पतंगराव कदम यांचे मुंबईत निधन 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 मार्च 2018

मुंबई -  कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. पतंगराव कदम (वय 72) यांचे शुक्रवारी मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. पोटविकाराने ते आजारी होते. अनेक दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांचे पार्थिव उद्या (ता. 10) पुण्यातील भारती विद्यापीठात सकाळी 10.30 वाजता आणण्यात येणार आहे. सांगली जिल्ह्यातील कडेगाव या मूळ गावी उद्या सायंकाळी चार वाजता कदम यांच्यावर अंत्यसंस्कार होतील. 

मुंबई -  कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. पतंगराव कदम (वय 72) यांचे शुक्रवारी मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. पोटविकाराने ते आजारी होते. अनेक दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांचे पार्थिव उद्या (ता. 10) पुण्यातील भारती विद्यापीठात सकाळी 10.30 वाजता आणण्यात येणार आहे. सांगली जिल्ह्यातील कडेगाव या मूळ गावी उद्या सायंकाळी चार वाजता कदम यांच्यावर अंत्यसंस्कार होतील. 

शिक्षक म्हणून कारकीर्द सुरू करणाऱ्या कदम यांनी राजकरणात स्वत:चा ठसा उमटवलाच; शिवाय भारती विद्यापीठसारखी शिक्षण संस्थाही उभारली. कदम यांच्यावर काही दिवसांपासून लीलावती रुग्णालयात उपचार सुरू होते. दोन दिवसांपासून ते व्हेंटिलेटरवर होते. त्यांना उपचारांसाठी अमेरिकेत घेऊन जाण्याचाही विचार होता. मात्र, त्यापूर्वीच त्यांचे निधन झाले. शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास डॉक्‍टरांनी त्यांना मृत घोषित केले. 

सांगली जिल्ह्यातील सोनसळ या गावात 1945 मध्ये कदम यांचा जन्म झाला होता. त्यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण सातारा जिल्ह्यातच झाले. दहावी उत्तीर्ण होणारे ते त्यांच्या गावातील पहिले विद्यार्थी होते. शिक्षक पदविकेसाठी ते पुण्यात गेले. त्यानंतर त्यांनी रयत शिक्षण संस्थेच्या शाळेत शिक्षकाची नोकरी स्वीकारली. तेथून त्यांचा पीएडीपर्यंतचा प्रवास सुरू झाला. ते सात वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांनी शिक्षण, उद्योग, महसूल, वन, मदत व पुर्नवस अशा विविध विभागाचे मंत्रिपद सांभाळले होते. 

शिक्षण संस्था उभारण्याचे त्यांचे ध्येय होते. भारती विद्यापीठ ही देशातील नामांकित शिक्षण संस्था त्यांनी सुरू केली. या विद्यापीठात सुमारे चार लाखांहून अधिक विद्यार्थी शिकत आहेत. राज्यातील ज्येष्ठ राजकारणी म्हणून त्यांना सर्वच राजकीय पक्षांमध्ये मानाचे स्थान होते. कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी शुक्रवारी त्यांची रुग्णालयात जावून भेट घेतली होती.

अल्पपरिचय- 

पतंगराव श्रीपतराव कदम. 
जन्म : 8 जानेवारी 1944, मु. पो.सोनसळ, ता.कडेगाव (जि. सांगली) 
शिक्षण : एम. ए., एल. एल. बी., पी. एचडी. 
राजकीय कार्य : 
1985 ते 1991 आमदार 
1991 ते मे 1995 राज्याचे शिक्षणमंत्री. 
ऑक्‍टोबर 1999 ते ऑक्‍टोंबर 2004 : उद्योग,वाणिज्य आणि संसदीय कार्यमंत्री. 
नोव्हेंबर 2004 : सहकार,मदत व पुनर्वसन मंत्री. 
महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस समिती अध्यक्ष. 
डिसेंबर 2008 : महसूल,मदत पुनर्वसन, भूकंप पुनर्वसन मंत्री, शालेश शिक्षण मंत्री. 
मार्च 2009 : महसूलमंत्री महाराष्ट्र राज्य. 
नोव्हेंबर 2009 : वनमंत्री महाराष्ट्र राज्य. 
19 नोव्हेंबर 2010 ते 2014 : वने, मदत व पुनर्वसन, भूकंप पुनर्वसन मंत्री महाराष्ट्र 
2014 ते आजअखेर आमदार. 

सदस्य : 
बोर्ड ऑफ डायरेक्‍टर ऑफ महाराष्ट्र राज्य रस्ते वहातुक महामंडळ - 6 वर्षे. 
पुणे विद्यापीठ : सिनेट आणि कार्यकारिणी सदस्य - 12 वर्षे. 
मुंबई विद्यापीठ : सिनेट आणि कार्यकारिणीचे सदस्य -12 वर्षे. 
राज्याच्या विविध समित्या आणि उपसमित्यावर कायदेशीर सल्लागार. 
कुलपतींद्वारा नियुक्त : सिनेट कोल्हापूर शिवाजी विद्यापीठ. 
अध्यक्ष : न्यू बॉम्बे स्पोर्टस असोसिएशन. 

संचालक : 
महाराष्ट्र स्टेट को- ऑप.कंझुमरर्स फेडरेशन,नवी दिल्ली. 
महाराष्ट्र स्टेट को-ऑप.मार्केटिंग फेडरेशन. 
ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्‍निकल एज्यकेशन,नवी दिल्ली. 
दि गव्हर्निंग कौन्सिल ऑफ कर्वे इन्स्टिट्युट ऑफ सोशल सासन्स पुणे. 

विद्यमान पदे : 
संस्थापक : भारती विद्यापीठ पुणे. 
कुलपती : भारती विद्यापीठ पुणे. 
आमदार : पलूस-कडेगाव मतदारसंघ 
एक्‍झिक्‍युटिव्ह कमिटी ऍन्ड मॅनेंजिंग कौन्सिल -रयत शिक्षण संस्था,सातारा. 
महाराष्ट्र राज्य शिक्षण सल्लागार समिती. 
दी स्टेअरिंग कमिटी ऑफ ऑल इंडिया टीचर्स कॉंग्रेस. 
आखिल भारतीय मराठी शिक्षण परिषद,गव्हर्नमेंट कौन्सिल ऑफ आयएमएम,पुणे. 
टॉप मॅनेजमेंट क्‍लब पुणे. 
विश्‍वस्त : महात्मा गांधी हॉस्पिटल पुणे. 
अध्यक्ष : महात्मा गांधी रिसर्च सेंटर पुणे. 
उपाध्यक्ष : सर्वोदय शिक्षण संस्था. 
संचालक : महाराष्ट्र स्टेट को-ऑप.कौन्सिल मुंबई. 
सभासद : डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे. 

आजीव सभासद : 
स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था,कोल्हापूर. 
सिम्बोयोसिस एज्युकेशन संस्था पुणे. 

विशेष : 
शिक्षण, जलसंपदा, सहकारी, बॅंकींग, ग्रामविकास, वाहतूक, यात्रा, प्रवास, शेती, उद्योग, 
युवा आणि सामाजिक स्वाथ्य, दलित आणि आदिवासी महिलांच्या विकासासाठी कार्य. 

Web Title: marathi news patangrao kadam passed away mumbai sangli Lilavati Hospital