
...हीच भूमिका ३ तारखेनंतरही कायम ठेवा: संदीप देशपांडे
मुंबई : राज्यात सध्या हनुमान चालीसा आणि भोंग्यांच्या प्रकरणावरून वातावरण तापलं आहे. यातच अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे मातोश्री समोर हनुमान चालीसा पठणावर ठाम असल्याने मुंबईतील शिवसैनिक आक्रमक झाले असून राणा दाम्पत्यांना धडा शिकवणार असल्याचा पवित्रा शिवसैनिकांनी घेतला आहे. या प्रकरणावर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
गेल्या दोन दिवसांपासून मातोश्रीबाहेर शिवसैनिकांची गर्दी जमलेली आहे, याचं कारण म्हणजे राणा दाम्पत्य मातोश्रीबाहेर हनुमान चालीसाचं पठण करणार आहेत. तुमच्या घरासमोर हनुमान चालीसा नको म्हणून सर्व यंत्रणा कामाला लागते आणि आम्हाला भोंगे अजान नको म्हणून आम्ही सांगतोय मग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक न्याय आणि आम्हाला एक न्याय का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. जी भूमिका आज तुम्ही घेत आहात तीच भूमिका ३ तारखेच्या नंतरही कायम ठेवा असं आवाहन मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्र्यांना केलं आहे.
हेही वाचा: मंत्री शंकरराव गडाख यांच्या स्वीय सहाय्यकावर गोळीबार
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे मुंबईत मातोश्रीच्या बाहेर हनुमान चालीसाचं पठण करणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. त्यानंतर दोन दिवसांपासून शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतली असून राणा दाम्पत्यांना अडवून ठेवले आहे. आज सकाळीच शिवसैनिकांनी राणा दाम्पत्यांच्या इमारतीला घेराव घालून आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यानंतर पोलिसांनी शिवसैनिकांना अडवण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान काल रात्री भाजपाचे आमदार मोहीत कंबोज यांच्या गाडीवरही शिवसैनिकांनी हल्ला केला होता.
हेही वाचा: इतिहासाला लाजवेल एवढे घोटाळे यांनी केले; MPSC समन्वय समितीचा निशाणा
दरम्यान भोंग्यांच्या प्रकरणावरुन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी येत्या २५ तारखेला सर्वपक्षीय बैठक बोलवल्याची माहिती दिली आहे. कालपासून चाललेल्या राणा प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर ते आपला दौरा सोडून मुंबईकडे रवाना झाले आहेत.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मशिदीवरील भोंग्याच्या वक्तव्यातून पडलेल्या ठिणगीने राज्यभर राजकारण पेटलं आहे. दरम्यान राणा दाम्पत्यांनी मातोश्रीसमोर सकाळी ९ वाजता हनुमान चालीसा पठण करण्याचा इशारा दिला होता.
Web Title: Mns Sandip Deshpande On Uddhav Thackeray Navnit Rana
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..