राजकीय पक्षांच्या प्रचारसभांवर 'केशरी' ढग 

सागर आव्हाड
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

यंदा राजकीय पक्षांच्या प्रचारसभांवर आणि मतदानावर कधी नव्हे ते पावसाचं सावट आहे. हवामान विभागाने पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केलाय.

यंदा राजकीय पक्षांच्या प्रचारसभांवर आणि मतदानावर कधी नव्हे ते पावसाचं सावट आहे. हवामान विभागाने पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केलाय. याचा अर्थ म्हणजे कोणत्याही क्षणी नैसर्गिक आपत्ती येऊ शकते. त्यामुळे सावधान रहा. हवामान खात्याच्या या इशाऱ्यामुळे अनेक उमेदवारांची चिंता वाढलीय.

राज्यातल्या पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. त्यामुळे या जिल्ह्यांच्या काही भागांमध्ये पुढील दोन दिवस 60 ते 110 मिलिमीटर पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तर मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडेल, असाही अंदाज आहे. 

तेलंगणा ते केरळदरम्यान द्रोणीय स्थिती निर्माण झाल्याने तामिळनाडू ते दक्षिण मध्य महाराष्ट्रादरम्यानच्या भागात चक्राकार वारे सक्रिय झालेत. परिणामी मध्य व दक्षिण महाराष्ट्र तसेच कोकणात काही ठिकाणी विजांच्या प्रचंड कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

विशेष म्हणजे गेल्या 24 तासांत मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. तर कोकण आणि घाटमाथ्यावर काही भागांत अतिमुसळधार पाऊस पडलाय. यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची पुण्यातली पहिलीच सभा गारपीटीसह मुसळधार पावसामुळे रद्द करावी लागली. पुढच्या काही दिवसांत इतरही नेत्यांच्या जाहीरसभा गुंडाळण्याची पाळी येऊ शकते.

Web Title : marathi news orange alert issued by IMD political parties in maharashtra may face issue in election campaign


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news orange alert issued by IMD political parties in maharashtra may face issue in election campaign