राजकारणातील समाजकारणी व्यक्तिमत्त्व अरुण लाड

mla arun lad bibliography information by dhanjay donde
mla arun lad bibliography information by dhanjay donde
Updated on

सांगली : राजकारणातील समाजकारणी व्यक्तिमत्त्व, अशी ज्यांची खुद्द शरद पवार यांनी ओळख करून दिली, त्या अरुण गणपती लाड यांनी पुणे पदवीधर मतदार संघातून अखेर बाजी मारली. या मतदार संघात सातत्याने, चिकाटीने, न दमता ते काम करत राहिले. क्रांतीचा वसा आणि वारसा जपताना सामान्यांतील सामान्य माणसाला हात देणारे नेतृत्व अखेर विधान परिषदेत पोहोचले. अण्णा आमदार झालेच, मात्र कुंडल परिसरातील प्रत्येक माणूस ‘मी आमदार झालोय’, अशी भावना व्यक्त करतोय, यातच त्यांचे श्रेष्ठत्व सामावले आहे.  


अरुण अण्णांचा जन्म २९ ऑक्‍टोबर १९४७ चा. कुंडलच्या क्रांतिकारी लाड घरातला. क्रांतिअग्रणी जी. डी. बापू लाड यांच्याकडूनच त्यांना  समाजकारणाचे बाळकडू मिळाले. बापू स्वातंत्र्य संग्रामात कोणत्या ना कोणत्या मोहिमेवर असायचे. क्रांतिकारकांचे जीणे म्हणजे धगधगता अंगार. क्रांतिसिंह नाना पाटील, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा जोतिराव फुले यांच्या समाजकार्याच्या विचारांचा प्रभाव अरुण अण्णांवर झाला. तोच रस्ता त्यांनी तुडवला आणि  त्याच वाटेवर त्यांनी ‘आमदार’ पदाला गवसणी घातली.  


गेली अनेक वर्षे समाजकार्यात असणाऱ्या या कुटुंबाला अखेर न्याय मिळाला. गेल्यावेळी यशाने हुलकावणी दिली होती. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अण्णांवर विश्‍वास दाखवला. राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना अशा महाविकास आघाडीची महाताकद अण्णांसोबत राहिली. पदवीधरांनीच उठाव केला आणि तब्बल ४९ हजारांच्या मताधिक्‍याने अण्णा विजयी झाले. ‘आता नाही तर कधीच नाही’ असे म्हणत अण्णांवर प्रेम करणारा प्रत्येक माणूस राबला. सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यात तळ ठोकला.


अण्णांच्या या यशात ‘मायक्रो प्लॅनिंग’ हा महत्त्वाचा मुद्दा ठरला. ती भूमिका बजावली, अण्णांचे चिरंजीव तथा जिल्हा परिषदेचे विरोधी गटनेते शरद लाड यांनी. विरोधी गटाचा बालेकिल्ला उध्वस्त करायचा तर बांधावरचा पदवीधर पाठीशी आला पाहिजे, या भावनेतून काम झाले. शहर, गाव, वाड्या, वस्त्यांवर आपल्या विचाराचा माणूस त्यांनी हेरला. महाविकास आघाडीने त्याला बळ दिले. शरद यांची शैली अण्णांसारखीच संयमी, शांत आणि सातत्यपूर्ण प्रयत्न करण्याची राहिली आहे. अरुणअण्णाच योग्य उमेदवार आहेत, हे बिंबवण्यासाठी फार ताकद लावावी लागली नाही. कारण, स्वच्छ चारित्र्य आणि क्रांतीचा वारसा सांगणारे अण्णा आणि त्यांच्याच विचाराने वाटचाल करणारी पुढची पिढी, हे काही लपून राहिलेले नव्हते. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या युद्धात झोकून दिले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिल्या सूचनांचे तंतोतंत पालन झाले.

खासदार सुप्रियाताई सुळे, मंत्री विश्‍वजित कदम, आमदार रोहित पवार ही टीम उमेदीने मैदानात उतरली. अरुणअण्णांच्या रुपाने राजकारणात एक सच्चा सामाजिक सेवक मिळाला. त्यांनी आपली कृषी पदवी मिळविल्यानंतर समाजकारणाला वाहून घेतले. सामान्य कुटुंबातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून गांधी एज्युकेशन सोसायटीमार्फत चालविल्या जाणाऱ्या शाळा व महाविद्यालयातून गुणवत्तापूर्ण शिक्षण सुरू केले. क्रांती इंटरनॅशनल स्कूल स्थापले. सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना राहण्यासाठी जी.डी.बापूंनी सुरू केलेले नाना पाटील विद्यार्थी वसतिगृह नेटके आहे. क्रांतिअग्रणी ज्ञानपीठाच्या माध्यमातून ‘प्रोजेक्‍ट क्रांती’च्या माध्यमातून हजारो विद्यार्थांना स्पर्धा परीक्षांसाठी मोफत सुविधा पुरवल्या जातात. त्यांचे बंधू ॲड. प्रकाश लाड यांचे मोलाचे सहकार्य आहे. 


क्रांती दूध संघाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा आर्थिक स्थर उंचावला. त्यांचे बंधू किरण तात्या लाड यांच्या दूरदृष्टी आणि शेतीनिष्ठ स्वभावाचा फायदा हजारो शेतकऱ्यांना होतोय. शेतकऱ्यांसाठी आंदोलनातही हे कुटुंब मागे  राहिले नाही. पलूस तालुका फार्मर प्रोड्युसर कंपनीची स्थापना करून शेतमालाला योग्य भाव देण्यासाठी पाऊल टाकले. वीजदर वाढीबाबत ज्येष्ठ  नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्यासोबत अनेक मोर्चात ते सहभागी झाले. परिसरातील जवळपास १० हजार हेक्‍टर शेतीसाठी पाणी उपलब्ध करून दिले. 


सहकारातील आदर्श क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखाना. तो अरुणअण्णांच्या काटकसरीमुळे आणि त्यांच्या योग्य  नियोजनामुळेच उभा आहे. त्यांच्या सहकारातील कार्याची दखल घेत खासदार शरद पवार यांनी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या संचालकपदी, तर शैक्षणिक कार्यामुळे त्यांची रयत शिक्षण संस्थेच्या संचालकपदी निवड केली. ते  राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणूनही कार्यरत आहेत. हे सर्व करताना निगर्वीपणे आणि कोणत्याही पदाचा गर्व न करता अरुण अण्णा नेहमी सामान्यांच्यात रमत त्यामुळे ते नेहमी सर्वसामान्यांना आपलेसे वाटतात. 


कुंडलच्या डोळ्याचे पारणे फिटते ते अण्णांच्या शपथविधी सोहळ्याने. क्रांतिअग्रणी जी. डी. बापू, अरुण अण्णा आणि शरद भाऊ या तिन्ही पिढयातील कार्यकर्त्यांनी हा ऐतिहासिक क्षण अनुभवला. पदविधरांची आजवर झालेली उपेक्षा दूर करून, त्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी अशा या क्रांतिकारकांच्या भूमीतील, क्रांतिकारकांच्या रक्‍तातील, समाजासाठी ज्या कुटुंबाने आपले अख्खे आयुष्य वेचले. त्या कुटुंबातील एक जाणती व्यक्ती पदवीधरांचे विधान परिषदेत प्रतिनिधीत्व करणार आहे. ते लक्षवेधी काम उभे करतील, यात शंकाच नाही.

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com