
कोलाहलात निसर्गाच्या हाकांचा विसर
मुंबई - ‘वातावरणात होत असलेल्या बदलांमुळे विविध आपत्तींना तोंड द्यावे लागत आहे. पण तरीही निसर्गाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. हॉर्न, भोंगे, आरडाओरडा आणि कोलाहलात आपण निसर्गाच्या हाका विसरुन गेले आहोत. त्यामुळे वसुंधरेची जपणूक करून शाश्वत विकासाकडे वाटचाल करावी लागेल,’ असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले.
समृद्ध पर्यावरण निर्माण करण्यासाठी राज्य सरकारतर्फे ‘माझी वसुंधरा अभियान २.०’ हा उपक्रम स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राबविण्यात येत आहे. याअंतर्गत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या स्थानिक संस्था, विभागीय व जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांचा जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सन्मान करण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते. ते म्हणाले,‘पर्यावरणात प्रत्येक घटक महत्वाचा आहे. आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केले तर उपक्रम यशस्वी होऊ शकतो याचे ‘माझी वसुंधरा अभियान’ हे उत्तम उदाहरण आहे. विकास हवाच, पण तो पर्यावरणाची जपणूक करून शाश्वततेकडे जाणारा असणे आवश्यक आहे.
मागील काही वर्षांत कमी दिवसांत अधिक पाऊस पडतोय, दरडी कोसळत आहेत यामुळे होणाऱ्या हानीपासून पुढील पिढीचे आयुष्य सुखकर करण्यासाठी राज्य सरकारने प्रत्यक्ष पावले उचलली आहेत.’ या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेही उपस्थित होते.
शिखर नाही, टॉवर दिसले
उद्धव ठाकरे म्हणाले,‘‘लॉकडाउनचा काळ गेला, पण पुन्हा मास्क लावायची वेळ आली आहे. हे कशामुळे झाले? लॉकडाउनमध्ये काही ठिकाणी मोर रस्त्यावर दिसू लागले. पंजाबमधून तर हिमालय दिसू लागला होता. मी घराच्या गच्चीत जाऊन कळसूबाईचे शिखर दिसते का बघितले. पण टॉवरचेच दर्शन झाले.’’
कानउघडणी
या कार्यक्रमात प्रदान करण्यात आलेल्या प्रशस्तीपत्रकावर चुकीचा उल्लेख झाला होता. त्यातील चूक निदर्शनास येताच अजित पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांची कानउघडणी केली. अशा चुका होऊ देऊ नका, अशी तंबीही त्यांनी दिली.
या अधिकाऱ्यांचा सत्कार
‘माझी वसुंधरा अभियाना’अंतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्था आणि अधिकाऱ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. यामध्ये ‘अमृत शहरां’तर्गत आयुक्त अभिजित बांगर (मुंबई महापालिका), उत्कृष्ट विभागीय आयुक्त सौरभ राव (पुणे), उत्कृष्ट जिल्हाधिकारी पातळीवरील पुरस्कार राहुल रेखावार (कोल्हापूर), उत्कृष्ट जिल्हा परिषद पातळीवर मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, आशिष येरेकर यांचा सत्कार करण्यात आला.
Web Title: Move Towards Sustainable Development Appeal To Chief Minister Uddhav Thackeray
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..