शिष्याच्या विनंतीनंतर शिकार सोडणारे गुरु, चित्तमपल्लींनी सांगितली आठवण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिष्याच्या विनंतीनंतर शिकार सोडणारे गुरु, चित्तमपल्लींनी सांगितली आठवण

अरण्यऋषी मारुती चित्तमपल्ली हे त्यांचा नव्वदावा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यानिमित्त सोलापूरमध्ये विवेक देशपांडे यांनी घेतलेल्या मुलाखतीमध्ये काही आठवणींना उजाळा दिला.

शिष्याच्या विनंतीनंतर शिकार सोडणारे गुरु, चित्तमपल्लींनी सांगितली आठवण

अरण्यऋषी मारुती चित्तमपल्ली हे त्यांचा नव्वदावा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यानिमित्त सोलापूरमध्ये विवेक देशपांडे यांनी घेतलेल्या मुलाखतीमध्ये काही आठवणींना उजाळा दिला. ३६ वर्षे वनाधिकारी म्हणून नोकरी आणि त्यानंतर आजही जंगलांचा अभ्यास करणारे, प्राणीजीवन अभ्यासणाऱ्या मारुती चितमपल्लींनी गुरु माधवराव पाटील यांचा किस्सा सांगितला. त्यांच्याबद्दल बोलताना चित्तमपल्ली म्हणाले की, माधवराव पाटील यांच्याकडून वनविद्या शिकता आली. माधवराव हे फार मोठे शिकारी होते. माझे गुरु जंगल वाचन करणारे होते. त्यामुळे ते मला आवडायचे. त्यांनी माझ्या विनंतीमुळे शिकार सोडली. त्यांच्यासोबत १२ वर्षे फिरलो. तसा माणूस मिळणार नाही.

वयाच्या नव्वदाव्या मारुती चित्तमपल्ली यांची उर्जा प्रेरणा देणारी आहे. त्यांच्याशी संवाद साधताना त्यांची दिनचर्या, पुस्तक वाचन याबद्दल अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्या. सध्या वयोमानाने आणि प्रकृतीमुळे जंगल फिरणं शक्य नाही. पण जितकी जंगलं पाहिली ती जशीच्या तशी स्मृतीत आहेत. खूप साऱ्या आठवणी असल्याचे चित्तमपल्ली सांगतात. या वयातही पहाटे चार वाजता उठतात. योगासने, प्राणायम करतात आणि थोडं वाचन अशी दिवसाची सुरुवात होते. त्यानंतर दिवसभरातील नेहमीची कामे असा दिनक्रम त्यांचा असतो. अनेक जंगलं पाहिली पण आवडतं जंगल कोणंत असं विचारलं असता ते म्हणाले की, आवडतं जंगल नवेगाव बांध, त्याच्या बाजुला असलेलं जंगल. मला आजही ते आवडतं असं चित्तमपल्ली म्हणाले.

जुन्या सहकाऱ्यांबाबत विचारले असता चित्तमपल्ली म्हणाले की, जुन्यापैकी काही सहकारी आज हयात नाहीत, त्यांची आठवण येते. त्यांच्याबद्दल लिखाण केलंय. त्यांच्यासोबत अनेक जंगलांमध्ये फिरलो. त्यातले माधवराव हे फार मोठे शिकारी होते. माझे गुरु. जंगल वाचन करणारे होते. त्यामुळे ते मला आवडायचे. त्यांनी माझ्या विनंतीमुळे शिकार सोडली. त्यांच्यासोबत १२ वर्षे फिरलो. तसा माणूस मिळणार नाही अशा शब्दात चित्तमपल्ली यांनी आठवणी जाग्या केल्या.

आयुष्यात बरंच जंगल, वनसंपत्ती, निसर्गावर वाचन, लेखन झालं. आता आणखी काही करायचं आहे का याबाबत बोलताना ते म्हणाले की, अजून वृक्षकोष पूर्ण करायचा आहे. मत्स्यकोष पूर्ण करायचा राहिलाय. काही लिहिलेलं आहे ते छान एडिट करायचं आहे. चकवा चांदणचा दुसरा भाग यावा अशी अनेकांची इच्छा आहे. आधी लिहिलंय त्याच्यानंतरही बरंच काही समृद्ध जीवन अनुभवलं त्याबद्दल लिहिण्याबद्दल सुचवलं आहे. चित्तमपल्ली हे पूर्णपणे शाकाहारी आहेत. ते म्हणतात की, रोज प्राणायम, योगासने करून तब्येत चांगली राहिली. तरुणांचे व्यायामाकडे दुर्लक्ष होते. चोवीस तास हातात मोबाइल असतो. भेटायला आलेले लोक बोलता बोलता झोपतात.

पुस्तक वाचनाची आवड आणि ती पुस्तके आपल्यापर्यंत कशी पोहोचली याच्या आठवणी सांगताना ते म्हणतात की, मी भंडारकर इन्सिट्टियूटचा लाइफ मेंबर आहे. त्या ग्रंथालायात एकावेळी चार पुस्तकं मिळायची. ते पोस्टानी पाठवत असत. ती पुस्तके वाचून झाली की आपण पोस्टाने परत पाठवायची. अशी ब्रिटिश लायब्ररी होती. पुण्यात आणि मुंबईतही होती. त्याचाही मी लाइफ मेंबर होतो. ते वाइल्डलाइफच्या पुस्तकांची यादी पाठवायचे. त्यातली चार पुस्तके निवडून दिली की पुस्तके मिळायची. त्यामुळे जास्त वाचन झालं. त्या ग्रंथालयाच्या ग्रंथपालांना आदर होता. ते देशातील इतर शाखांमधून पुस्तके मिळवून द्यायचे. भंडारकरमुळे माझी मोठ्या लोकांच्या भेटी झाल्या असेही त्यांनी सांगितले.

loading image
go to top