
"मी औरंगाबादमध्ये जन्माला आलो अन् औरंगाबादमध्येच मरणार" : इम्तियाज जलील
छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद आणि उस्मानाबाद या शहरांच्या नामांतरावर केंद्र सरकारने अखेर मंजूरी दिली असून अनुक्रमे छत्रपती संभाजीनगर आणि धाराशीव असं या शहराचं नामकरण होणार आहे. पण, "मी औरंगाबादमध्ये जन्माला आलो अन् औरंगाबादमध्येच मरणार" असं वक्तव्य छत्रपती संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील यांनी केलं आहे.
दरम्यान, महाविकास आघाडी सरकारच्या शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद आणि उस्मानाबाद या शहरांच्या नामांतराचा ठराव केला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि सत्तांतर झालं. शिंदे-भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर या सरकारने नामांतराचा प्रस्ताव पुन्हा मंजूर केला होता.
दोन दिवसांपूर्वी केंद्र सरकारने या निर्णयाला हिरवा कंदील दाखवला असून नामांतराचा मार्ग आता मोकळा झाला आहे. पण एमआयएमचे नेते आणि खासदार इम्तियाज जलील यांनी या नामांतराचा विरोध केला आहे. "औरंगाबादचं नामांतर झाल्यामुळे अनेकजण उड्या मारत आहेत, पण मी जन्मही औरंगाबादमध्येच घेतला आणि माझा मृत्यूही औरंगाबादमध्येच होणार, आणि मी खासदारही औरंगाबादचाच आहे आणि औरंगाबादचाच राहणार" असं वक्तव्य जलील यांनी केलं.
सरकारने निर्णय घेतला असूनही खासदार जलील हे आपल्या विचारावर आणि औरंगाबाद या नावावर ठाम असल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. तर त्यांच्या या वक्तव्याचा अनेकांकडून निषेध व्यक्त केला जात आहे.