
Supriya Sule : "सत्तांतरासाठी केलेल्या मदतीच्या बदल्यात भीमाशंकर आसामला देऊन आलात?"
देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर येथे आहे. याच भीमाशंकर ज्योतिर्लिंगाच्या जागेवरून आता वाद पेटण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात असलेल्या भीमाशंकर ज्योतिर्लिंगावर आसाम सरकारने प्रश्न उपस्थित केला आहे. महाराष्ट्रातील भीमाशंकर ज्योतिर्लिंग खरं नसल्याचं आसाम सरकारने म्हटलं आहे. भीमाशंकरचे सहावे ज्योतिर्लिंग हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात नसून आसाममध्ये असल्याचा दावा आसामचे मुख्यमंत्री हिमंत विश्व शर्मा यांनी केला आहे.
तर तर आसाम पर्यटन विभागाने यासंदर्भात जाहिरातबाजी देखील केली आहे. याविरोधात आता महाराष्ट्रातील विरोधकांनी आसाम सरकारच्या दाव्यावर जोरदार टीका केली आहे. याबाबत बोलताना राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सडकून टीका केली आहे. सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करत ज्योतिर्लिंगच्या मुद्द्यावरून त्यांनी सरकारला लक्ष केलं आहे.
सुप्रिया सुळे यांनी याबाबत एक ट्विट केलं आहे. “श्री शिवशंकराच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावे ज्योतिर्लिंग म्हणून महाराष्ट्रातील ‘भीमाशंकर’ जि. पुणे, हे ज्योतिर्लिंग ओळखले जाते. अतिशय निसर्गरम्य परिसरात वसलेले हे शिवालय अगणित भाविकांचे श्रद्धास्थान आहे. पण भाजपाची सत्ता असणाऱ्या आसाम राज्याने गुवाहाटीजवळ असणारे पामोही येथील शिवलिंग सहावे ज्योतिर्लिंग असल्याचा प्रचार सुरू केला आहे. हा अतिशय खोडसाळ आणि तथ्यहीन प्रसार आहे.
घटनाबाह्य ED सरकार-आपण गुवाहाटीला आमदारांची फौज पळवून नेली होती. तिथं तुमची सर्व सोय अदृश्य शक्तीच्या वतीने आसामच्या मुख्यमंत्र्यांनी केली होती.त्याचवेळी तुम्ही बदल्यात हे भीमाशंकर ज्योतिर्लिंग तर देऊन आला नाहीत ना?अर्थात अशी शक्यता नाकारता येत नाही”, असं खरमरीत ट्विट सुप्रिया सुळे यांनी केलं आहे.