राज्यात पावसाचा अंदाज; उन्हाचा चटकाही वाढणार 

rain
rain

पुणे - राज्यात उन्हाचा ताप वाढत असल्याने तापमानाचा पारा सातत्याने चढता आहे. मंगळवारी (ता.७) अकोला येथे उच्चांकी ४१.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. राज्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान असल्याने शुक्रवारी (ता.१०) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. उन्हाचा चटकाही कायम राहण्याची शक्यता आहे. 

एप्रिल महिना सुरू होताच, राज्यात उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. महाबळेश्‍वर वगळता जवळपास सर्वच ठिकाणी तापमानाचा पारा पस्तिशीपार गेला आहे. मालेगाव, जळगाव, सोलापूर, परभणी, ब्रह्मपुरी येथे तापमान ४० अंशांच्या पुढे आहे, तर अनेक ठिकाणी तापमान ३७ ते ४० अंशाच्या दरम्यान आहे. मंगळवारी (ता.७) राज्यात ढगाळ हवामान असल्याने उकाड्यातही वाढ झाली. 

मध्य प्रदेश आणि विदर्भ परिसरावर समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती असून, त्यापासून तामिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. यामुळे राज्यात पावसाला पोषक हवामान होत आहे. आज (ता.८) पूर्व विदर्भातील नागपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे तर उर्वरित राज्यात उन्हाचा चटका वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

मंगळवारी (ता. ७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल व किमान (कंसात) तापमान, (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३७.६, जळगाव ४०.५, धुळे ३९.६, कोल्हापूर ३६.६, महाबळेश्‍वर ३०.८, मालेगाव ४१.०, नाशिक ३७.०, निफाड ३५.२, सांगली ३४.७, सातारा ३८.४, सोलापूर ४०.४, डहाणू ३४.१, सांताक्रूझ ३४.२, रत्नागिरी ३३.०, औरंगाबाद ३८.३, परभणी ४०.३, अकोला ४१.४, अमरावती ३९.४, बुलडाणा ३७.८, ब्रह्मपुरी ४०.०, गोंदिया ३९.५, नागपूर ३९.२, वर्धा ३९.५. 

नांदेड जिल्ह्यात गारपिटीसह पाऊस 
नांदेड जिल्ह्यात सोमवारी (ता.६) सायंकाळी मध्यम ते जोरदार पावसासह गारपीट झाल्यामुळे ज्वारी,गहू, हरभरा, हळद,फळपिके, भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले. नांदेड जिल्ह्यातील कंधार, मुखेड, देगलूर, नांदेड, मुदखेड, अर्धापूर, हदगाव, किनवट, हिमायतनगर, भोकर, उमरी, लोहा आदी तालुक्यांतील ४० मंडळांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस झाला. कंधार तालुक्यातील बाचोटी, मानसपूरी, फुलवळ, अंबुलगा, वाखरड, पानशेवडी, बोरी बु., चिंचोली आदी गाव शिवारात वादळी वाऱ्यासह गारपीटही झाली. यामुळे आंबा, संत्रा, कलिंगड, खरबूज आदी फळपिके, टोमॅटो, वांगी, कांदे आदी भाजीपाला पिके, उन्हाळी भुईमूग, उन्हाळी ज्वारी, मका आदी पिकांनाही फटका बसला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com