
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विश्वासू मिलिंद नार्वेकर हे चक्क उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरच जॅम खूष असल्याचे शुक्रवारी विधिमंडळात पाहायला मिळाले.
दादा खूपच हुशार आहेत, मिलिंद नार्वेकरांची शाबासकी
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे विश्वासू मिलिंद नार्वेकर हे चक्क उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावरच जॅम खूष असल्याचे शुक्रवारी विधिमंडळात पाहायला मिळाले. अजितदादांच्या हुशारीचे कौतुक करीत, मुख्यमंत्री ठाकरे यांच्या दिमतीला अशाच उपमुख्यमंत्र्यांची गरज असल्याचेच नार्वेकर (Milind Narvekar) यांनी आपल्या मोजक्या शब्दांतून अधोरेखित केले. पीकविम्याच्या योजनेवरून अजितदादा पत्रकारांच्या प्रश्नाला तत्पर आणि चाणाक्षपणे दिलेली उत्तर ऐकणाऱ्या नार्वेकरांनी 'दादांचा सगळ्याच क्षेत्रात तगडा अभ्यास असल्याचे पत्रकारांनाच सांगितले. त्यापलीकडे जाऊन खरोखरीच 'दादा खूपच हुशार आहेत', अशी शाबासकी देऊन पत्रकारांच्या गराड्यात बसलेले नार्वेकर हे पत्रकार परिषदेतील अजितदादांच्या खुलाशांवर दिलखुलास हसत राहिले.
अर्थसंकल्प मांडल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळात माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. मुख्यमंत्री ठाकरे येणार असल्याने पत्रकारांची गर्दी होती. मुख्यमंत्र्यांसोबत कक्षात आलेल्या नार्वेकरांनी थेट मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष मंदार पारकर यांच्या खुर्चीचा ताबा घेतला आणि काही मिनिटांसाठी पत्रकारांसारखा रुबाब केला. मुख्यमंत्र्यांचे बोलणे होताच, अजितदादा पत्रकारांच्या प्रश्न उत्तरे देत होते. तेव्हाच पीकविम्याच्या प्रश्नावर त्यांनी मुद्देसूद मांडणी करून पीकविम्याचे गणित उलगडून सांगितले. अजितदादांनी सोडविलेले हे बिनचूक गणित पाहून नार्वेकर भलतेच खूष झाले आणि शेजारीच असलेल्या एका ज्येष्ठ पत्रकाराला दादांच्या हुशारीचे गमक सांगितले.
हेही वाचा: चांद्यापासून बांद्यापर्यंत, आमचा अर्थसंकल्प सर्व घटकांसाठी - अजित पवार
आपल्या खुलाशात पत्रकारांपासून विरोधकांना अप्रत्यक्षपणे चिमटे काढण्याच्या अजितदादांच्या 'स्टाइल'ला नार्वेकरांची दाद मिळत होती. गंमत म्हणजे, अधिवेशनाच्या आदल्या दिवशीच्या चहापानापासून अधिवेशनाचे सूप वाजल्यानंतरही माध्यमाशी मोजून बोलणारे मुख्यमंत्री ठाकरे हे चढ प्रश्नांना अजितदादांना पुढे करतात. तेव्हा जोरदार बॅटिंग करून अजितदादा हे मुख्यमंत्र्यांना सावरून घेतल्याचे दिसते. सरकारवरील संकटाच्या काळातही मुख्यमंत्र्यांना ताकद देणाऱ्या अजितदादांची हीच 'स्टाईल' नार्वेकरांना भावत असल्याचे त्यांच्या बोलण्यातून जाणवले.
Web Title: Milind Narvekar Apriciate Ajit Pawar After Budget Session
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..