esakal | MahaConclave | नागरी सहकारी बॅंकांच्या अडचणींवर तोडगा काढू : डॉ. भागवत कराड
sakal

बोलून बातमी शोधा

dr-bhagwat-karad

नागरी सहकारी बॅंकांच्या अडचणींवर तोडगा काढू : डॉ. भागवत कराड

sakal_logo
By
ओमकार वाबळे

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांचे आश्वासन : सकाळच्या सहकार महापरिषदेचे उद्घाटन

पुणे, ता. २ : राज्यातील नागरी सहकारी बॅंका आणि पतसंस्थांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी आणि कामकाजातील अडथळे दूर करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करेल. यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि केंद्रीय अर्थ सचिवांसोबत एक बैठक आयोजित करुन तोडगा काढला जाईल, अशी ग्वाही केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी शनिवारी (ता.२) येथे दिली.

सकाळ माध्यम समूहाच्यावतीने राज्यातील नागरी सहकारी बॅंका आणि पतसंस्थांचे पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांसाठी तीन दिवशीय "सकाळ सहकार महापरिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या महापरिषदेचे उद्घाटन डॉ. कराड यांच्या हस्ते आज झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार, महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर, लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष किरण ठाकूर, सकाळचे संचालक-संपादक श्रीराम पवार आदी उपस्थित होते.

डॉ. कराड म्हणाले, "ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था कशी चालते, ती कशी चालली पाहिजे. या प्रमुख विषयावर चर्चा करुन त्याबाबतचा मसुदा तयार करण्यासाठी भरवलेल्या या परिषदेचे आयोजन केल्याबद्दल मी सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार आणि लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे किरण ठाकूर यांचे अभिनंदन करतो आणि त्यांचे आभार मानतो. या परिषदेच्या माध्यमातून या बॅंकाबाबतचा एक मसुदा तयार करून, त्यावर काही तोडगा निघेल का, यावर नक्कीच विचार होईल. यासाठी दैनिक सकाळसारखे प्रसिद्धी माध्यम हे एक लोकशाहीच्या प्रवासातील महत्वाचे पाऊल ठरत आहे."

महाराष्ट्र व गुजरात या दोन राज्यात सहकार क्षेत्र अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करत आहे. यामध्ये नागरी बॅंका, पतसंस्था, दूध संस्था आणि सहकारी साखर कारखाने आदी संस्थांचा समावेश आहे. या सर्व सहकारी संस्था वेगवेगळे प्रकल्प राबवून सहकार समृद्ध करत आहेत. या संस्था अत्यंत चांगल्या प्रकारे काम करत आहेत. या संस्था चालवत असताना लोकांमध्ये एक चांगल्या प्रकारचा विश्वास निर्माण झाला असल्याचे मत डॉ. कराड यांनी यावेळी व्यक्त केले.

ते म्हणाले, "देशात १९०४ मध्ये सहकार सुरु झाला. त्यानंतर १९१२ मध्ये पहिला सहकार कायदा अस्तित्वात आला. चौथ्या पंचवार्षिक योजनेत कृषि क्षेत्र व उद्योगांवर विशेष भर दिला गेला. तेव्हापासून गेल्या सात दशकांपासून महाराष्ट्रात सहकार क्षेत्र खंबीरपणे उभे आहे. पब्लिक सेक्टरमधील बँकापेक्षा सहकार क्षेत्रात काम करणाऱ्या वेगवेगळ्या संस्था लोकांना जवळच्या वाटतात. हा विश्वास आहे. सामाजिक आणि अर्थिक क्षेत्र सुधारण्याचे काम सहकारमधून योग्य पद्धतीने होऊ शकते.

सहकार क्षेत्रात काही ठिकाणी भ्रष्टाचाराची कीडही लागली होती. परंतु जुन्या नेत्यांनी आणि लोकांनी चांगले काम करत, ही भ्रष्टाचाराची कीड बाजूला करत चांगले काम केले आहे. आणि विश्वसार्हता जपली आहे.सर्वसामान्यांचा जोपर्यंत विकास होत नाही, तोपर्यंत भारत देश विकसित होणार नाही. मोठ्यांना कर्ज दिले गेले पाहिजेच. पऱंतू त्याचबरोबर, लघुउद्योजकांसोबत भाजीपाला विक्री, किराणा दुकानदार अशा छोटे उद्योग करणाऱ्यांनाही कर्ज मिळाले पाहिजे. देश समृद्ध होण्यासाठी सर्वसामान्य माणसांना कर्ज उपलब्ध करून देऊन, त्यांचा विकास करण्याची गरज आहे.

सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार म्हणाले, "बॅंकिंग हा माझा विषय नाही. पण व्यावसाय करत असताना बराच काळ बॅंकेचा ग्राहक होतो. बॅंकिंग असो किंवा कोणताही व्यवसाय करताना समोरच्या व्यक्तींचा विश्वास मिळणे गरजेचे असते. त्यामुळे व्यवसाय उत्तम चालतो, हा अनुभव आहे. ग्राहक आणि समाजाला काय अपेक्षित आहे, हे पाहिले पाहिजे. या अर्थाने विचारमंथन करुन, या सहकार महापरिषदेत मार्ग काढावेत. हे मार्ग काढण्यासाठी बॅंकाचे डिजिटायझेशन होणे आणि आणि सायबर सिक्युरिटीची गरज आहे. या दोन्ही गोष्टी करणे कोणत्याही एका बँकेला परवडणारे नाही. यासाठी अन्य सर्व बँकांनी एकत्रित येऊन हे तंत्रज्ञान खरेदी करण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. यासाठी सर्व सहकारी बँकांनी मिळून हे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी खर्च करायला हवा. प्रसंगी तंत्रज्ञान विकत घ्यायला हवे. सहकारात ज्ञानाधिष्टीत व्यवसायिकतेचा अभाव आहे का, याचे मंथनही या परिषदेत व्हावे."

भारतीय रिझर्व्ह बँक विकासकाची भूमिका बजावण्यात कमी पडली आहे. नागरी सहकारी बॅंका आणि पतसंस्थांच्या पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांना इंग्रजी बोलता येत नाही. रिझर्व्ह बॅंकेच्या ढाच्यात मांडणी करता येत नाही, म्हणून सहकारी बँकांना बँकिंगचे कामकाज जमत नाही, हे म्हणणे चुकीचे आहे.नव्या नियमांकडे पाहता रिझर्व्ह बॅंकेला सहकारी बँका नकोशा झाल्या आहेत का?, असा सवाल राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी उपस्थित केला.

सहकाराला शतकाहून अधिक काळाची वैभवशाली परंपरा आहे. सहकार हा सर्वसामान्यांना पतपुरवठा करण्यात मोठी कामगिरी करत असल्याचे लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष किरण ठाकूर यांनी सांगितले.

सकाळचे संचालक- संपादक श्रीराम पवार यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकात ही सहकार महारिषद आयोजित करण्याबाबची सकाळची भूमिका सांगितली. विक्रांत पोंक्षे यांनी या परिषदेत कोण-कोणत्या विषयावर चर्चा होणार आहे, याबाबतची माहिती दिली. भूषण करंदीकर यांनी सूत्रसंचालन केले.

सहकाराची समस्यांसाठी महत्वाचे व्यासपीठ

सकाळ माध्यम समूहाने आयोजित केलेले हे महा कन्क्लेव्ह हे नागरी सहकारी बॅंका आणि पतसंस्थांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी महत्वाचे व्यासपीठ ठरणार आहे. या व्यासपीठाच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य सरकारशी संबंधित अनेक प्रश्न या निमित्ताने मांडण्याची संधी बॅंकांना मिळाली आहे, असे मतही केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड यांनी यावेळी व्यक्त केले.

loading image
go to top