Bachchu Kadu: आरोपांवर मुख्यमंत्र्यांनी खुलासा करावा; बच्चू कडू म्हणाले, ८ आमदार संपर्कात... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bachchu Kadu

Bachchu Kadu: आरोपांवर मुख्यमंत्र्यांनी खुलासा करावा; ८ आमदार संपर्कात, बच्चू कडू म्हणाले

अमरावतीः आ. रवी राणा आणि आ. बच्चू कडू यांच्यातील वाद संपुष्टात येण्याचं नाव घेत नाही. राणा यांनी बच्चू कडूंवर सरकार स्थापनेवेळी पैसे घेतल्याचा आरोप केला आहे. यासंदर्भात पुरावे देण्याचं आव्हान बच्चू कडू यांनी दिलं असून थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी स्पष्ट भूमिका घ्यावी, नसता धमाका करण्याचा इशारा त्यांनी दिलाय.

खोके घेतल्याचा आरोप केल्याप्रकरणी बच्चू कडू यांनी थेट राजापेठ पोलिस ठाण्यात रवी राणाविरोधात तक्रार दाखल केली आहे. तसेच रवी राणा यांनी केलेले आरोप सिद्ध झाले तर त्यांच्या घरी जाऊन भांडी घासेन, १ तारखेपर्यंत आरोप सिद्ध करावा, अन्यथा आपण कठोर कायदेशीर पावलं उचलणार असल्याचे संकेतही बच्चू कडू यांनी दिले. नागपूर प्रेस क्लबमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.

यावेळी कडू म्हणाले की, एकवेळ विरोधकांचं समजू शकतं. परंतु देवेंद्र फडणवीसांच्या जवळचे असलेल्या राणांनी माझ्यावर आरोप केले आहे. त्यांनी १ तारखेपर्यंत याचे पुरावे द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली. शिवाय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी याबाबत खुलासा करून ठोस भूमिका घ्यावी, असंही ते म्हणाले. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अडचण होण्याची शक्यता आहे.

नाराज आमदार संपर्कात

सरकारमध्ये नाराज असलेले सात ते आठ आमदार माझ्या संपर्कात आहेत, असा गौप्यस्फोट बच्चू कडू यांनी केलाय. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी याबाबत काय तो खुलासा केला नाही तर आपण धमाका करु, असा इशारा त्यांनी दिला. रवी राणा यांनी केलेल्या आरोपांमुळे आता चांगलंच वादंग पेटण्याची शक्यता आहे.