मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी पावसाची शक्यता 

प्रतिनिधी
Thursday, 25 June 2020

आज मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात, मेघगर्जना, विजांसह पाऊस पडणार आहे. उद्या कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे, तर विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडण्याचा अंदाज.

पुणे - मॉन्सूनच्या पावसाने राज्याच्या बहुतांशी भागांत उघडीप दिली आहे. बुधवारी (ता. २४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकण, विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. आज (ता. २५) मध्य महाराष्ट्र, विदर्भात वादळी पावसाची शक्यता आहे, तर कोकणात काही ठिकाणी आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

मॉन्सून राज्यात दाखल झाल्यानंतर राज्याच्या बहुतांशी भागांत पावसाने दडी मारली आहे. अनेक ठिकाणी मॉन्सूनच्या सरी बरसल्याच नाहीत. अनेक ठिकाणी पेरणी झाली असून, पिकांना पाण्याची आवश्‍यकता आहे. मात्र, पावसाने उघडीप दिल्याने या पिकांना पाणी द्यावे लागत आहे. उन्हाचा वाढलेला चटका, ढगाळ हवामानामुळे उकाड्यात वाढ झाली आहे. तर, दुपारनंतर पश्‍चिम विदर्भ, मराठवाड्यात ढगांची दाटी झाली होती. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

राजस्थानपासून बिहारपर्यंत असलेला कमी दाबाचा पट्टा उत्तरेकडे सरकणार आहे. मध्य प्रदेश आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत आहेत. आज (ता. २५) मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात, मेघगर्जना, विजांसह पाऊस पडणार आहे. उद्या (ता. २६) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे, तर विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

बुधवारी (ता. २४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत - हवामान विभाग) : 
कोकण : सुधागडपाली २६, कणकवली २८, कुडाळ ५४, मालवण ५४, मुलदे (कृषी) ५८, रामेश्वर १६, सावंतवाडी १९, वेंगुर्ला ६३. 
मध्य महाराष्ट्र : अमळनेर २९, इगतपुरी २२. 
मराठवाडा : देवणी १०, सोनपेठ १७. 
विदर्भ : जेवती २६, मूल २३, अहेरी २५, चामोर्शी १५, मुलचेरा ४४, सिरोंचा २६. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: meteorological department forecast heavy rains in Central Maharashtra,Marathwada