esakal | Vidhan Sabha 2019 : मनसे स्वबळावर विधानसभेच्या रिंगणात
sakal

बोलून बातमी शोधा

Vidhan Sabha 2019 : मनसे स्वबळावर विधानसभेच्या रिंगणात

विधानसभा निवडणूक पूर्ण ताकदीनिशी लढविणार असल्याची घोषणा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज केली.

Vidhan Sabha 2019 : मनसे स्वबळावर विधानसभेच्या रिंगणात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

विधानसभा 2019
मुंबई  -विधानसभा निवडणूक पूर्ण ताकदीनिशी लढविणार असल्याची घोषणा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज केली. निवडणुकीच्या प्रचारासाठी पाच ऑक्‍टोबरला पहिली सभा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

राज ठाकरे यांनी जागांची संख्या सांगितली नसली तरी, मनसेकडून किमान १५० जागा लढविण्यात येणार असल्याचे नेत्यांनी खासगीत सांगितले.

मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरेंनी जागांबाबत आपण योग्यवेळी घोषणा करणार असल्याचे सांगितले. या वेळी त्यांच्या उपस्थितीत धुळ्यातील आत्महत्या केलेल्या धर्मा पाटील यांचे पुत्र नरेंद्र यांनी मनसेत प्रवेश केला. यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना राज ठाकरे यांनी नरेंद्र पाटील पक्षातर्फे निवडणूक लढतील, अशी घोषणा केली. शेतकरी धर्मा पाटील यांनी मंत्रालयात विष प्राशन करत आत्महत्या केली होती. नरेंद्र पाटील यांच्यासोबत शिवसेनेचे नाशिकचे नगरसेवक दिलीप दातीर यांनीही मनसेत प्रवेश केला.

कोहिनूर मिलप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) चौकशी केल्यानंतर राज ठाकरे यांनी आज पक्षाचा निर्णय जाहीर केला. काही दिवसांपासून त्यांनी मौन बाळगल्याने विधानसभा निवडणुकीत पक्षाची नेमकी भूमिका काय आहे, याबाबत तर्क लढवले जात होते. मध्यंतरी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनीही राज ठाकरे ‘ईडी’च्या चौकशीनंतर शांत झाल्याचे म्हटले होते. 

आज अखेर राज ठाकरेंनी आज मौन सोडले. या वेळी बोलताना त्यांनी लढविण्यात येणाऱ्या जागांबाबत आपण योग्यवेळी घोषणा करणार असल्याचे सांगितले. पाच तारखेला आपली पहिली प्रचारसभा पार पडणार असून, इतके दिवस जे बोललो नाही ते आता बोलणार आहोत, असेही त्यांनी या वेळी सांगितले. उमेदवारांची रोज चार-पाच नावे जाहीर करेन, असे मिस्कील भाष्यही या वेळी त्यांनी केले.