Raj Thackeray : भाजपच्या बालेकिल्ल्यातून 'मनसे' फुंकणार रणशिंग; आखणार नवी रणनीती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Raj Thackeray fadanvis

Raj Thackeray : भाजपच्या बालेकिल्ल्यातून 'मनसे' फुंकणार रणशिंग; आखणार नवी रणनीती

Raj Thackeray Vidarbh Tour : राज्यातील प्रमुख महापालिकांच्या निवडणुकांचं बिगुल येत्या काही काळात वाजलं जाणार आहे. त्यासाठी सर्वच पक्षांनी रणनीती आखण्यास सुरूवात केली असून, या सर्वामध्ये भाजप आणि मनसेची युती होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. एकीकडे भाजप नेते आणि राज ठाकरे यांच्या भेटीगाठी वाढलेल्या असतानाच राज ठाकरे यांच्या विदर्भ दौऱ्याचा कार्यक्रम निश्चित झाला आहे. राज ठाकरेंचा विदर्भ दौरा तब्बल सहा दिवस असणार आहे. त्यामुळे मनसेच्या मिशन विदर्भाची सुरूवात होणार असल्याचं बोललं जात आहे. त्यात नागपूर हा भाजपचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे अनेकांच लक्ष या दौऱ्याकडे लागले आहे.

काय असणार रणनीती

आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून, या दौऱ्यामध्ये पक्ष संघटन वाढविणे हा मुख्य उद्देश असल्याचे सांगितले जात आहे. भाजपचा बालेकिल्ला असणाऱ्या नागपूरात राज ठाकरे 18 आणि 19 सप्टेंबर असे दोन दिवस मुक्कामी असणार आहेत. कुठल्याही परिस्थितीत विदर्भात शिवसेनेची ताकद वाढणार नाही, याचीदेखील काळजी मनसेकडून घेतली जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी शिवसेनेच्या मतांमध्ये विभाजन व्हावे, याकरता भाजपचीही गुप्त तयारी सुरू आहे.

ज्या भागांत शिवसेनेचे प्राबल्य आहे, अशा भागांत मनसेचे उमेदवार उभे करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यामुळे भाजप आणि मनसेचं गणित जुळून आल्यास नागपूर महापालिकेत मनसेचे खाते पुन्हा उघडू शकते. याचा फायदा मनसेला चंद्रपूर आणि अमरावती महानगरपालिकांमध्येही होऊ शकतो.

असा असणार राज ठाकरेंचा विदर्भ दौरा

राज ठाकरे 17 सप्टेंबरला सायंकाळी रेल्वेने नागपूरसाठी रवाना होणार असून, 18 सप्टेंबरला सकाळी त्यांचे नागपुरात आगमन होणार आहे. त्यानंतर राज ठाकरे 23 सप्टेंबरपर्यंत विदर्भात तळ ठोकून असणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ठाकरे नागपूर, चंद्रपूर आणि अमरावती महानगरपालिकांच्या निवडणुकांसंदर्भात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठका घेणार आहे.

नागपुरात 18 आणि 19 सप्टेंबर असे दोन दिवस राज ठाकरे मुक्कामी असणार आहेत. त्यानंतर 20 सप्टेंबरला ते नागपूरवरून चंद्रपूरसाठी रवाना होणार आहेत. येथे ते एकदिवस मुक्कामी असतील. 21 सप्टेंबरला चंद्रपूरवरून अमरावतीसाठी राज ठाकरे रवाना होणार असून, 21 आणि 22 सप्टेंबर असे दोन दिवस राज ठाकरे येथील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे. त्यानंतर 23 सप्टेंबरला ठाकरे मुंबईकडे प्रयाण करणार आहेत.

Web Title: Mns Chief Raj Thackeray Vidarbh Tour Dates Corporation Election Bjp Devendra Fandanvis Nagpur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..