Vidhan Sabha 2019 : वंचित आघाडीत उभी फूट; एमआयएम आघाडीतून बाहेर?

सकाळ वृत्तसेवा 
शनिवार, 7 सप्टेंबर 2019

एमआयएमला 288 पैकी आठपेक्षा जास्त जागा देण्यास "वंचित' तयार नसल्याने आघाडीत बिघाडी झाली आहे.

विधानसभा 2019 : औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीत लक्षणीय मते मिळवून सर्वांना धक्का देणारी वंचित बहुजन आघाडी आणि "एमआयएम' यांच्या आघाडीत विधानसभेच्या तोंडावर फूट पडली आहे. एमआयएमला 288 पैकी आठपेक्षा जास्त जागा देण्यास "वंचित' तयार नसल्याने आघाडीत बिघाडी झाली आहे. त्यामुळे आता एमआयएम स्वतंत्रपणे विधानसभा निवडणूक लढणार असल्याची माहिती "एमआयएम'चे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी "सकाळ'ला दिली. तसेच त्यांनी एका प्रसिद्धिपत्रकाद्वारे वंचित सोबतची बोलणी फिसकटल्याचे जाहीर केले आहे. 

लोकसभा निवडणुकीनंतर दोन्ही पक्षांची विधानसभा निवडणुकीत आघाडी होईल, अशी चिन्हे असतानाच दोन्ही पक्षांमध्ये जागा वाटपांचा तोडगा निघाला नाही. यानंतर अखेर खासदार इम्तियाज यांनी दिलेल्या पत्रकात स्वतंत्रपणे मैदानात उतरणार असल्याचे सांगितले. इम्तियाज जलील म्हणाले, "वंचित'चे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर व अन्य नेत्यांशी "एमआयएम'ची दोन महिन्यांपासून जागा वाटपासंदर्भात बोलणी सुरू होती; परंतु आंबेडकरांनी आमच्यावर अन्याय करीत 288 विधानसभा मतदारसंघांपैकी केवळ आठ जागा देण्याची तयारी दर्शवली. हा निर्णय आम्हाला कदापि मान्य होणार नाही. विशेष म्हणजे "वंचित'ने आम्हाला देऊ केलेल्या जागांच्या यादीत औरंगाबाद मध्य या आम्ही जिंकलेल्या जागेचाही समावेश नव्हता. 

आघाडीसाठी केले प्रामाणिक प्रयत्न 
खासदार इम्तियाज म्हणाले, "वंचित'सोबत आघाडी व्हावी यासाठी आमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी, डॉ. गफार कादरीसह मीही प्रामाणिक प्रयत्न केले. कादरी यांनी ऍड. आंबेडकरांना ओवेसी यांचे गुप्त पत्र दिल्यानंतर गुरुवारी (ता. 5) पुण्यात महत्त्वाची बैठकही झाली. ऍड. आंबेडकर यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे आणि तो यापुढेदेखील कायम राहील, असेही ते म्हणाले. 

एमआयएमची कामगिरी 
- 2014 च्या विधानसभा निवडणुकीत 24 मतदारसंघांत निवडणूक लढविली 
- त्यापैकी मुंबईतील भायखळा आणि औरंगाबाद मध्य मतदारसंघांत विजय 
- नऊ मतदारसंघांत उमेदवार दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर 
- सध्या राज्यात दीडशेहून अधिक नगरसेवक 
- औरंगाबाद महापालिकेत 26 नगरसेवक. विरोधी पक्षनेता, गटनेता पद एमआयएमकडे 

एमआयएम घेणार स्वतंत्रपणे मुलाखती 
एमआयएमकडे निवडणूक लढण्यासाठी इच्छुकांच्या उड्या पडल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक इच्छुकांची संख्या औरंगाबाद मध्य आणि पूर्वमधून आहे. आता राज्यात जेथे शक्ती आहे, तेथे एमआयएमतर्फे लवकरच इच्छुकांच्या मुलाखती औरंगाबादेत घेणार असल्याचेही या प्रसिद्धिपत्रकाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MIM exits from Vanchit Aghadi alliance