराष्ट्राचा आणि वीर सावरकरांचाही अपमान आहे! भारतीय जनता पक्षाला सावरकरांचे विज्ञाननिष्ठ हिंदुत्व, गोमातेसंदर्भातील परखड विचार पेलवणारे आहेत काय? भाजपच्या पुढाऱ्यांनी जाहीर केले आहे की, ‘माझी जन्मठेप’ या आत्मकथेचे आम्ही जाहीर वाचन करू! भाजपला इतके कष्ट घेण्याचे कारण नाही. महाराष्ट्राच्या घराघरांत हा ज्वलंत ग्रंथ कधीच पोहोचला आहे.

वीर सावरकरांचे स्वातंत्र्य लढ्यात मोठे योगदान होतेच, पण स्वातंत्र्य चळवळीत भाजप किंवा तेव्हाचा ‘संघ’ परिवार कोठे होता? १९४७ साली स्वातंत्र्यदिनही संघाने मानला नाही व राष्ट्रध्वज तिरंगा संघ मुख्यालयावर फडकवला नाही. काही ठिकाणी तिरंग्याचा घोर अपमान करण्याचा प्रयत्न झाला हे सर्व इतिहासात नोंदले गेले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर सरदार पटेल यांनी दोन वेळा बंदी आणली. दोन्ही वेळेला ‘बंदी’ उठवताना सरदारांनी एक अट कायम ठेवली ती म्हणजे, ‘‘तिरंगा ध्वज राष्ट्रध्वज आहे. तो मानावाच लागेल.’’ ही अट गोळवलकर गुरुजींनी मान्य केली, पण २००२ पर्यंत संघाने हा शब्द पाळला नाही, असे ‘रेकॉर्ड’ सांगतेय.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi News about Saamana Editorial Article