एकनाथ शिंदेंना धक्का! "खासदारांना शिंदे गटाच्या तिकीटावर निवडणूक लढायची नाही" | Eknath Shinde | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Eknath Shinde

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंना धक्का? "खासदारांना शिंदे गटाच्या तिकीटावर निवडणूक लढायची नाही"

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. राजकीय बैठकांनी देखील जोर धरला आहे. आगामी निवडणुका शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट यांच्यासाठी महत्वाच्या आहेत. कारण शिवसेनेत हे दोन मोठे गट निर्माण झाले आहेत. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोठं वक्तव्य केले आहे.

जयंत पाटील म्हणाले, एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या खासदारांना शिंदे गटाच्या तिकीटावर निवडणूक लढायची नाही. या खासदारांना भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढायची आहे.

शिंदे गटाची पंचाईत झाली आहे. जर खासदार भाजपच्या तिकीटावर लढले तर एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले शिवसैनिक मोठ्या संख्येने उद्धव ठाकरे यांच्यासोबत परत येण्याची शक्यता आहे, असे जयंत पाटील म्हणाले. जयंत पाटील यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

सकाळच्या सर्वेक्षणात शिंदे गटाला धक्का!

सकाळ माध्यम समूहाने एनडीए सरकारविषयी सर्वसामान्यांच्या भावनांवर एक सर्वेक्षण केले आहे. यामध्ये देखील शिंदे गटासाठी धक्कादायक माहिती समोर आली आहे. महाविकास आघाडीला सर्वाधिक ४७.७ टक्के मते मिळू शकतात, असे या सर्वेक्षणात म्हटले आहे.

या सर्वेक्षणात काँग्रेसला सर्वाधिक १९.९ टक्के, राष्ट्रवादीला १५.३ टक्के, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला १२.५ टक्के मते मिळण्याची शक्यता सर्वेक्षणात नोंदविण्यात आली आहे. याशिवाय बहुजन वंचित आघाडीला २.९ टक्के, स्वाभिमानी शेतकरी पक्षाला ०.७ टक्के, ओवेसी यांच्या पक्षाला एआयएमआयएमला ०.६ टक्के, केसीआर यांच्या भारत राष्ट्र समितीला ०.५ टक्के आणि इतरांना १.७ टक्के मिळण्याची शक्यता आहे.

या सर्वेमध्ये भाजप एक नंबरचा पक्ष बनू शकतो, भाजपला ३३.८ टक्के, लोकांची पसंती आहेत. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सर्वात कमी म्हणजे ५.५ टक्के लोकांनी पसंती दिली आहे.

या सर्वेनुसार राज्यात पुन्हा महाविकास आघाडी अग्रेसर होताना दिसत आहे. मविआतील पक्षांच्या टक्केवारीची बेरीज केली तर काँग्रेसला १९.९ टक्के, राष्ट्रवादीला १५.३ टक्के, उद्धव ठाकरे गटाला १२.५ टक्के म्हणजेच एकूण ४७.७ टक्के लोकांनी मविआला पसंती दर्शवली आहे. तर दुसरीकडे भाजप आणि शिवसेनेच्या टक्केवारीची बेरीज केली तर ती ३९.३ येवढी दिसत आहे.