तलाठ्यांची बैठक बोलावली आणि मुख्यमंत्री यशवंतराव म्हणाले, तुम्हीच सांगा मी राजीनामा देऊ का? 

file photo
file photo

नांदेड : माझा कष्टकरी माणूस कुठलासा किरकोळ प्रश्न घेऊन सत्तेतल्या म्होरक्याकडं जातो. एक तर त्याला हा गडी गठतच नाही. पीए वगैरे जातीची पूजा करून, त्यांना मस्का लावून साहेबांची वेळ घ्यायची. त्यासाठी कामधंदा सोडून बंगल्यावर बसायचं. एक तास, दोन तास आणि कितीही तास..एवढं करुनही साहेबांची भेट होईलच याची गॅरंटी नाही. इकडून- तिकडून झालीच भेट तर तक्रारीची मनापासून तरफदारी नाही. 'बघू, पाहू' अशी कमजोर भाषा. पुढं विषय जैसे थे. आपण लोकप्रतिनिधी आहोत. लोकांचे प्रश्न मांडणं आणि मुदतीच्या आत ते सोडवणं ही आपल्या कारकीर्दीची पहिली किरकोळ कसोटी असते. याचा कवडीचाही करारनामा माहीत नसलेले हे म्होरके कुठं आणि आपण लोकांचे सेवक आहोत असा कळवळा काळजात जपणारे यशवंतरावजींसारखे सत्तेत राहूनही निर्व्याज समाजकारण करणारे सेनापती कुठं!

यावरून एक प्रसंग आठवला. कधीकाळी आमच्या काकांनी सांगितलेला. आमच्या हदगाववरुन तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण नागपूर अधिवेशनाला चालले होते. मानवाडी फाट्याजवळ एक वृध्द शेतकरी झाडाखाली बसला होता. आजच्या सारखी वाहनांची वर्दळ नव्हती तेव्हा. चुकपाट गाड्या धावत रस्त्यावरुन. त्या गाड्यांना हात दाखवून थांबण्याचा त्या शेतकऱ्याचा प्रयत्न. त्याला कोणी दाद देत नव्हते. साहेबांच्या गाड्यांचा ताफा तिथूनच चाललेला. साहेबांनी पाहिले. एक वृद्ध गृहस्थ हात उंचावून गाडी थांबवण्याचा केविलवाणा प्रयत्न करतो आहे. हे पाहून साहेबांनी क्षणात चालकाला गाडी थांबवण्यास सांगितले. शेतकऱ्याजवळ गेले. 'काय चाललं बाबा' म्हणून हातात हात घेतले. 'काही नाही मालक. मव्हा लेक चार दिसापसून हदगावला खेटे घालायला. तलाठी का कोण मन्तेत ते भेटतच नाही. काल भेटला पण पैसे देल्याबिगर तुव्हं काम व्हणार नाही मून सांगितलं. मालक मी पल्डो लालबावटेवाला.मला का सहन व्हयना ही गोष्ट. मनून पोरगं नको नको मनतानी निघालो मी त्याच्या पाठीमागून हदगावला.' 

त्या म्हाताऱ्याच्या सुडक्यातील वऱ्हाडीची अर्धी भाकर आणि ठेचा खाल्ला

यशवंतरावानी म्हाताऱ्या शेतकऱ्याची कैफीयत ऐकून घेतली. पीएला काही सूचना केल्या. 'बाबा , काळजी नका करु. होईल तुमचं काम. जा तुम्ही गावाकडं परत. 'असं म्हणत त्या वृध्द इसमाचे पुन्हा हात हातात घेतले. एवढ्यावरच थांबतील ते यशवंतराव कसले. त्यांनी त्या म्हाताऱ्या इसमाचे नाव, गाव सगळी चौकशी केली. त्या म्हाताऱ्याच्या सुडक्यातील वऱ्हाडीची अर्धी भाकर आणि ठेचा खाल्ला. आपण एका राज्याच्या मुख्यमंत्र्याशी बोलत आहोत, त्याने आपली भाकरी खाल्ली ह्या गोष्टी त्या बिचार्‍याच्या ध्यानीमनीही नव्हत्या.

तुम्हीच सांगा मी राजीनामा देऊ का? 

यशवंतरावजी नागपूरला पोहचले खरे. पण त्यांच्या मनातून ऐंशी वर्षाचा तो शेतकरी हलेना. त्यांनी आयुक्तांना बोलावून घेतले. काही तातडीच्या सूचना केल्या. तलाठ्यांची बैठक बोलावली. त्या बैठकीत त्या शेतकऱ्याची कैफीयत कथन केली. 'शेतकऱ्याची सातबारासाठी अडवणूक होत असेल. चिरीमिरी घेतल्याशिवाय काम होत नसेल तर राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मला राहण्याचा काय अधिकार आहे. तुम्हीच सांगा मी राजीनामा देऊ का? 'सभागृहात शांतता पसरली. सगळे वातावरण स्तब्ध झाले. तलाठी मंडळीच्या लक्षात आले. त्यांचे चेहरे पाहण्यासारखे झाले. घटना साधी आणि किरकोळ. परंतु एका नडलेल्या शेतकऱ्यासाठी राजीनाम्याची सिध्दता ठेवणारा हा माणूस केवढा मोठा ! म्हणूनच यशवंतराव चव्हाण हा माणूस ठरतो अपवादात्मक राजकारणी. वर्तमान व्यवस्थेच्या घातपातामुळे व्यथीत झालेल्या शेतकऱ्याच्या मदतीला धावून जाणारे अपवादभूत यशवंतराव! म्हणूनच ठरतात सदैव वंदनीय. पुन्हा पुन्हा स्मरावे असे. नव्हेच ही दंतकथा. वास्तवाला खेटून उभी असलेली सत्यकथेचे वर्णन घेतले आहे नांदेडचे प्रसिध्द साहित्यिक प्रा. डाॅ. जगदीश कदम यांच्या फेसबुक पेजवरुन साभार. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com