esakal | Vidhan Sabha 2019 : मनसेने कोथरूडची राष्ट्रवादीची भरपाई केली नाशिकमध्ये 
sakal

बोलून बातमी शोधा

Logo

येवल्यातून राष्ट्रवादीचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्याऐवजी राष्ट्रवादीच्या उमेदवारीचा आग्रह धरणारे माणिकराव शिंदे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे; पण आपला पाठिंबा भुजबळांना की शिवसेनेचे संभाजी पवार यांचा पत्ता अजूनही शिंदेंनी उघडला नाही.

Vidhan Sabha 2019 : मनसेने कोथरूडची राष्ट्रवादीची भरपाई केली नाशिकमध्ये 

sakal_logo
By
महेंद्र महाजन ः सकाळ वृत्तसेवा

नाशिक : पुणे-कोथरूड विधानसभा मतदारसंघातून दिलेल्या पाठिंब्याची भरपाई मनसेने नाशिक पूर्व मतदारसंघातून केली. इथून मनसेचे उमेदवार माजी महापौर अशोक मुर्तडक यांनी आज माघार घेत भाजपने उमेदवारी नाकारल्याने राष्ट्रवादीची उमेदवारी करणारे आमदार बाळासाहेब सानप यांना पाठिंबा जाहीर केला.

नाशिक जिल्ह्यातील 15 मतदारसंघांतून आज 64 जणांनी माघार घेतली असून, रिंगणात आता 148 उमेदवार उरलेत. मात्र, बंडोबांनी माघार न घेता युती आणि आघाडीविरुद्ध बंडाचे निशाण फडकावले. विधानसभा मतदारसंघनिहाय उमेदवारांची संख्या अशी : नांदगाव-15, मालेगाव मध्य-13, मालेगाव बाह्य-9, बागलाण-6, कळवण-6, चांदवड-9, येवला-8, सिन्नर-9, निफाड-6, दिंडोरी-5, नाशिक पूर्व-12, नाशिक मध्य-10, नाशिक पश्‍चिम-19, देवळाली-12, इगतपुरी-9.

येवल्यातून राष्ट्रवादीचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्याऐवजी राष्ट्रवादीच्या उमेदवारीचा आग्रह धरणारे माणिकराव शिंदे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे; पण आपला पाठिंबा भुजबळांना की शिवसेनेचे संभाजी पवार यांचा पत्ता अजूनही शिंदेंनी उघडला नाही. नाशिक पश्‍चिममधून भाजपच्या आमदार सीमा हिरे यांच्याविरोधात बंडाचे निशाण फडकावणारे शिवसेनेचे सुधाकर बडगुजर आणि मामा ठाकरेंची माघार झाली असली, तरीही शिवसेनेचे बंडखोर विलास शिंदे यांनी उमेदवारी कायम ठेवली. शिंदेंच्या उमेदवारीमागे नांदगावचे युतीमधील राजकारण पेटल्याचे मानले जाते. नांदगावमधून राष्ट्रवादीचे आमदार पंकज भुजबळ आणि शिवसेनेचे सुहास कांदे यांच्या विरोधात भाजपचे रत्नाकर पवार यांनी आपली अपक्ष उमेदवारी मागे घेतली नाही.

बंडखोरांची नावे 
0
बागलाण-भाजपचे राकेश घोडे (अपक्ष) 
0 कळवण-सुरगाणा-भाजपचे राजेंद्र ठाकरे (मनसे) 
0 नांदगाव-भाजपचे रत्नाकर पवार (अपक्ष) 
0 निफाड-मनसे सोडून बहुजन विकास आघाडी स्थापन करणारे आणि शिवसेनेचे आमदार अनिल कदम यांचे चुलत बंधू यतीन कदम (अपक्ष) 
0 नाशिक पूर्व-राष्ट्रवादीच्या उमेदवारांविरुद्ध प्रा. जोगेंद्र कवाडे गटाचे गणेश उन्हवणे (कॉंग्रेस) 
0 नाशिक पश्‍चिम-शिवसेनेचे विलास शिंदे (अपक्ष) 
0 चांदवड-देवळा- राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनील आहेर (अपक्ष) 
0 इगतपुरी-भाजपचे माजी आमदार शिवराम झोले यांच्या कन्या शैला झोले (अपक्ष) 
0 देवळाली-राष्ट्रवादीचे रवीकिरण घोलप (अपक्ष)