पंढरपूरच्या वहिनींनी बनवलेली पुरणपोळी एम एफ हुसेन कधीच विसरले नाहीत MF Hussain | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

M F Hussain

पंढरपूरच्या वहिनींनी बनवलेली पुरणपोळी एम एफ हुसेन कधीच विसरले नाहीत

भारताचे जगप्रसिद्ध चित्रकार एम एफ हुसेन यांची आज स्मृतिदिन आहे. ९ जून २०११ मध्ये त्यांचं निधन झालं. ते कतारमध्ये स्थायिक झाले होते. मकबुल फिदा हुसेन म्हणजेच एम एफ हुसेन यांचं हृद्यविकाराने वयाच्या ९५ व्या वर्षी निधन झालं होतं. हिंदु देवी -देवतांची विवादास्पद पेंटींग्ज काढल्याप्रकरणी एम एफ हुसैन यांना रोषाला सामोरे जावे लागले होते. (MF Hussain visited birthplace Pandharpur)

पंढरपूरचा जन्म

एमएफ हुसेन यांचा जन्म महाराष्ट्रातील पंढरपूर येथे झाला होता. वडील फिदा हुसेन आणि आई जैनब हुसेन अतिशय हालाखीच्या परिस्थितीत संसाराचा गाडा ओढत होते. पण एम एफ हुसेन अवघे दोन ते तीन वर्षांचे असताना त्यांच्या आई जैनब यांचा मृत्यू झाला होता. कुपोषणामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जातं. आईच्या निधनानंतर त्यांचं कुटुंब मध्यप्रदेशात गेले आणि त्यानंतर गुजरातमध्ये स्थायिक झालं.

आंतरराष्ट्रीय पातळीवर ख्याती-

१९५० च्या दरम्यान एम एफ हुसैन यांनी काढलेल्या पेंटींग्जना युरोपात मोठा चाहतावर्ग निर्माण झाला. अतिशय दारिद्र्यात आणि गरीबीत ते आपले बालपण जगले होते. एम एफ हुसेन या अवलियाच्या कुंचल्यातून भन्नाट पेंटींग तयार झाल्या, त्यांच्याकडे सतत ब्रश असायचा, अगदी गाण ऐकत साकारलेल्या पेटींग्जना प्रचंड मोठी किंमत मिळाली. त्यांच्या एक पेंटींग अडीच कोटींना विकलं गेलं होतं. हुसेन यांच्या अनेक पेटींग्जचा या रामायण, महाभारत, भारताची स्वातंत्र्य चळवळ आणि महात्मा गांधी आणि मदर तेरेसा यांच्याविषयीच्या होत्या. १९७३ साली त्यांना पद्मभूषण आणि १९९१ साली पद्मविभूषण ने सन्मानित करण्यात आलं होतं.

वडील म्हणाले, ''तु टेलरींगचं प्रशिक्षण घे '-

एम एफ हुसैन यांनी मॅट्रीक पर्यंतच शिक्षण घेतलं होतं. यानंतर आपल्याला शिक्षणात रस नसून मला पेटींग्ज करायचं असल्याचं त्यांनी वडीलांना सांगितलं होतं. पेटींग करायला डीग्रीची गरज नसल्याचं त्यांनी वडीलांना पटवून सांगितलं. तेव्हा वडीलांनी तुझी चित्रकला चांगली आहे,मग तू टेलरकडे काम शिक असं म्हंटलं होतं. पण त्यानंतर एम एफ हुसैन मुंबईला गेले. तिथे आठ आण्यावर ते पेटींग्ज काढायचे. राज कपूर याच्या सेटवरही त्यांनी पेटींग्ज काढल्या होत्या.

एम एफ हुसैन यांचं कुटुंब जरी इंदुरमध्ये स्थायिक झालं होतं तरी ते वयाच्या दहाव्या वर्षापर्यंत वडीलांबरोबर पंढरपुरला येत होते. अशी आठवण त्यांची मावस वहीनी जैबुनबी खुद्दबुद्दीन बोहरा -शेख आणि नातेवाईक सांगतात. एम एफ हुसैन यांचा पंढरपूरमध्ये सत्कार करण्यात आला होता. तेव्हा एम एफ हुसैन यांचं वय ८५ च्या जवळपास असल्याचं इब्राहीम बोहरी सांगतात. पण बालपणाच्या त्यांच्या आठवणी मात्र तितक्याच ताज्या होत्या. त्यांना आपलं बालपण लख्ख आठवत होतं. कार्यक्रमानंतर एम एफ हुसैन यांना त्यांचे शेजारी आणि नातेवाईक भेटले आणि घरी येण्याचा आग्रह केला होता.

पंढरपूरमध्ये आल्यावर आईच्या आठवणीने गहीवरले -

दुसऱ्या दिवशी इब्राहीम बोहरी यांच्या घरी ते गेले. त्यांच्या आत्या म्हणजे एम एफ हुसैन यांच्या मावस वहिनी जैबुनबी यांनी त्याच्या केसांना तेलाची मसाज करुन दिली होती. आणि त्यांच्यासाठी खास अस्सल महाराष्ट्रीयन पुरणपोळीचा स्वयंपाक केला होता. तसंच बिर्याणीही बनवली होती. त्यांना जे आवडेल ते खातील म्हणून हे पदार्थ बनविले होते असं त्या सांगतात. त्यांनी पुरणपोळी कधीच खाल्ली नव्हती. त्यामुळे त्यांना पुरणपोळी खूप आवडल्याचं जैबुनबी सांगतात. ''मी माझ्या आईच्या घरात जेवतोय'', असं ते जेवताना वारंवार म्हणत होते. आईविषयी त्यांना खूप प्रेम आणि आदर होता. अशी आठवण जैबुनबी यांनी सांगितली. जैबुनबी यांचं वय आता ८२ वर्ष आहे.

पंढरपूरमध्ये राहण्याची अखेरची इच्छा राहीली अपूरी -

भलेही ते आंतरराष्ट्रीय पातळीवरचे प्रसिद्ध व्यक्ती होते..पण त्यांच्या हृद्यात पंढरपूर वसलेलं होतं. म्हणूनच आपल्याला आयुष्यातीस शेवटचा काळ पंढरपुरात जगायचाय असं ते म्हणत. पण त्यांच्या पेटींगवरचा वाद वाढल्याने त्यांना देश सोडावा लागला आणि त्यांची अखेरची इच्छा पुर्ण झालीच नाही. ईब्राहीम बोहरा सांगतात कार्यक्रम रात्री उशीरा सुरु झाला होता. त्याआधी गेस्ट हाऊसवर पोहोचल्यावर ते व्यायाम करत होते. ते फिटनेस विषयी प्रचंड जागरुक होते. ते विठोबाच्या दर्शनालाही गेले होते. विठोबाचे दर्शन घेताना त्यांनी अश्रुंना वाट करुन दिली होती.

हेही वाचा: जनतेच्या मनातील मुख्यमंत्री ते विधानपरिषदेची हुकलेली उमेदवारी, पंकजा मुंडेंचा राजकीय प्रवास

२००६ साली हिंदु देवदेवतांची विवादास्पद चित्र रेखाटल्यामुळे एम एफ हुसैन वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. त्यानंतर त्यांच्याविरोधातही अनेक खटले भरले होते. यानंतर ते कतारमध्ये गेले आणि २०१० साली त्यांनी कतार देशाचं नागरिकत्व स्वीकारलं होतं. खटल्यांच्या सुनावणी हजर न राहिल्यामुळए त्यांची संपत्ती जप्त कऱण्यात आली होती . हिंदु देव देवतांच्या विवादास्पद चित्रानंतर त्यांना मोठा विरोघ आणि रोषाला सामोरे जावं लागलं. त्यातूनत १९९८ साली त्यांच्या घरावर देखील हल्ला झाला होता. तसेच त्यांच्या पेंटींग्जची देखील तोडफोड करण्यात आली होती.

बाळासाहेब ठाकरेंवर बायपास झाली तेव्हा अनवाणीच पोहोचले होते एम एफ हुसैन-

राज ठाकरेंनी एम एफ हुसैन यांच्या निधनानंतर दुख: व्यक्त करत ही आठवण सांगितली होती. ''बाळासाहेब ठाकरेंवर बायपास झाली तेव्हा, मातोश्रीवर एक व्यक्ती अनवाणी चालत आली आणि आपल्याला बाळासाहेबांना भएटायचं म्हणाली, ते एम एफ हुसैन होते. एम एफ हुसेन हे अवलिया कलालार होते. पण त्यांना हिंदु देवी -देवतांची विवादास्पद चित्र का काढाविशी वाटली हे मला अद्याप समजलेले नाही.'' असं राज ठाकरे म्हणाले होते.

एम एफ हुसैन यांच्या चित्रात रामायण आणि महाभारत हा विषय जास्त का ?

एम एफ हुसैन यांची एनडीटीव्ही वर मुलाखत झाली होती. त्यात त्यांनी त्यांच्या चित्राचा विषय बऱ्य़ाचदा रामायण, महाभारत का असतो हे विस्ताराने सांगितलं होतं. आपला जन्म पंढरपुर या विठ्ठल मंदिराच्या गावी झाला होता. माझ्या आई -वडीलांना उर्दु येत नव्हतं त्यांना फक्त मराठी आणि कन्नड येत होतं. मग आमचं कुटुंब मध्यप्रदेशात स्थायिक झाले. माझा ब्राम्हण मित्र होता. आम्ही धर्म आणि तत्वज्ञानावर बोलायचो. त्यातूनच मला रामायण आणि महाभारताविषयी जाणून घ्यायची इच्छा निर्माण झाली. मला धर्म आणि त्तवज्ञान आवडायचं म्हणून मी अभ्यास केला होता. असं त्यांनी सांगितलं होतं.

Web Title: Mf Hussains Last Wish To Stay At Pandharpur Remains Incomplete Article By Halima Kureshi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top