मराठा आरक्षणासंदर्भात दोन डिसेंबरला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक 

भारत नागणे 
Saturday, 7 November 2020

पोलिसांनी मोडून काढला मोर्चा 
आज विविध मराठा संघाटनांनी एकत्रित येत काढलेला पंढरपूर ते मंत्रालय पायी दिंडी मोर्चा आज पोलिस प्रशासनाने मोडून काढला. त्यानंतर प्रमुख आंदोलनकांची खासगी गाड्यातून पुण्याकडे रवानगी केली. पायी दिंडी मोर्चा रद्द झाल्यानंतर आक्रमक झालेल्या मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी पोलिस प्रशासनाच्या या दडपशाहीचा निषेध करत इंदापूर भागातून आलेले कार्यकर्ते पायी निघाले असता, त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर आज दिवसभर पंढरपुरात तणावाची स्थिती निर्माण झाली होती. 

पंढरपूर ः मराठा समाजाच्या न्याय मागण्यांसंदर्भात पुढील महिन्यात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या समवेत बैठक होणार आहे. बैठकीत आरक्षणाबाबत चर्चा करण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी आजचा पंढरपूर ते मंत्रालय पायी दिंडी मोर्चा स्थगित केल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक धनंजय साखळकर यांनी आज दिली. 

आज पुणे येथील कॉन्सील हॉलमध्ये मुख्य सचिव संजयसिंह चौहान यांच्या उपस्थितीत मराठा समन्वयांकाची बैठक झाली. त्यामध्ये मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासोबत मुंबईत दोन डिसेंबरला बैठक होणार आहे. या बैठकीत आरक्षणासंदर्भात अधिक चर्चा करून इतर मागण्या मान्य करण्याचे आश्‍वासन सरकारकडून देण्यात आले. सकारात्मक चर्चेनंतर आजचा पायी दिंडी मोर्चा स्थगित केल्याचे जाहीर केले. बैठकीला मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक महेश डोंगरे, किरण घाडगे, संदीप मांडवे, संदीप मुटकूळे, रामभाऊ गायकवाड उपस्थित होते. दरम्यान, आज पोलिसांनी पायी दिंडी मोर्चा रोखल्यानंतर मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांना खासगी गाडीने पुण्यात नेले होते. 

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासह इतर प्रमुख मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चा, सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती ठोक मोर्चा या प्रमुख संघटनांनी मागील आठ दिवसांपूर्वी पंढरपूर ते मंत्रालय पायी दिंडी मोर्चाची हाक दिली होती. दोन दिवसांपासून मोर्चाची तयारी सुरु होती. दरम्यान, आज राज्यभरातून मराठा बांधव पंढरपुरात दाखल होण्यासाठी आले असता, पोलिसांनी या कार्यकर्त्यांची नाकाबंदी केली होती. त्यामुळे अनेक कार्यकर्त्यांना पंढरपुरात येता आले नाही. सकाळपासूनच काही आंदोलक शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर जमा झाले होते. मोर्चाच्या पार्श्‍वभूमीवर शुक्रवारी (ता. 6) रात्री 12 वाजलेपासूनच मंदिर परिसरासह इतर भागात संचारबंदी लागू केली होती. त्यामुळे शहरात व विठ्ठल मंदिर परिसराला पोलिस छावणीचे स्वरुप आले होते. आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सुमारे 450 हून अधिक पोलिस आणि अधिकाऱ्यांचा तगडा पोलिस बंदोबस्त ठेवला होता. जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते आणि उपअधीक्षक अतुल झेंडे सकाळपासूनच शहरात ठाण मांडून होते. 
चर्चेनंतर सकाळी 11 वाजता दहा कार्यकर्त्यांना नामदेव पायरीचे दर्शन घेण्यासाठी परवानगी दिली. नामदेव पायरीचे दर्शन घेतल्यानंतर मोर्चा स्टेशनरोड मार्गे नवीन एसटी बसस्थानकासमोर आला असता पुणे विभागात आचारसंहिता असल्याने लॉग मार्च काढता येणार नसल्याचे कारण सांगत पोलिसांनी मोर्चाला रोखले. मोर्चा रोखल्याने यावेळी पोलिस आणि मराठा समन्वयकांमध्ये काहीवेळ तणाव निर्माण झाला. पोलिस उपअधीक्षक अतुल झेंडे यांनी सामजंस्याची भूमिका घेत आंदोलकांची समजूत काढली. शेवटी चर्चेनंतर खासगी दहा गाड्यामधून पुण्यापर्यंत जाण्याचा निर्णय झाला. त्यानुसार प्रमुख कार्यकर्ते दुपारी पोलिस बंदोबस्तामध्ये पुणेच्या दिशेने रवाना झाले. 

संपादन ः संतोष सिरसट 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Meeting with Chief Minister Uddhav Thackeray on December 2 regarding Maratha reservation