खडसेंचा घटस्थापनेला राष्ट्रवादीत प्रवेश ? असे ठरलेय प्रवेशाचे सुत्र

सचिन जोशी
Tuesday, 13 October 2020

मुंबई वारीतच खडसेंच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाचे सूत्र काय असेल, हे ठरल्याचे बोलले जात आहे. पक्ष प्रवेशानंतर संघटनात्मक पद, विधानपरिषदेचे सदस्यत्व असे सूत्र यामागे ठरले.

जळगाव  : माजी मंत्री व भाजपच्या राज्य नेतृत्वावर नाराज नेते एकनाथराव खडसेंच्या संभाव्य पक्षांतराची चर्चा तीव्र झाली आहे. महिनाभरापासून सुरु असलेल्या या चर्चेस शनिवारी पूर्णविराम मिळणार असून घटस्थापनेच्या मुहूर्ताला १७ ऑक्टोबरला खडसेंचा राष्ट्रवादीतील प्रवेश होणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. राष्ट्रवादीतील संघटनात्मक पद व आमदारकी देण्यावर पक्षांतराचे हे ‘सूत्र’ ठरल्याचेही सांगितले जात आहे. 

फडणवीस सरकारमधून मंत्रिमंडळाचा राजीनामा दिल्यापासून खडसे पक्षावर नाराज आहेत. विधानसभेला त्यांना उमेदवारी नाकारल्यानंतर विधानपरिषदेवरही त्यांना संधी दिली नाही. त्यामुळे त्यांनी नाराजी वाढून गेल्या महिन्यात खडसेंनी थेट फडणवीसांचे नाव घेऊन टीका केली होती. तेव्हापासून खडसेंच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाची चर्चा सुरु झाली. 

मुंबईवारीत ठरले सूत्र 
दोन आठवड्यांपूर्वी शरद पवारांनी खडसेंच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाबाबत चाचपणी केली. गेल्याच आठवड्यात खडसे मुंबईला जाऊन आले. त्यावेळी खडसे- पवारांच्या भेटीची चर्चा रंगली. परंतु, या मुंबई वारीतच खडसेंच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाचे सूत्र काय असेल, हे ठरल्याचे बोलले जात आहे. पक्ष प्रवेशानंतर संघटनात्मक पद, विधानपरिषदेचे सदस्यत्व असे सूत्र यामागे ठरले असून ठाकरे सरकारच्या पुढील मंत्रिमंडळ विस्तारात खडसेंना मंत्रिपद असे सूत्र ठरल्याचे सांगितले जात आहे. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Khadse's entry into the NCP is likely to be an important occasion for navratri